२१ जून या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ आहे. त्या निमित्ताने...
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सूर्यनमस्कार घातल्याने व्यक्तीची कुंडलिनीचक्रे कार्यरत आणि संतुलित बनतात’, असे योगशास्त्र (हठयोग आणि पातंजलयोग), तसेच आयुर्वेद यांत सांगितले आहे. सूर्यनमस्कार घालतांना मणक्याच्या वरच्या आणि खालच्या दिशेने होणार्या हालचालींमुळे मणक्याच्या तळाशी असलेल्या मूलाधारचक्रातील सुप्त कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती सुषुम्ना नाडीतून वरच्या दिशेने खेचली जाण्यास साहाय्य होते. सूर्यनमस्काराच्या अंतर्गत येणारी १२ आसने करतांना सूर्याच्या १२ नावांशी निगडित मंत्र म्हटल्याने ही प्रक्रिया अधिक सखोल आणि तीव्र होते.
२१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सूर्यनमस्काराच्या व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांवर होणार्या परिणामाविषयीचा हा लेख प्रसिद्ध करत आहोत. ‘सूर्यनमस्कार घालण्याचा साधकाच्या कुंडलिनीचक्रांवर काय परिणाम झाला ?’, याचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने अभ्यास करण्यात आला. यासाठी ३१.१२.२०२५ या दिवशी ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (टीप १) या वैज्ञानिक उपकरणाने डॉ. भिकाजी भोसले (वय ७० वर्षे) यांनी ‘सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी आणि संबंधित मंत्रोच्चारांसह १२ सूर्यनमस्कार घातल्यानंतर’ मोजणीच्या नोंदी घेण्यात आल्या. या उपकरणाद्वारे व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांची स्थिती अभ्यासता येते.

१. ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रातील सप्तचक्रांचा आकार आणि स्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे
१ अ. चक्राचा आकार : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या संगणकीय चित्रातील एखाद्या चक्राचा आकार योग्य असणे, म्हणजेे त्या चक्राशी संबंधित अवयवांना त्या चक्राकडून योग्य प्रमाणात सूक्ष्म ऊर्जेचा पुरवठा होत असणे होय.
१ आ. चक्राची स्थिती : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रामध्ये चक्र मध्यरेषेवर किंवा तिच्या जवळ असणे, म्हणजे चक्राची स्थिती ‘संतुलित’ असणे होय.

१ इ. चक्रांचे कार्य : सामान्यतः मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही खालची ३ चक्रे व्यक्तीला शारीरिक कार्यासाठी लागणारी सूक्ष्म ऊर्जा पुरवतात, तर अनाहत, विशुद्ध, आज्ञा अन् सहस्रार ही वरील ४ चक्रे व्यक्तीला मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यांसाठी लागणारी सूक्ष्म ऊर्जा पुरवतात.
१ ई. व्यक्तीची डावी आणि उजवी बाजू यांचे कार्य : योगशास्त्रानुसार व्यक्तीच्या डाव्या बाजूला इडा किंवा चंद्र नाडी आणि उजव्या बाजूला पिंगला किंवा सूर्य नाडी असते. चंद्र नाडी शीतल, तर सूर्यनाडी प्रखर असते. व्यक्तीची डावी बाजू सूक्ष्मातील कार्यासाठी, तर उजवी बाजू स्थुलातील कार्यासाठी पूरक असते.
१ उ. चक्र मध्यरेषेच्या डावीकडे किंवा उजवीकडे असणे : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रामध्ये एखादे चक्र मध्यरेषेच्या डावीकडे असणे, म्हणजे ते चक्र अकार्यरत (निर्गुण स्थितीत) असणे किंवा अंतर्मुखता आली असणे. तसेच एखादे चक्र मध्यरेषेच्या उजवीकडे असणे, म्हणजे ते चक्र कार्यरत (सगुण स्थितीत) असणे किंवा बहिर्मुखता आली असणे.
२. ‘साधकाने सूर्यनमस्कार घालणे’, याचा त्याच्या प्रत्येक चक्रावर झालेल्या परिणामांचा केलेला तुलनात्मक अभ्यास
या प्रयोगामध्ये ‘साधकाच्या कुंडलिनीचक्रांची स्थिती कशी होती ?’, हे कळावे, यासाठी सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी आणि १२ सूर्यनमस्कार घातल्यानंतर ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपलेली संगणकीय चित्रे पुढीलप्रमाणे आहेत.
या चित्रांत ‘वरून खाली’ या क्रमाने १. सहस्रार, २. आज्ञा, ३. विशुद्ध, ४. अनाहत, ५. मणिपूर, ६. स्वाधिष्ठान आणि ७. मूलाधार ही चक्रे दर्शवली आहेत. (ही चित्रे खाली दिली आहेत.)

|
टीप १- ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणाची माहिती
रशियातील डॉ. कॉन्स्टनटीन कोरोटकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायजेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित ‘बायो-वेल’ हे उपकरण बनवले आहे. व्यक्तीच्या ऊर्जेचे परीक्षण करण्यास उपयुक्त असा एक छायाचित्रक (कॅमेरा) आणि संगणकीय प्रणाली यात वापरलेली आहे. या उपकरणाद्वारे परीक्षण करतांना व्यक्तीच्या हाताच्या प्रत्येक बोटाला एक वेदनारहित हलकासा विद्युत् झटका एका सेकंदापेक्षाही कमी कालावधीसाठी दिला जातो. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेतून ‘फोटॉन’ आणि ‘इलेक्ट्रॉन’ या अतीसूक्ष्म कणांच्या होणार्या प्रक्षेपणास चालना मिळते. प्रत्येक बोटातून होणार्या ‘फोटॉन’ कणांच्या प्रक्षेपणाची छायाचित्रे ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपली जातात आणि त्याच्या आधारे संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने व्यक्तीचे ऊर्जाक्षेत्र आणि तिची कुंडलिनीचक्रे यांची माहिती मिळते. |
३. केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून सार रूपात मांडलेली सूत्रे आणि त्यांचे आध्यात्मिक विश्लेषण
३ अ. १२ सूर्यनमस्कार घातल्यानंतर साधकाच्या कुंडलिनीचक्रांमध्ये झालेले पालट

३ अ १. ६ चक्रांचे आकार वाढणे : साधकाने मंत्रोच्चारांसहित १२ सूर्यनमस्कार घातल्यामुळे सर्व चक्रांना ऊर्जा मिळाली. फलस्वरूप त्यांची सहस्रार, आज्ञा, अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार या ६ चक्रांचा आकार वाढला. साधकाच्या शारीरिक कार्याशी संबंधित मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार ही तिन्ही चक्रे, तसेच ‘मानसिक, बौद्धिक अन् आध्यात्मिक’ या उच्च कार्यांशी संबंधित वरील ४ चक्रांपैकी ३ चक्रे यांना ऊर्जा मिळाल्यामुळे आता त्यांची ही कार्ये अधिक चांगली होऊ शकतील. ही आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्थिती आहे.
३ अ २. विशुद्धचक्राचा आकार न्यून होणे : साधकाने सूर्याची १२ नावे उच्चारत १२ सूर्यनमस्कार घातले होते. त्याने या १२ मंत्रांचे उच्चारण वैखरीतून, म्हणजे तोंडाने केले असल्यामुळे आणि तोंड विशुद्धचक्राशी निगडित असल्यामुळे त्या चक्रावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय सर्वांत जास्त झाले. फलस्वरूप त्या चक्रात असलेली त्रासदायक शक्ती घटली. त्यामुळे त्या चक्राचा आकार थोडा न्यून झाला. तसेच ते चक्र अकार्यरत झाले. हीसुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या चांगली स्थिती आहे.
३ अ ३. ४ चक्रे ईश्वरी तत्त्व ग्रहण करण्यासाठी मध्यरेषेलगत किंवा मध्यरेषेवर जाणे : सूर्यनमस्कार घातल्यानंतर साधकाची सहस्रार, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार ही ४ चक्रे मध्यरेषेलगत आली. त्यांपैकी मणिपूर आणि स्वाधिष्ठान ही चक्रे प्रत्यक्ष मध्यरेषेवर आली. मध्यरेषा म्हणजे कुंडलिनीशक्तीची सुषुम्ना नाडी. चक्रे या नाडीच्या जवळ आली की, ती ईश्वरी तत्त्व ग्रहण करण्यासाठी पूरक बनतात. आध्यात्मिकदृष्ट्या ही चांगली स्थिती आहे.
३ अ ४. ३ चक्रे अकार्यरत होणे : सूर्यनमस्कार घातल्यानंतर साधकाची आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत ही चक्रे अकार्यरत झाली. त्यांपैकी आज्ञा आणि अनाहत ही चक्रे सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी कार्यरत होती, तर विशुद्धचक्र मध्यरेषेलगत; पण कार्यरततेच्या दिशेने होते. सूर्यनमस्कारातून ऊर्जा मिळूनही चक्रे अकार्यरत झाली, याचा अर्थ ती अंतर्मुख झाली. ही आध्यात्मिकदृष्ट्या चांगली स्थिती आहे; कारण अंतर्मुखता ही साधनेतील मनोलयासाठी पूरक असते.
४. निष्कर्ष
सूर्यनमस्कार घातल्यामुळे शारीरिक कार्यांशी निगडित मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार, तसेच उच्च कार्यांशी निगडित सहस्रार, आज्ञा अन् अनाहत या चक्रांचा आकार वाढला, तसेच साधकाची ४ चक्रे ईश्वरी तत्त्व ग्रहण करण्यासाठी पूरक बनली अन् ३ चक्रे अंतर्मुख झाली. वैखरीतून मंत्रोच्चार करत सूर्यनमस्कार घातल्यामुळे विशुद्धचक्रावर सर्वाधिक आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन त्या चक्राचा आकार न्यून झाला. हा पुष्कळ मोठा परिणाम आहे.
या प्रयोगातून ‘सूर्यनमस्कार घालणे’ हे व्यक्तीच्या जीवनाच्या सर्वच अंगांसाठी लाभदायक आहे’, हे स्पष्ट होते.’
– डॉ. (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.६.२०२६)
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
ध्यान
हठयोग
ध्यानाचे प्रमुख शारीरिक उपयोग !
अनेक शास्त्रे सांगणारी भारतीय संस्कृती !
मंत्रांसह सूर्यनमस्कार शिकून अनुभवा स्वास्थ्य आणि शक्ती !