पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !

 ‘माझी पत्नी सौ. सुप्रिया घाटगे यांना अनुमाने १३.४.२०२६ या दिवसापासून डोकेदुखीचा पुष्कळ त्रास होत होता. अनेक वैद्यकीय उपचार करूनही पत्नीची डोकेदुखी न्यून झाली नाही. तिला असह्य वेदना होत होत्या. तज्ञ आधुनिक वैद्यांनी ‘एम्.आर्.आय’ आणि ‘सीटी स्कॅन’(MRI, CITI SCAN) (आधुनिक यंत्रांद्वारे मेंदूची तपासणी करण्याची एक चिकित्सा पद्धत) करण्यास सांगितले. त्या अहवालात ‘पत्नीच्या मेंदूभोवती रक्तस्राव झाला आहे’, असे आढळले. ‘आधुनिक वैद्यांनी तातडीने शस्त्रकर्म करणे आवश्यक आहे’, असे सांगितले. २८.४.२०२६ या दिवशी पत्नीचे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि मी अनुभवलेली गुरुकृपा याविषयी येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी नामजपादी उपाय करायला सांगणे

‘या प्रसंगात आम्ही सद्गुरु स्वाती खाडये (वय ४८ वर्षे) यांना पत्नीच्या शस्त्रकर्माविषयी सांगितले. त्यांनी ‘महाशून्य’ हा नामजप करण्यास सांगितला आणि ‘काका, काळजी करू नका’, असा आश्वस्त करणारा कृपाशीर्वादही दिला.

श्री. संजय घाटगे

२. कुटुंबातील वैचारिक मतभेद दूर होऊन सर्वांनी एकमेकांना साहाय्य करणे आणि प्रसंगाला धिराने सामोरे जाणे

आमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता असल्याने आमच्यात थोडा दुरावा होता; परंतु या प्रसंगात ‘आमची मने जुळली आहेत’, हे माझ्या लक्षात आले.

माझा मोठा मुलगा शिवराज या कठीण परिस्थितीत आईला (सौ. सुप्रिया घाटगे यांना) धीर देऊन ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव तुझ्या समवेत आहेत’, असे सांगत होता. तिला नामजपादी उपाय करण्याची आठवण करून देत होता. मुलाला मी ‘तू घरीच थांब’, असे सांगितल्यावर त्याने ते सहजतेने स्वीकारले. माझी कन्या सायली ही अत्यंत भावनाप्रधान असूनही तिने हा प्रसंग सहजतेने स्वीकारला. तिनेही आईला धीर दिला. ती रुग्णालयात प्रसंगानुरूप सर्व करत होती.

सौ. सुप्रियाचा स्वभाव अत्यंत भित्रा आहे; मात्र या प्रसंगाला ती धिराने सामोरे गेली. तिचे शस्त्रकर्म यशस्वीपणे पार पडले. त्या वेळी ‘देवच आपल्याला प्रत्येक प्रसंगात घडवतो’, हे माझ्या लक्षात आले.

सौ. सुप्रिया घाटगे

३. साधक आणि नातेवाईक यांनी आधार देणे 

साधकांनी ‘समष्टी प्रार्थना करणे, वेळोवेळी नामजपादी उपाय सांगणे, माझ्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करून आम्हाला आधार देणे’, असे आम्हाला साहाय्य केले. सर्व नातेवाइकांनीही माझ्या पत्नीची सतत विचारपूस करून आमच्या कुटुंबाला आधार दिला.

४. ‘मेंदूच्या रोगावरील शल्यचिकित्सक निष्णात आधुनिक वैद्य डॉ. संतोष प्रभु यांच्या रूपात गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) शस्त्रकर्म करत आहेत’, अशी आमची श्रद्धा होती. त्यामुळे माझ्या पत्नीचे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडले.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण आचरणात आणता येणे

मी साधनेत येण्यापूर्वी माझ्यामध्येही पुष्कळ भावनाप्रधानता होती; मात्र आमच्या गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) शिकवल्याप्रमाणे पत्नीच्या शस्त्रकर्माच्या कालावधीत मला स्थिर राहून हा प्रसंग स्वीकारता आला. मला पत्नी आणि मुले यांना धीर देऊन योग्य निर्णय घेता आला अन् सर्व भार गुरूंवर सोपवून शरणागतभावाने रहाता आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, माझ्या पत्नीच्या शस्त्रकर्माच्या कालावधीत आपल्याच कृपेमुळे जे अनुभवता आले, ते मी आपल्या चरणी अर्पण करून कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. संजय घाटगे (सौ. सुप्रिया यांचे यजमान, वय ६३ वर्षे), जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (२.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक