गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘सत्सेवा’ अन् कला !

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.  (लेखांक २२)             

‘कला-उपासकाला साधनेत प्रगती करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील एक अंग असलेल्या सत्संगाची आवश्यकता का असते ?’, हे आपण मागील लेखात पाहिले. ‘सत्सेवा’ हे गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील आणखी एक अंग आहे. आजच्या लेखात आपण सत्सेवेविषयी जाणून घेणार आहोत. 

‘गुरु-शिष्य परंपरा आणि गुरुकुल पद्धत’, हे भारताचे वैशिष्ट्य आहे. पूर्वी कला-उपासक संगीत, नृत्य इत्यादी कला गुरुगृही राहूनच शिकत असत. गुरुकुल पद्धतीमध्ये ‘गुरुसेवे’चे महत्त्व अनन्यसाधारण होते. पूर्वी गुरु विद्यादान करण्याआधी शिष्याची पारख करत असत. शिष्याला सर्वार्थांनी सिद्ध करून मगच ते त्याला विद्यादान करत असत. यामध्ये एक महत्त्वाचा घटक अंतर्भूत असायचा, तो म्हणजे गुरुगृही राहून केलेली सर्व प्रकारची सेवा, म्हणजे गुरूंच्या घरातील नित्य कामे अथवा गुरूंच्या स्थूलदेहाची सेवा, उदा. प्रतिदिन गुरूंचे पाय चेपणे, त्यांना काय हवे-नको, ते पहाणे इत्यादी. शिष्याच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन गुरु त्यांच्याकडील ज्ञान, कला शिष्याला मुक्त हस्ते देत असत.

आज काळानुसार गुरुकुल पद्धत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा सेवेचे महत्त्व समाजमनावर बिंबवण्याची आवश्यकता आहे. लेखाच्या या भागात आपण ‘सत्सेवा म्हणजे काय ? सेवा आणि काम यांत कोणता भेद आहे ? काळानुसार सर्वोत्तम सत्सेवा कोणती ?’, हे समजून घेणार आहोत.            

(भाग १)

१. ‘सत्सेवा’ म्हणजे काय ? 

सत् म्हणजे ईश्वर किंवा गुरु ! सत्सेवा म्हणजे ईश्वराची किंवा गुरूंची सेवा ! निःस्वार्थ भावाने, ईश्वराच्या आराधनेसाठी केलेली सेवा म्हणजे सत्सेवा. सत्सेवा ही केवळ एक कृती नसून ती व्यक्तीचे मन, बुद्धी आणि अंतःकरण शुद्ध करणारी साधना आहे. सत्सेवेला १०० टक्के महत्त्व आहे आणि सत्सेवेचा टप्पा गाठता येण्यासाठी अन् तो टिकवून ठेवण्यासाठी त्याला नामजप अन् सत्संग या दोन्ही सूत्रांची जोड देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

२. ‘सेवा’ आणि ‘काम’ यांतील भेद ! 

सुश्री तेजल पात्रीकर

एखादी कृती, उदा. केर काढण्याची कृती ही घरी करणे आणि एखाद्या संतांच्या आश्रमात किंवा मंदिरात करणे, यांत भेद आहे. आपण घरी केर काढण्यामागे ‘आपले घर स्वच्छ रहावे’, असा स्वकेंद्रित विचार असतो. ज्या वेळी आपण हीच कृती गुरूंच्या, संतांच्या आश्रमात किंवा मंदिरात करतो, त्या वेळी ‘संतांना ती कृती आवडावी, आपल्यावर ईश्वराची कृपा व्हावी, तसेच या कृतीतून माझी साधना व्हावी’, या सात्त्विक उद्देशाने ती करण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे कृती एकच असली, तरी त्यामागील आपले विचार आणि हेतू वेगवेगळे असतात. ‘काम’ करण्यापाठीमागे स्वार्थी भावनाही असू शकते; पण ‘सत्सेवा’ ही निरपेक्षभावाने केलेली असते. ‘स्व’ला त्यागून ईश्वराभिमुख होऊन आपण जी कृती करतो, ते ‘काम’ न रहाता ‘सत्सेवा’ होते.

३. सत्सेवा आणि असत्सेवा यांतील भेद 

समाजातील बरेच जण इतरांच्या भल्यासाठी काही कृती करत असतात, उदा. विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण विनामूल्य देणे, एखाद्या ठिकाणी संगीत विद्यालय चालू करणे इत्यादी. या व्यक्ती समाजातील स्वार्थी व्यक्तींपेक्षा (जे ‘मी’, ‘माझे’, असे स्वतःपुरते मर्यादित विचार करतात, त्यांच्यापेक्षा) निश्चितच श्रेष्ठ आहेत; पण साधनेच्या दृष्टीने ही असत्सेवाच झाली. याचे कारण म्हणजे हे करण्यामागे आपला ‘मी’पणा कार्यरत राहू शकतो. आधी निःस्वार्थ विचारातून कृती केली असेल, तरी पुढे यातून स्वतःच्या अपेक्षा आणि स्वार्थही वाढू शकतो. ही एक प्रकारे भावनेच्या भरात केलेली कृती असल्याने तिला ‘असत्सेवा’, असे म्हणता येईल. येथे ‘असत्सेवा, म्हणजे ‘खोटी सेवा’, असा अर्थ होत नाही.

साधनेच्या दृष्टीने साधकाने निरपेक्षतेने तन, मन आणि धन झोकून देऊन निःस्वार्थ भावाने केलेली भगवंताची सेवा ही खरी सत्सेवा आहे. अशा सत्सेवेने भगवंताची कृपा शीघ्र प्राप्त होते, उदा. संत मीराबाई, संत तुकाराम महाराज इत्यादी संत.

४. सत्सेवा केल्याने देवाची कृपा होऊन उद्धार झालेली खारूताई आणि वानरसेना ! 

रावणाच्या वधासाठी लंकेवर स्वारी करण्यासाठी वानरसेना श्रीरामाच्या मार्गदर्शनाखाली समुद्रावर सेतू बांधत होती. सेतू बांधण्यासाठी वानर मोठमोठे दगड उचलून ते पाण्यात टाकत होते. त्या वेळी तेथे एक इवलीशी खारही होती. ‘सेतू बांधण्याच्या ईश्वरी कार्यात आपलाही सहभाग व्हावा’, यासाठी ती छोटीशी खारूताई समुद्राच्या पाण्यात जाऊन आपले अंग ओले करायची आणि वाळूत लोळायची. त्यानंतर ती सेतूच्या ठिकाणी जाऊन आपले अंग झटकायची. त्यामुळे तिच्या अंगाला चिकटलेले वाळूचे कण त्या सेतूवर पडायचे. या ठिकाणी सेतूच्या निर्माणाच्या दृष्टीने विचार केला, तर खारूताईचे कार्यात्मक योगदान अत्यल्प होते; पण ती तिच्या क्षमतेप्रमाणे ईश्वरी कार्यात सहभागी झाली होती. त्यामुळेच इवल्याशा खारूताईला प्रभु श्री रामचंद्राने उचलून हातांत घेतले आणि तिच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. तेव्हा तिने मनोभावे केलेली सेवाही ईश्वरचरणी रुजू झाली आणि तिचा उद्धार झाला.

श्रीरामाच्या सेनेत वानरांचाही सहभाग होता. प्रत्येक वानर युद्धात ‘श्रीरामाची सेवा’ या भावाने लढला. त्यामुळे श्रीरामाने संपूर्ण वानरसेनेचा उद्धार केला. आपणही खारूताई आणि वानरसेना यांचा आदर्श ठेवून आपल्या क्षमतेनुसार ईश्वरप्राप्तीसाठी कलेच्या माध्यमातून सत्सेवा करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यावरही देवाची कृपा निश्चित होईल.

५. संतांनी केलेली सत्सेवा ! 

पूर्वीच्या काळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत कबीर, संत मीराबाई यांसारख्या अनेक संतांनी अभंग, दोहे, भजन, कीर्तन या माध्यमांतून सामान्य लोकांपर्यंत भगवद्भक्ती पोचवली. त्यांनी त्यांच्या गायनकलेच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यामुळे समाजातील अनेक लोक साधनेकडे वळू लागले. ही संतांनी कलेच्या माध्यमातून केलेली समष्टी सेवाच होती.

६. काळानुसार ‘अध्यात्माचा प्रसार करणे’ ही सर्वाेत्तम सत्सेवा असणे 

ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणार्‍या साधक-कलाकाराच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सत्सेवेच्या माध्यमातून संत किंवा गुरु यांचे मन जिंकता येते आणि त्या माध्यमातून गुरुकृपा कार्यरत होते.

व्यवहारातील एखाद्या कार्यक्रमात आपल्याला एखादी कृती करण्यासाठी साहाय्याची आवश्यकता असेल आणि त्याच वेळी एखाद्या व्यक्तीने तेथे येऊन आपल्याला साहाय्य केले, तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी आपुलकी वाटू लागते. याउलट जर ती व्यक्ती आपल्याला सोडून इतरांच्या साहाय्याला गेली, तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी तेवढी आपुलकी वाटत नाही. साधनेतही तसेच आहे. ‘समाजाला खर्‍या आनंदाकडे नेणार्‍या अध्यात्माचा प्रसार करणे’, हे कोणतेही संत किंवा गुरु यांचे कार्य आहे. या प्रसारकार्यामध्ये आपण आपल्या क्षमतेप्रमाणे सेवाभावाने सहभागी झालो, तर गुरु किंवा संत यांनाही वाटते, ‘हा माझा आहे.’

‘आध्यात्मिक अधिकारी असलेले संत किंवा गुरु यांना साधक आपलेसे वाटणे, त्यांचे मन जिंकणे’, यांमुळे साधक-कलाकारावर गुरूंची कृपा होते. परिणामी साधक-कलाकाराची प्रगती शीघ्रतेने होऊ लागते. सत्सेवा मनापासून आणि ‘जाणोनी श्रींचे मनोगत’, या भावाने केली, तर ती सेवा गुरुचरणी रुजू होते. त्यामुळे ‘साधक-कलाकाराने स्वतः कलेतून साधना करण्यासह कलेविषयी इतरांनाही सांगणे, समाजात त्याविषयी जागृती करणे’, ही आजच्या काळातील सर्वाेत्तम सत्सेवा आहे.

७. अध्यात्मप्रसाराच्या सत्सेवेमुळे मिळणार्‍या निरपेक्ष आनंदाविषयी इतरांना सांगून आनंद द्विगुणीत करा ! 

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात,

जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे । 
शहाणे करून सोडावे सकळ जन ।।

अर्थ : आपल्याला जे ठाऊक असते, ते हळूहळू इतरांना शिकवावे. अशा प्रकारे सर्वांना शिकवून शहाणे करावे.

‘मला कला-साधनेविषयी तेवढे ठाऊक नाही, तर मी इतरांना काय सांगावे ?’, असा विचार काहींच्या मनात येऊ शकतो. त्या वेळी त्यांना कला-साधनेविषयी जेवढे कळले असेल आणि त्यांनी स्वतः साधनेच्या काही कृतींना आरंभ केला असेल, तर ते अशा सूत्रांविषयी इतरांना सांगू शकतात. यातून त्यांची सत्सेवाच घडणार आहे. ज्याप्रमाणे व्यवहारात आपण आपल्याला झालेला आनंद इतरांना सांगून तो द्विगुणीत करत असतो, त्याचप्रमाणे अध्यात्मप्रसाराच्या सत्सेवेमुळे मिळणार्‍या निरपेक्ष आनंदाविषयी इतरांना सांगितल्यास तो आनंदही द्विगुणीत होतो. आपणही सत्सेवा करून या निरपेक्ष आनंदाची अनुभूती घेऊया.

८. साधक-कलाकाराची सत्सेवा 

संगीत कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ते जनजागृती, भक्तीचा प्रसार आणि मनःशुद्धी यांचे प्रभावी माध्यम आहे. जेव्हा कलाकार आपली कला ईश्वरभक्ती, संस्कारवर्धन आणि समाजहित यांसाठी अर्पण करतो, तेव्हा ती साधक-कलाकाराची सत्सेवाच बनते.

या लेखाच्या पुढील भागात आपण ‘साधक-कलाकाराला त्याच्या साधनेत होणारा सत्सेवेचा लाभ आणि कला क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी सांगितलेले सेवेचे महत्त्व’, जाणून घेणार आहोत.’

– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.६.२०२६)

(क्रमशः)