लोणावळा (पुणे) येथे कारवाईची भीती दाखवून ५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या पोलिसांना अटक !

  • ५ जणांना अटक, १ जण पसार

  • दोषींना निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर

पुणे – ‘मोटारीमध्ये अमली पदार्थ आहेत’, अशी भीती दाखवून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलीस अंमलदार अमोल ननावरे, तुषार ढावरे, वॉर्डन किसन बोंबले, नीतेश चव्हाण, तुषार घाडगे यांना अटक केली. ‘खंडाळा महामार्ग पोलीस साहाय्य केंद्रा’तील पोलीस नाईक (चालक) अमोल वायकर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

१. तक्रारदार भूषित शर्मा हे ५ जुलै या दिवशी मित्रांसह मोटारीने पुण्याहून लोणावळ्याला चालले होते. ताजे गावाच्या हद्दीत आल्यानंतर अंबर दिवा लावलेल्या शासकीय वाहनाने त्यांची मोटार अडवली.

२. महामार्ग पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या ६ जणांनी ‘तुमच्या गाडीत अमली पदार्थ आहेत’ असे सांगत कारवाईची भीती दाखवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली.

३. पैसे घेण्यासाठी आरोपींनी शर्मा आणि त्यांच्या मित्रांना तळेगाव दाभाडे परिसरातून ए.टी.एम्.मधून पैसे काढण्यास भाग पाडले.

४. तक्रारदारांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच आरोपींनी पळ काढला.

५. तक्रारदार भूषित शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार नोंद केली. या प्रकरणात दोषी आढळलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवला आहे.

फरासखाना पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचारी निलंबित !

२९ जून या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील नाकाबंदी चालू असतांना बुधवार पेठेतून पायी जाणार्‍या ३ तरुणांना पोलिसांनी अडवले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून एका महिलेच्या नावावर २ सहस्र रुपये पाठवण्यास बाध्य केले. याची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. त्याची नोंद घेत चित्रफितीतील संबंधित फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राहुल सुधाकर दाभाडे आणि विवेक शैलेश पाटील यांना निलंबित करण्यात आले असून बडतर्फ करण्याची प्रक्रिया चालू आहे. (अशा पोलिसांना पहिल्यांदाच बडतर्फच का केले जात नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

पोलिसांची मजल येथपर्यंत जाणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !