हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !

  • शरद पवार यांनी ‘वैकुंठगमना’विषयी वक्तव्य केल्याचे प्रकरण

  • संतांचा इतिहास आणि वारकरी अस्मिता यांच अवमान केल्याचा आरोप !

मुंबई – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऐन आषाढी वारीच्या पवित्र काळात हिंदू आणि वारकरी समाज यांच्या भावना दुखावल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पुण्यातील आकुर्डी येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात शरद पवार म्हणाले होते, ‘‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही. एका विशिष्ट वर्गाने आपली कृत्ये लपवण्यासाठी या गोष्टी थोपवल्या आणि त्या खर्‍या मानण्यासारखे केले.’’ यावर समितीने तीव्र आक्षेप घेतला.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन ही केवळ भावनिक श्रद्धा नसून ही घटना वारकरी परंपरा आणि संत साहित्य यांचा पवित्र गाभा आहे. संत बहिणाबाई, संत निळोबाराय यांच्या अभंगांत, तसेच महिपतीबुवांच्या ‘भक्तविजय’ आणि ‘भक्तलीलामृत’ या प्रमाणग्रंथांत याचे सविस्तर वर्णन केले आहे.

२. स्वतःला पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी दाखवण्याच्या नादात राजकीय हेतूने प्रेरित होऊन संतांचा इतिहास आणि वारकरी अस्मिता यांची मोडतोड केली जाते.

३. शरद पवार यांनी यापूर्वीही वारकरी संप्रदायावर आक्षेप घेत त्यांना धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न केला होता आणि हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍यांना मूकसंमती दिली होती.

सविस्तर वृत्त वाचा → (म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार

४. ‘वारंवार हिंदु धर्म आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा चिरडण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया वारकरी संघटना आणि विचारवंत व्यक्त करत आहेत.

५. ‘या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांचे वैकुंठगमनाविषयीचे वादग्रस्त वक्तव्य त्वरित मागे घ्यावे आणि समस्त वारकरी संप्रदाय, विठ्ठलभक्त अन् हिंदु बांधव यांची जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

६. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि समाजात जाणीवपूर्वक वैचारिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गृह मंत्रालय अन् राज्य शासन यांची गंभीर नोंद घेऊन योग्य ती कायदेशीर चौकशी आणि कठोर कारवाई करावी, अशी आग्रही विनंती मुख्यमंत्री अन् गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.