मोक्षनगरी अयोध्येत मृत्यू होण्याचे भाग्य लाभलेल्या नागपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. जयश्री श्रीकांत क्षीरसागर (वय ७१ वर्षे) यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

११.६.२०२६ या दिवशी सौ. जयश्री क्षीरसागर यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने....

३०.५.२०२६ या दिवशी नागपूर येथील सनातनच्या साधिका सौ. जयश्री श्रीकांत क्षीरसागर (वय ७१ वर्षे) यांचे अयोध्या येथे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर क्षीरसागर कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर

१. ‘भगवंताने प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूची वेळ आणि स्थळ आधीच ठरवलेले असते’, याची आलेली प्रचीती !

‘२१.५.२०२६ या दिवशी आम्ही कुटुंबीय अयोध्येला जाणार होतो; परंतु काही ना काही कारणांमुळे या नियोजनात सातत्याने पालट होत होते. आमचे नियोजन ठरून पुनःपुन्हा रहित होत होते. आम्ही सर्व कुटुंबीय २६.५.२०२६ या दिवशी तीर्थयात्रेसाठी निघालो.

नियोजनानुसार आम्ही २८.५.२०२६ या दिवशी रात्री अयोध्येत पोचणार होतो; परंतु माझ्या भावाचे (श्री. आशिष क्षीरसागर यांचे) मित्र श्री. नीलेश भुसारी यांना चारचाकी गाडी चालवतांना पुष्कळ झोप येऊ लागली. त्यांना गाडी चालवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आम्ही कौशांबी (उत्तरप्रदेश) या तीर्थक्षेत्री विश्रांती घेतली आणि २९.५.२०२६ या दिवशी दुपारी अयोध्येत पोचलो. आईची अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. आम्ही चित्रकूट, अयोध्या, काशी आणि प्रयाग, या ठिकाणी दर्शन घ्यायचे ठरवले होते. त्या वेळी आई आम्हाला सांगत होती, ‘‘माझे सर्व झाले आहे. मला अयोध्या बघायची आहे.’’ प्रत्यक्षात तिने चित्रकूट आणि काशी बघितली नव्हती. आम्ही २९.५.२०२६ या दिवशी अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले आणि त्याच रात्री आईला त्रास होऊन ३०.५.२०२६ या दिवशी सकाळी तिचे निधन झाले. या सर्व घडामोडींवरून ‘भगवंताने आईच्या निधनाचे नियोजन अयोध्येत आधीच केले होते आणि त्यानुसार आमचे सर्व नियोजन पालटत होते’, हे लक्षात आले.

२. कोणतेही नियोजन नसतांना आईला मृत्यूपूर्वी कुलदेवता आणि उपास्य देवता यांचे दर्शन होणे 

या वर्षी अयोध्येला जाणार असल्याने आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार नव्हतो. आरंभी अयोध्येला जाण्याचे रहित झाल्यामुळे आम्ही अकस्मात् कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले. त्यानुसार २४.५.२०२६ या दिवशी आम्ही आमची कुलदेवता श्री रेणुकादेवी हिचे माहूर (जिल्हा नांदेड) येथे जाऊन दर्शन घेतले. आम्ही आईचे माहेरचे कुलदैवत असलेल्या श्री बालाजीच्या मंदिरातही अकस्मात् जाऊन आलो. आईच्या घरी श्रीरामाचे मंदिर असल्याने श्रीराम ही त्यांची उपास्य देवता होती. ‘आईने प्राणत्याग करण्यापूर्वी सर्व देवतांचे दर्शन घेतले’, असे लक्षात आले. हे सर्व अनियोजित होते. आम्ही घरातील सर्व जण सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत. आईही त्यानुसार साधना करत होती; परंतु तिला कर्मकांड करण्याची आवड अधिक होती. ‘देवपूजा, विविध स्तोत्रांचे पठण आणि नामजप करणे, तसेच मंदिरात जाणे’, हे तिला अधिक आवडत असे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘नागपूर येथील सौ. जयश्री श्रीकांत क्षीरसागर यांना कर्मकांडानुसार साधना करण्याची आवड होती. त्यांच्या मृत्यूपूर्वी कोणतेही नियोजन नसतांना त्यांना कुलदेवतेचे दर्शन घडले. त्यांना अयोध्या येथे जाऊन श्रीरामाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. अयोध्या येथे गेल्यावर त्यांना श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेता आले आणि दुसर्‍या दिवशी त्यांचे निधन झाले. ‘ईश्वर आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतो’, हे त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळते. त्यांच्या देवाप्रतीच्या भावामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  (९.६.२०२६)

३. अयोध्येला मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी न अडवल्याने आईला रामललाचे दर्शन भरभरून घेता येणे

अयोध्येत पोचल्यावर आम्ही रामललाच्या दर्शनासाठी गेलो. आईची उंची अल्प होती आणि रामललाच्या मूर्तीच्या समोर उंच अर्पणपेटी ठेवली होती. त्यामुळे मला काळजी वाटली, ‘आईला रामललाचे दर्शन नीट झाले कि नाही ?’ मंदिरातून बाहेर आल्यावर मी तिला विचारले, ‘‘राम दिसला का ?’’ त्या वेळी तिने रामाचे अत्यंत सुंदर दर्शन झाल्याचे सांगितले, तसेच ती प्रार्थना आणि नमस्कार करत असतांना कोणत्याही सुरक्षा रक्षकाने तिला ‘लवकर पुढे चला’, असे सांगितले नाही. तिला हवे तेवढे भरभरून दर्शन घेऊ दिले. तिची मंदिरात बसण्याची इच्छा होती. सुरक्षा रक्षकाने तिच्या विनंतीनुसार तिला मंदिरात बसू दिले. ज्या ज्या कोपर्‍यातून रामलला दिसत होता, त्या त्या कोपर्‍यातून तिने पुनःपुन्हा रामललाचे दर्शन घेतले.

४. आईच्या इच्छेप्रमाणे फारसा त्रास न होता तिचा मृत्यू होणे

आई नेहमी सांगायची, ‘‘मला कुठला आजार झाला, तर रुग्णालयात भरती करू नका. मला खितपत पडून मरण नको आहे.’’ भगवंतानेही तसेच केले. तिला विशेष त्रास न होता किंवा आजारपणात पुष्कळ दिवस न जाता तिला लवकर मृत्यू आला. रामललाच्या दर्शनानंतर केवळ एक रात्र तिला थोडा त्रास झाला. त्यातही तिचा नामजप आणि प्रार्थना चालू होत्या.

आईचे निधन झाल्यावरही स्थिर राहून सेवेला प्राधान्य देणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री अंजली क्षीरसागर (वय ४५ वर्षे)!

सुश्री अंजली क्षीरसागर

‘२९.५.२०२६ या दिवशी रात्री मी सेवेच्या संदर्भातील एक शंका विचारण्यासाठी सुश्री अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४५ वर्षे) हिला ‘व्हॉट्स ॲप’द्वारे संपर्क करण्यास सांगितले होते. दुसर्‍या दिवशी, म्हणजे ३०.५.२०२६ या दिवशी सकाळी ७.३५ च्या सुमारास मला अंजली हिच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त समजले. असे असूनही अंजलीने मला सेवेच्या संदर्भात बोलण्यासाठी दुपारी भ्रमणभाष केला. मला पुष्कळ आश्चर्य वाटले. तिच्या आईचे त्याच दिवशी निधन झाल्याने ‘तिच्याशी कसे बोलायचे ?’, असे मला वाटत होते. मी तिला ‘आपण नंतर बोलू शकतो’, असे सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘ताई, मी तुझ्या लघुसंदेशाला ‘आपण दोन दिवसांनी बोलूया’, असे उत्तर देणार होते; पण ‘स्मशानभूमीत विधी चालू होण्यास अजून वेळ आहे. त्यामुळे मी भ्रमणभाषद्वारे सेवा करू शकते. जे व्हायचे होते, ते होऊन गेले. आता मी त्याविषयी विचार करून काय साध्य होणार ?’, असा विचार करून मी तुला भ्रमणभाष केला.’’

सौ. आरती पुराणिक

हे बोलत असतांना अंजली थोडी भावूक झाली; पण क्षणात तिने स्वतःला सावरले आणि ती लगेच स्थिर झाली. तिची सेवेप्रतीची तळमळ पाहून मला भरून आले. त्यानंतर आमचे बोलणे पूर्ण होईपर्यंत ती पुष्कळ स्थिर होती. भ्रमणभाषवर बोलतांना तिने मला सेवेची पुढील दिशा दिली. तिच्या या कृतीतून मला ‘कठीण प्रसंगातही स्थिर कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळाले.

‘मला अशा साधकांचा सहवास मिळतो आणि त्यांच्यासह सेवा करायला मिळते’, हे माझे परम भाग्य आहे’, त्याबद्दल मी भगवंताच्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘अंजलीसारखी साधनेची तळमळ माझ्यातही निर्माण होऊ दे’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.’

– सौ. आरती पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (४.६.२०२६)

५. आईच्या मृत्यूच्या संदर्भात संत आणि साधक यांनी सांगितलेली सूत्रे

अ. आईचे निधन झाल्यावर पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत, वय ५१ वर्षे) यांनी मला सांगितले, ‘‘अयोध्या ही मोक्षनगरी आहे. कोटी लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे अयोध्येमध्ये मृत्यू येण्याचे भाग्य लाभते. त्यामुळे आई पुष्कळ भाग्यवंत आहे.’’

आ. साधक आणि नातेवाईक यांनी मला सांगितले, ‘‘आई पुष्कळ भाग्यवंत आहे. असा मृत्यू काही जणांनाच येतो.’’

हे सर्व ऐकल्यानंतर ‘त्या जिवाचे इतके कल्याण झाले. मग आपण दुःख का करायचे ? आपण वाईट वाटून घ्यायला नको’, हे लक्षात आल्यावर आम्हा कुटुंबियांना प.पू. गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) कृतज्ञता वाटत होती.

६. आईच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

६ अ. आईच्या अंत्यविधीची सिद्धता आणि अंत्यविधी ईश्वर नियोजित असल्याप्रमाणे पार पडणे : आम्ही अयोध्येमध्ये असतांना आईला मृत्यू आला. तेथे आमच्या ओळखीचे कुणीच नव्हते. आमच्यासाठी तेथील सर्वच नवीन होते. त्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळी आणि साधक या सर्वांनाच वाटत होते, ‘तुम्हाला किती अडचणींचा सामना करावा लागत आहे ? आईचे पार्थिव मिळाले का ? मृत्यूचे प्रमाणपत्र (डेथ सर्टिफिकेट) मिळाले का ? अंत्यविधीचे साहित्य मिळाले का ? तुम्ही नियोजन कसे केले ?’; परंतु आम्हाला कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागला नाही. जणूकाही श्रीरामाने सर्व सिद्धता आणि नियोजन करून ठेवले होते. आम्ही या कालावधीत पुढीलप्रमाणे गुरुकृपा अनुभवली.

१. आईला रात्रभर त्रास झाला; मात्र तिने सकाळी प्राण सोडले. त्यामुळे रात्री आमची धावपळ झाली नाही.

२. आम्ही आईला रुग्णालयात घेऊन गेलो आणि तेथील आधुनिक वैद्य पडताळणी करत असतांना आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी लगेचच मृत्यूचे प्रमाणपत्र दिले आणि मृतदेहही आम्हाला दिला.

३. त्याच आठवड्यात जळगाव येथील साधक श्री. प्रशांत जुवेकर आणि सौ. क्षिप्रा जुवेकर, हे दोघे अयोध्या येथे त्यांच्या घरी रहायला गेले होते. ही माहिती त्यांनी आम्हाला दिली होती. त्यामुळे आईला रुग्णालयात नेत असतांनाच श्री. प्रशांत आणि सौ. क्षिप्रा आमच्या साहाय्यासाठी आले.

४. श्री. प्रशांत आणि सौ. क्षिप्रा यांनी स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्याने ‘अंत्यविधी कुठे करायचे ?’ इत्यादी माहिती काढली. त्यांनी अंत्यविधीचे सर्व साहित्य आणून दिले. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी रुग्णवाहिका आणि अंत्यविधीची सर्व सिद्धता अत्यल्प पैशांत करून दिली.

५. आम्हाला तेथील घाटावर अंत्यविधी करणारी व्यक्तीही चांगली मिळाली. आईचे पार्थिव घाटावर नेल्यावर त्यांनी लगेचच सिद्धता केली. आमच्या समवेत लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि महिला असल्याने त्यांनी आम्हाला बसण्यासाठी जागा करून दिली. ते आम्हाला सातत्याने ‘पंख्याखाली बसा. शांततेत बसा’, असे सांगत होते.

६. अयोध्येत अग्नीसंस्कार करण्याची पद्धत उत्तर भारतातील असल्याने थोडी वेगळी होती. आम्ही त्यांना ‘आमच्याकडे अंत्यविधी करणारी व्यक्ती क्षौर करते, तसेच आमच्या काही पद्धती आहेत’, असे सांगितल्यावर त्यांनी त्यासाठी सर्व सिद्धता करून दिली.

७. पौरोहित्य करणारे माझ्या भावाचे २ मित्र आणि त्यांचा परिवार आमच्या समवेत असल्याने तेथे त्यांचे मोठे साहाय्य झाले. सर्व विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आले.

८. अयोध्या हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे तेथे एखाद्याला सुतक लागल्यानंतर कुणी सहसा त्याला रहाण्यास जागा देत नाही. आम्हाला मंदिराजवळील हॉटेलमध्ये रहाता येणे शक्य नव्हते. घाटावरील व्यक्तीने त्यांच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये आम्हाला जागा दिली, तसेच आमच्यासाठी कांदा-लसूण नसलेले आणि अल्प तिखट जेवण करून देण्यासही सांगितले.

९. आईचे विधी करून, तसेच रात्रभराच्या जागरणाने सर्व जण थकले होते. त्यामुळे आम्हाला जेवण फारसे गेले नाही. हे लक्षात घेऊन त्या व्यक्तीने ‘संध्याकाळी तुम्ही काहीच जेवला नाहीत. चहा तरी व्यवस्थित घ्या’, असे सांगून चहा पाठवला, तसेच आम्हाला काय हवे-नको, ते खोलीत पाठवून दिले. एकदम अनोळख्या व्यक्तीने हे सर्व प्रेमाने केले, तसेच यासाठी त्यांनी आमच्याकडून अधिक पैसेही घेतले नाहीत.

‘हे सर्व ईश्वरी नियोजन होते आणि श्री गुरूंनी प्रत्येक टप्प्याला आमची काळजी घेतली’, हे लक्षात येऊन आमच्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘हे सर्व नागपूरला आमच्या रहात्या घरी झाले असते, तर या तुलनेत सर्व सिद्धता करणे आणि ती पूर्णत्वास नेणे पुष्कळ कठीण झाले असते’, असे आम्हा सर्व कुटुंबियांना जाणवले.

६ आ. प्रभु श्रीराम शरयू नदीमध्ये ज्या ठिकाणी गुप्त झाला, त्या ठिकाणी रक्षाविसर्जन होणे : आईचे अग्नीसंस्कार विधी हे अयोध्येतील ‘जमथरा’ या ठिकाणी झाले. येथे यमाने श्रीरामाला ‘तुझे कार्य संपले आहे’, असे सांगितले होते. दुसर्‍या दिवशी माझा भाऊ शरयू नदीमध्ये एका ठिकाणी रक्षाविसर्जन करणार होता. ते पाहून एका अनोळखी व्यक्तीने ‘येथे रक्षाविसर्जन करू नका. मी तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जातो’, असे सांगितले. ‘ती पैशांसाठी असे म्हणत असावी’, असा विचार करून भावाने तिला नकार दिला; मात्र तिने लगेचच सांगितले, ‘‘तुम्ही मला पैसे दिले नाहीत, तरी चालतील. मी तुम्हाला योग्य ठिकाणी नेतो.’’ ती व्यक्ती भावाला नावेतून घेऊन गेली. प्रभु श्रीराम शरयू नदीमध्ये ज्या ठिकाणी गुप्त झाला होता, त्या ‘गुप्तार’ घाटावर भावाने आईची रक्षा विसर्जित केली. त्यानंतर नागपूरला येतांनाही आम्हाला काही त्रास झाला नाही. आम्ही अगदी सुखरूप नागपूरला पोचलो.

६ इ. आईच्या मृत्यूनंतर रुग्णालय, अंत्यविधीचा घाट आणि घर येथे कोणताही दाब न जाणवता हलकेपणा जाणवणे : आई गेल्यानंतर आम्ही रुग्णालयात असतांना किंवा घाटावर तिचे अग्नीसंस्कार करतांना कुठेही दाब जाणवत नव्हता. आम्ही सर्वच कुटुंबीय घाटावर गेलो होतो. आमच्या समवेत ३ लहान मुलेही होती; मात्र तेथेही भीतीदायक वातावरण नव्हते. कुठेही ताण नव्हता. सर्वत्र चांगले वातावरण होते. नागपूरला घरी आल्यानंतरही ‘घरात दाब आहे किंवा कुणाचे निधन झाले आहे’, असे जाणवत नव्हते. घरातील वातावरण हलके जाणवत आहे.

६ ई. वडील स्थिर आणि कृतज्ञताभावात असल्याचे जाणवणे : ‘आई गेल्यामुळे बाबा (श्री. श्रीकांत क्षीरसागर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७६ वर्षे) बरे आहेत का ?’, असा प्रश्न मला सर्वांनीच विचारला. या संपूर्ण प्रसंगात बाबा एकदमच स्थिर होते. आईचे अंत्यविधी करतांना त्यांना कृतज्ञतेने भरून येत होते. त्यानंतरही साधक किंवा नातेवाईक यांच्याशी बोलतांना ते ‘गुरुकृपेने आणि ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे सर्व झाले आहे’, असे सांगत आहेत. ‘ते पूर्णवेळ कृतज्ञताभावात आहेत’, असे जाणवत होते.’

– सुश्री अंजली क्षीरसागर (कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर यांची मुलगी, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक