सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘२३.११.२०२५ या दिवशी कांचीपुरम्, तमिळनाडू येथील ‘गुरुनिवास’ या श्री. बालाजी कोल्ला (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५८ वर्षे) यांच्या निवासस्थानी एक दिवसाच्या साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात चेन्नई, मदुराई, वेल्लोर आणि आरणी येथील साधारण २५ साधक सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये साधकांना ‘सक्रीयपणे समष्टी सेवा कशी करावी ? सेवेचे नियोजन कसे करावे ? सेवेची व्याप्ती कशी काढावी ?’, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केले. ‘जिज्ञासूंना भ्रमणभाषद्वारे संपर्क करणे’, हा समष्टी सेवेचा एक भाग आहे. संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या सत्संगांना उपस्थित रहाण्यासाठी त्यांना निमंत्रित करणे आणि सत्संगाच्या आदल्या दिवशी त्यांना त्याची आठवण करून देणे’, असे या सेवेचे स्वरूप आहे. ‘ही सेवा अधिकाधिक परिणामकारक कशी करू शकतो ?’, याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी उपस्थित साधकांना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.  

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे  

‘संपर्काची सेवा’ करण्यापूर्वी १० मिनिटे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावे. त्यानंतर सेवेला आरंभ करावा. असे केल्याने स्वतःभोवती असलेल्या त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होते आणि सेवेत येणार्‍या अडथळ्यांचे प्रमाणही उणावते.

२. वातावरणाची शुद्धी करणे  

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

आपण सेवेला बसणार असलेल्या ठिकाणी सनातननिर्मित सात्त्विक उदबत्ती लावून वातावरणाची शुद्धी करावी. भीमसेनी कापराचे उपाय करावे. आपण लावलेल्या उदबत्तीची विभूती कपाळी लावावी. अशा पवित्र वातावरणात बसून ‘संपर्काची सेवा’ करावी.

३. संपर्काची सेवा करतांना स्वतःच्या मनातील भावाच्या स्थितीची नोंद केल्याने भावजागृतीचे प्रयत्न वाढवू शकणे 

आपण करत असलेला प्रत्येक संपर्क हा एक भावप्रयोग असायला हवा. प्रत्येक क्षणी आपली भावजागृती व्हायला हवी. संपर्काची सेवा करतांना ‘आपल्या मनात किती प्रमाणात भाव जागृत होता ?’, याची नोंद ठेवावी. सेवा करतांना ‘आपल्यातील भाव ४० टक्के होता कि ६० टक्के ?’, याची नोंद करावी. अशा प्रकारे प्रयत्न केल्यानंतर आपण स्वतःचे प्रगती-पत्रक (रिपोर्ट कार्ड) बनवू शकतो. ‘आपण करत असलेल्या प्रयत्नांमध्ये भावाची टक्केवारी अल्प आहे’, असे लक्षात आल्यावर निराश होण्याचे काहीच कारण नाही. आपल्याला मिळालेल्या गुणापेक्षा ‘प्रयत्न करणे’, अधिक महत्त्वाचे आहे. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ असे सुवचनच आहे.

४. भावपूर्ण सेवा केल्यानेच ती परिपूर्ण होत असणे  

साधकांनी संपर्काची सेवा करतांना ‘साक्षात् श्री सरस्वतीदेवी माझ्या जिभेवर वास करत आहे’, असा भाव ठेवावा. ‘मी स्वतः गुरुदेवांनाच संपर्क करत आहे’, असा भाव ठेवावा. संपर्क करणार्‍या व्यक्तीच्या नावासंदर्भातही आपण विचार करू शकतो, उदा. संपर्क करणार्‍या व्यक्तीचे नाव ‘बालाजी’ असेल, तर ‘साक्षात् श्री तिरुपती बालाजीशी आपण संवाद साधणार आहोत’, असा भाव ठेवावा. संपर्काची प्रत्येक सेवा झाल्यानंतर ‘संपर्क करण्यापूर्वी स्वतःच्या मनात असा भाव होता कि नाही ?’, याचे आत्मपरीक्षण करावे. जिज्ञासूंना संपर्क करण्यापूर्वी ‘तुमच्या मनात असा भाव असेल, तरच ती सेवा खर्‍या अर्थाने परिपूर्ण झाली’, असे समजावे.

५. संपर्काची सेवा करतांना ‘तुम्हाला मिळणार्‍या प्रतिसादावर नव्हे, तर तुमची भावस्थिती टिकून आहे ना ?’, यावर अधिक लक्ष असायला हवे.

६. कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू देऊ नयेत !  

आपली सेवा चालू असतांना काही वेळा कुटुंबातील सदस्य आपल्याला हाक मारतात किंवा कधीकधी सेवेत व्यत्यय आणतात. अशा वेळी ‘आपल्या मनात त्यांच्याविषयी प्रतिक्रिया उमटतात का ?’, याचेही आत्मपरीक्षण केले पाहिजे. मनात प्रतिक्रिया असतील, तर ती अल्प करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

७. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना स्वतःकडून होणार्‍या चुका अन् स्वत:ला जाणवलेले स्वभावदोष कुटुंबियांना विचारणे आवश्यक आहेत. 

८. नियमितपणे नामजपादी उपाय करणे, स्वभावदोष दूर करण्यासाठी स्वयंसूचना घेणे, स्वतःकडून वारंवार होणार्‍या चुकांसाठी प्रायश्चित्त घेणे, (प्रायश्चित्त घेतले नसेल, तर शिक्षा घेणे) आणि भावपूर्ण सेवा करणे, हे साधनेतील चार महत्त्वपूर्ण घटक आहेत.

९. आपल्याला समष्टी सेवेबरोबरच समष्टी भावही वाढवायचा आहे. केवळ समष्टी सेवा करतांनाच नव्हे, तर अगदी घरातील कामे करतांनाही आपल्यामध्ये भाव असायला हवा.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या समष्टी संत), चेन्नई, तमिळनाडू. (२५.११.२०२५)