Pakistan Foreign Women Rape : पाकिस्तानी उपपंतप्रधानांच्या नातेवाईकाकडून परदेशी महिलांवर सामूहिक बलात्कार

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – लाहोर येथे २ विदेशी महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पाकिस्तान पोलिसांनी मोठी कारवाई करत देशाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांच्या एका जवळच्या नातेवाईकासह ४ आरोपींना अटक केली. या घटनेमुळे पाकिस्तानमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलांपैकी एक महिला नेदरलँड्सची, तर दुसरी व्हेनेझुएलाची नागरिक आहे. २९ जून रोजी या दोन्ही महिला लाहोर येथे आल्या होत्या. विमानतळावरून बाहेर पडताच आरोपींनी त्यांचे अपहरण केले आणि एका घरात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर महिलांना सोडण्यासाठी आरोपींनी खंडणीचीही मागणी केली. जेव्हा एका पीडित महिलेच्या वडिलांनी थेट स्पेनमधून पाकिस्तान पोलिसांना भ्रमणभाष करून ‘माझी मुलगी संकटात आहे’, अशी माहिती दिली, त्या वेळी या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी तातडीने अन्वेषण चक्र फिरवून दोन्ही परदेशी महिलांची सुरक्षित सुटका केली. या दोन्ही विदेशी महिला आणि मुख्य आरोपी महंमद रझा डार यांची भेट ऑक्टोबर २०२५ मध्ये सिंगापूरमध्ये झाली होती. हे तिघेही एका व्यवसायाशी संबंधित होते. रझा डारनेच या महिलांना पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिले होते; मात्र विश्वासाने पाकिस्तानात आलेल्या या महिलांना तिथल्या विमानतळावर उतरताच नरकयातना सहन कराव्या लागल्या.

संपादकीय भूमिका

भारतात स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणी गळा काढणार्‍या आंतरराष्ट्रीय संघटना आता कुठल्या बिळात जाऊन लपल्या आहेत ?