या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !

‘धर्मप्रसार करत असतांना ‘अनेक वर्षांपासून साधना करणार्‍या साधकांच्या साधनेत कोणत्यातरी मार्गाने अडचणी निर्माण होऊन त्यांची साधना खंडित होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. ही प्रक्रिया हळूहळू पण इतक्या सहजपणे होते की, ‘साधकांच्या नकळत ते साधनेपासून दूर जाऊ लागतात.’ ही स्थिती पाहिल्यावर ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या ।’ हे गीत आठवून माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि मला स्फुरलेल्या काही ओळी पुढे दिल्या आहेत.

१. पाताळातील वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अडचणी आणून त्यांना साधना करण्यापासून परावृत्त करत असणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पुढील काळात अशा अडचणी वाढणार आहेत आणि त्यावर साधकांनी साधना वाढवणे हाच उपाय आहे’, असे आधीच सांगितलेले असणे 

साधना करत असतांना साधकांच्या जीवनात प्रामुख्याने ‘कुटुंबातील सदस्यांचे आजारपण उद्भवणे, आर्थिक संकट येणे, मुलांच्या ‘करिअर’कडे लक्ष द्यावे लागणे, नातवंडांना सांभाळावे लागणे, मायेचे आकर्षण वाटणे किंवा इतर काही’ अडथळे येत असतात. काही साधक व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी साधना करण्याचे सोडून देतात. यात युवा साधक आणि साधिका यांचे प्रमाण अधिक आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आपल्याला सांगतात, ‘‘साधना करणे’, हा ‘पार्टटाइम (अर्धवेळ) जॉब’ नसून ‘फुलटाइम (पुर्णवेळ) जॉब’ आहे.’’ पूर्वी पूर्णवेळ साधना करणारे काही साधक आता अर्धवेळ साधना करून नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत.

हा सर्व काळाचा महिमा आहे. पाताळातील वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अशा प्रकारचे अडथळे आणून त्यांना साधनेपासून परावृत्त करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पुढील काळात अशा अडचणी वाढणार आहेत आणि साधकांनी साधना वाढवणे हाच त्यावर उपाय आहे’, असे निक्षून सांगितले आहे.

पू. अशोक पात्रीकर

२. एका साधकाच्या घरी गेल्यावर सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लोभस रूप दिसणे अन् ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या’ ही ओळ आठवणे 

अशाच काही अडचणींमुळे साधना सोडलेल्या एका साधकाला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्याने मला त्याच्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या. तो साधक म्हणाला, ‘‘मी सेवा करत नसलो, तरीही माझ्या मनातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा जराही न्यून झाली नाही.’’ त्या क्षणी मला सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लोभस रूप दिसले. नंतर मला प्रसिद्ध गायिका कै. लता मंगेशकर यांनी पूर्वी आर्त स्वरात गायलेले ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या’ ही ओळ आठवली. या वेळी मला त्या गीताची केवळ एकच ओळ ठाऊक होती. मी त्या साधकांना ती ओळ सांगितली; मात्र त्यांना त्याचे फारसे महत्त्व वाटले नाही.

३. अमरावती सेवाकेंद्रात आल्यानंतर ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या’ हे गीत पूर्ण ऐकणे आणि त्यावर झालेले चिंतन

मी अमरावती सेवाकेंद्रात परत आल्यानंतर ते गीत पूर्ण ऐकले. मी ते गीत पूर्ण ऐकल्यावर मला ‘त्या साधकाच्या घरी असतांना सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप का दिसले ?’, याचा उलगडा झाला आणि माझे पुढीलप्रमाणे चिंतन झाले. तेव्हा माझी भावजागृती झाली.

३ अ. आपत्काळ समीप आला असल्याने साधकांनी घराकडे यावे, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला साधनामार्ग अनुसरावा !

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या ।
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या ।। धृ ।।

वरील ओळी वाचून मला वाटले, ‘साधना सोडून गेलेल्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रीतीने ‘चिमण्या’ म्हटले आहे आणि ते त्यांना ‘घराकडे’, म्हणजेच साधनामार्गावर परत बोलावत आहेत; कारण तिन्हीसांजा जाहल्या, म्हणजे आपत्काळ समीप आला आहे.’

३ आ. युद्धजन्य स्थिती असल्याने साधकांनी आईच्या (गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणांशी रहावे !

‘दाही दिशांनी येईल आता अंधाराला पूर ।
अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर ।।

या ओळी वाचून मला वाटले, ‘आता दाही दिशांनी युद्धजन्य स्थिती होत आहे. अशा वेळी चिमण्यांनी, म्हणजेच साधकांनी आईपासून, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापासून दूर राहू नये.’

३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्राणप्रिय असलेले साधक !

‘चुकचुक करिते पाल उगाच ।
चिंता मज लागल्या ।। २ ।।

वरील ओळी वाचून ‘विश्वात निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती ही ‘पुढे काहीतरी बिकट संकट येणार आहे’, याचा स्पष्ट संकेत आहे. साधक म्हणजे गुरुमाऊलींचा श्वास आहे. त्यामुळे गुरुमाऊलीला साधकांविषयी चिंता वाटत आहे’, असे मला जाणवले.

४. लेख लिहितांना स्फुरलेल्या कवितेच्या ओळी

या साधकांनो, परत फिरा रे साधनेकडे अपुल्या ।
असे भीषण काळ हा पुढला ।।

दाही दिशांनी येईल आता युद्धाचा पूर ।
अशा वेळी तुम्ही राहू नका रे गुरुमाऊलीपासून दूर ।। १ ।।

युद्धजन्य स्थिती संकेत देते भीषण काळाची ।
चिंता वाही गुरुमाऊली तुमच्या भविष्याची ।। २ ।।

गुरुमाऊलींनी सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणी शरणागतभावाने आणि कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’

– (पू.) श्री. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७६ वर्षे), अमरावती सेवाकेंद्र (२९.३.२०२६)

‘या लेखाचे प्राथमिक संकलन करतांना मला डोळ्यांसमोर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसू लागले आणि माझी भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.’ – सौ. अनघा पाध्ये, ढवळी, गोवा. (१७.६.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक