‘स्वतःची वर्तमानातील मनाची स्थिती पूर्णपणे स्वीकारणे’ ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून भक्तीसत्संगात स्रवलेले अमृतकण !

स्वतःचे मन स्वीकारता न येण्यामागील अडथळे आणि त्यांवरील आध्यात्मिक दृष्टीकोन

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या परम कृपेने भक्तीसत्संगाद्वारे स्वतःला स्वीकारण्याचे निरनिराळे पैलू साधकांसाठी उलगडले आहेत. जोपर्यंत साधक स्वतःची खरी सकारात्मक किंवा नकारात्मक मानसिक स्थिती स्वीकारत नाहीत, तोपर्यंत त्याला सुधारता येत नाही. याचसाठी ‘मनाला कसे स्वीकारायचे ?’, हे जाणून घेऊया.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘मनात केवळ चांगलेच विचार यावेत’, हा अट्टहास नको !

अनेकदा साधकांना वाटते की, ‘मी साधक आहे. मी साधना करतो, तर माझ्या मनात नेहमी सात्त्विक आणि चांगलेच विचार यायला हवेत. माझ्या मनात नकारात्मक किंवा अयोग्य विचार असू नयेत.’ या विचारामुळे साधकाच्या मनाची ऊर्जा आणखी व्यय होते.

१ अ . दृष्टीकोन : ‘आपल्या मनात नेहमी चांगलेच विचार यावेत’, हा विचार योग्य आणि आदर्श असला, तरी तसे ‘न होण्यामागे कारण काय आहे ?’, हे आधी समजून घ्यायला हवे. ‘मन हे संस्कारांचे गाठोडे आहे. ‘संकल्प’ आणि ‘विकल्प’ हे मनाचे कार्यच आहे. जोपर्यंत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होत नाही, तोपर्यंत ‘नकारात्मक विचार येणे’, ही प्रक्रिया चालूच रहाणार आहे. ‘आपण त्यात किती अडकतो ? त्यात अडकून दुःखी होतो कि ते विचार दूर करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतो ?’, हे साधकांनी पहायला हवे. मनात येणारे विचार म्हणजे ‘मी’ नसून ते ‘अयोग्य संस्कारांचे प्रतिबिंब आहेत’, हे स्वीकारून ‘मनाचा द्वेष न करता त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल ?’, या दृष्टीकोनातून प्रयत्न चालू ठेवावेत.

२. मनाची पालटणारी स्थिती न स्वीकारणे

अनेकदा साधकांच्या मनाची स्थिती कधी ‘सकारात्मक’, तर कधी ‘नकारात्मक’, अशी सातत्याने पालटत असते. जेव्हा मनाची स्थिती खालावते, तेव्हा ‘मी असाच आहे. माझ्यात कधीच पालट होणार नाहीत’, असे टोकाचे विचार मनात येतात.

२ अ. दृष्टीकोन : समुद्राला जशी भरती आणि ओहोटी येते, तसेच मनाचेही असते. मनात कधी सकारात्मक विचार येतात, तर कधी नकारात्मक ! ‘मनामध्ये सकारात्मक विचार येणे’, ही साधकांवरील ईश्वराची कृपा आहे, तर नकारात्मक विचार हा साधकांतील स्वभावदोषांचा परिणाम आहे. त्यामुळे मनाची स्थिती सकारात्मक असतांना ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करून त्या स्थितीचा लाभ घेत साधकांनी आपली साधना वाढवावी. जेव्हा मनाची स्थिती नकारात्मक किंवा उदास असते, तेव्हा त्यातच अडकून न रहाता त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आपले उत्तरदायी साधक, व्यष्टी आढावासेवक किंवा आध्यात्मिक मित्र यांच्याशी तत्परतेने बोलावे. मनमोकळेपणाने बोलले की, नकारात्मक विचारांवर मात करण्यास साहाय्य होते आणि नकारात्मक स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो.

३. इतरांशी होणारी तुलना

अनेकदा साधक स्वतःची तुलना इतरांशी करतात. ‘समोरच्याची स्थिती किंवा त्याचा स्वभाव किती चांगला आहे; पण माझे तसे नाही. मला त्याच्यासारखे वागायला जमत नाही.’ अशा प्रकारच्या तुलनेमुळे स्वतःचा स्वभाव स्वीकारता येत नाही. उलट स्वतःची स्थिती स्वीकारण्यास अधिक संघर्ष होतो.

३ अ. दृष्टीकोन : ईश्वराने प्रत्येकाची प्रकृती वेगळी घडवली आहे. प्रत्येकाची मानसिक जडणघडण, शारीरिक स्थिती, क्षमता, बुद्धी, स्वभाव, संचित, प्रारब्ध आदी गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दुसर्‍याच्या स्वभावाशी स्वतःची तुलना केल्यामुळे साधक दुःखी होतो. दुसर्‍याचा चांगला स्वभाव किंवा त्याचे गुण पाहून कौतुक अवश्य करावे; पण त्याच्याशी स्वतःची तुलना करू नये. त्यापेक्षा त्याच्या चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. ‘स्वतःच्या स्वभावात भगवंताला अपेक्षित असे पालट करणे’, हीच खरी साधना आहे. त्यामुळे स्वतःचा स्वभाव ओळखून स्वतःला स्वीकारून स्वतःमध्ये पालट करावा.

४. स्वतःची प्रतिमा जपणे

अनेक साधकांना समाजात किंवा साधकांशी बोलतांना ‘माझी प्रतिमा चांगली असावी, माझ्याबद्दल सगळ्यांचे मत चांगले असावे’, असे वाटत असते; पण प्रतिमा चांगली होण्यात आपलेच काही स्वभावदोष किंवा अहंचे पैलू बाधक ठरतात. अशा स्थितीत प्रतिमेमुळे स्वतःचे स्वभावदोष स्वीकारणे कठीण जाते.

४ अ. दृष्टीकोन : ‘प्रतिमा जपणे’ म्हणजे अहंकाराचे पोषण करणे होय. आपण ईश्वरप्राप्ती करण्यासाठी आलो आहोत. ज्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी धडपडायचे, त्याच्यापासून आपले काहीच लपलेले नसते. त्याला आपली अंतर्बाह्य स्थिती माहितच असते. मग इतरांसमोर प्रतिमा कशासाठी जपायची ? प्रतिमेमुळे साधनेतील आनंद अनुभवता येत नाही. जो स्वतःचे दोष प्रांजळपणे स्वीकारतो आणि इतरांनाही सांगतो, त्याची प्रतिमा गळून पडते आणि ईश्वराशी अनुसंधान जोडले जाते. स्वतःचे दोष प्रांजळपणे स्वीकारल्याने वागण्या-बोलण्यातही सहजता येते. ‘स्वतःची स्थिती ‘आहे तशी’ स्वीकारणे, हेच अहं निर्मूलनाचे खरे पाऊल आहे’, हे लक्षात घेऊन प्रतिमा दूर सारण्यासाठी प्रयत्न करावेत.

जेव्हा आपण स्वतःला स्वीकारत नाही, तेव्हा एक प्रकारे आपण स्वतःचा तिरस्कार किंवा द्वेष करतो. अशा वेळी आपली शक्ती त्या विचारांना विरोध करण्यात व्यय होते. ‘स्वतःमध्ये असे दोष का आहेत ?’, याचा विचार करून ‘सध्या माझी अशी स्थिती आहे, माझे असे दोष आहेत’, हे आपण स्वीकारले, तर आपल्याला त्या विचारांवर मात करण्यासाठी ऊर्जा मिळते.

साधकांनो, ‘वर्तमानात मन ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत त्याचा पूर्णपणे स्वीकार करणे’, ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे, हे लक्षात घेऊन स्वतःला स्वीकारून मन निर्मळ करण्यासाठी पहिले पाऊल उचला !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (२५.६.२०२६)