एका विस्थापित पाकिस्तानी हिंदूचा अनुभव !

पाक येथून अनेक पाकिस्तानी हिंदू भारतात निर्वासित झाले आहेत. काही जण कुटुंबासह भारतात आले आहेत. या हिंदूंनी पाकमधील असुरक्षितता अनुभवली आहे आणि भारतात आल्यावर त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. या हिंदूंपैकी एका हिंदूचा अनुभव येथे देत आहोत.

तीन दशके उलटून गेल्यानंतरही काश्मीर खोऱ्यात परतता न आल्यामुळे आक्रोश करतांना कश्मीरी हिंदू (संग्रहीत छायाचित्र )

माझा जीवन वृत्तांत !

माझे नाव चितम कुमार शर्मा आहे. मी किशोर कुमार शर्मा यांचा मुलगा आहे आणि पुष्करनाथ ब्राह्मण कुटुंबाशी संबंधित आहे. मी मूळचा पाकिस्तानी असून वर्ष २०१३ मध्ये मी माझ्या कुटुंबासह पाकिस्तानमधून भारतात आलो.

पाकिस्तानमधून भारतात जायचा निर्णय का घेतला ?

पाकिस्तानमध्ये रहात असतांना आम्हाला असे जाणवले की, हिंदु समुदाय, विशेषतः महिला आणि मुले यांच्या सुरक्षेविषयी गंभीर आव्हाने तेथे होती. अनेक घटनांमध्ये हिंदु कुटुंबांवर सामाजिक आणि धार्मिक दबाव आणला जात असे. मुलींचे अपहरण आणि बळजोरीने धर्मांतर करण्यासारख्या घटनाही समोर येत होत्या. या परिस्थितीचा विचार करता आम्हाला आमच्या मुलांच्या भविष्याची, त्यांच्या सुरक्षेची, तसेच आमच्या हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाची चिंता वाटू लागली.

याच कारणांमुळे आम्ही निर्णय घेतला की, आम्ही भारतात येऊन आमच्या मुलांना एक सुरक्षित वातावरण देऊ, जिथे ते आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीसह सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील. याच उद्देशाने जुलै २०१३ मध्ये आम्ही भारतात आलो.

भारतात आलेल्या अडचणी

श्री. चितम कुमार शर्मा

भारतात आल्यानंतर आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रारंभीच्या वर्षांत नोकरी मिळवणे अत्यंत कठीण होते. ‘लाँग टर्म व्हिसा’ (दीर्घकाळासाठी प्रवेशाची अनुमती) मिळवण्याची प्रक्रिया पुष्कळ मोठी आणि गुंतागुंतीची होती. आवश्यक ओळखपत्रे जसे की, आधारकार्ड, पॅन कार्ड आणि वाहनचालक परवाना उपलब्ध नसल्यामुळे दैनंदिन जीवनातही अनेक समस्या आल्या. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आम्हाला ‘लाँग टर्म व्हिसा’ मिळाला, ज्याच्या साहाय्याने आवश्यक कागदपत्रे बनू शकली आणि परिस्थिती हळूहळू सुधारू लागली.

भारतात आल्याच्या साधारण २ वर्षांनंतर जयपूर, राजस्थान येथे माझी भेट ‘निमित्तेकम्’चे श्री. जय आहुजा आणि डॉ. ओमेंद्र रत्नू यांच्याशी झाली. त्यांनी मला प्रोत्साहित केले आणि ‘निमित्तेकम्’ या त्यांच्या संस्थेशी जोडण्याची संधी दिली. या संस्थेचा उद्देश पाकिस्तानासह विविध ठिकाणांहून आलेल्या हिंदु निर्वासित कुटुंबांना साहाय्य करणे, हा होता.

‘निमित्तेकम्’ संस्थेच्या माध्यमातून मिळालेले साहाय्य आणि तिचे कार्य

निमित्तेकम्’ संस्थेमध्ये मला आणि माझे सहकारी श्री. गोवर्धन यांना काम करण्याची संधी मिळाली. आम्ही मिळून अनेक कुटुंबांना कायदेशीर कागदपत्रे, व्हिसाशी संबंधित प्रक्रिया, स्थानिक पातळीवर स्थायिक होणे आणि पुनर्वसन यांमध्ये साहाय्य केले. संस्थेच्या माध्यमातून आम्ही अशा कुटुंबांना मार्गदर्शन केले, जे भारतात येऊन नवीन जीवन चालू करू इच्छित होते.

आत वर्ष २०२६ चालू आहे, आतापर्यंत मला हे समाधान आहे की, मी केवळ माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठीच नाही, तर इतर अनेक विस्थापित हिंदु कुटुंबांसाठीही साहाय्याचा हात बनू शकलो. जरी एप्रिल २०२५ पासून व्हिसा संबंधित परिस्थितीमध्ये पालट झाला असला, तरी ‘निमित्तेकम्’ संस्था सध्या भारतात रहात असलेल्या कुटुंबांना साहाय्य, पुनर्वसन, कागदपत्रे सिद्ध करणे आणि सामाजिक सहकार्य करण्याच्या कार्यात निरंतर सक्रीय आहे.

ज्या व्यक्ती आणि संस्था यांनी कठीण काळात माझी अन् माझ्या कुटुंबाची साथ दिली, तसेच आम्हाला सन्मानपूर्वक जगण्याची संधी दिली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.

हर हर महादेव । जय श्रीराम ।

– श्री. चितम कुमार शर्मा, जयपूर, राजस्थान (पाकिस्तान येथून भारतात आलेले विस्थापित हिंदु).

श्री. चितम कुमार शर्मा