वन विभाग आणि कॉर्पोरेट ‘सी.एस्.आर्.’च्या संयुक्त प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी संमत  

 सह्याद्रीच्या कुशीतील तिवडी गावाचा २० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला !

रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची गंभीर पाण्याची समस्या मार्गी लागली आहे. वन विभाग आणि नागपूरच्या खाजगी आस्थापनांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (CSR) संयुक्त प्रयत्नातून गावातील ऐतिहासिक पाण्याच्या कुंडाच्या (तळी) पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.

डोंगरदर्‍यांची पायपीट आणि ‘टँकर’चा शाप

तिवडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती. ग्रामस्थांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी कठीण डोंगर उतरून आजूबाजूच्या गावांत भटकंती करावी लागत असे. उन्हाळ्यात गावाला ‘टँकर’ने पाणीपुरवठा करावा लागत होता. वर्ष २०२१ च्या अतीवृष्टीमध्ये गावातील पाण्याचा मुख्य स्रोत असलेले पारंपरिक कुंड ढासळल्याने हा प्रश्न अधिकच जळजळीत बनला होता.

तांत्रिक अडचणींवर ‘सी.एस्.आर्.’चा मार्ग

हे कुंड खाजगी जागेत असल्याने शासकीय निधी मिळण्यात कायदेशीर अडचणी होत्या. यावर माजी सरपंच प्रकाश पवार यांनी वन विभागाकडे साहाय्य मागितले. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई (पाटील) यांनी तांत्रिक अडचणींवर पर्याय शोधत नागपूरच्या ‘लॉईड्स मेटल एनर्जी अँड ऋषभ मेटा इस्पात प्रा.लि.’ आस्थापनेकडे ‘सी.एस्.आर्.’ अंतर्गत प्रस्ताव पाठवला. आस्थापनाच्या प्रतिनिधी सौ. इंद्रायणी यांनी तात्काळ १० लाख रुपयांचा निधी संमत केला.

विशेष कार्यक्रमात निधी सुपुर्द

तिवडी गावात आयोजित एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा निधी हस्तांतरित करून कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी वन विभागाचे अधिकारी, आस्थापनाचे प्रतिनिधी, तिवडीच्या महिला सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय यंत्रणा आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या या संवेदनशीलतेमुळे ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले आहेत.