
१. गुरुदेवांच्या कृपेमुळेच शारीरिक तपासणी केल्यावर वेळेत रोगाचे निदान होणे
‘१८.७.२०२२ या दिवशी माझा दीर आधुनिक वैद्य संदीप याने मला शरिराची पूर्ण तपासणी करण्याआधी तातडीने ‘मॅमोग्राफी’ (स्तनातील दोष शोधून काढण्याकरता क्ष किरणांनी केलेली तपासणी) करून घेण्यास सांगितले. मी २०.७.२०२२ या दिवशी ही तपासणी करून घेतली. सहा दिवसांनी वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला आणि आधुनिक वैद्य संदीप याने मला स्तनाचा कर्करोग झाला असल्याचे सांगितले. याविषयी मी लगेच पू. सुमनमावशी (पू. (श्रीमती) सुमन नाईक, सनातनच्या ६२ व्या (व्यष्टी) संत, वय ७७ वर्षे) यांना संपर्क करून सांगितले. त्यांनी मला ‘काही घाबरू नकोस. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आहेत ना ? काळजी करू नकोस’, असे सांगून मला धीर दिला.

२. पुढील तपासणीचे नियोजन तज्ञ आधुनिक वैद्यांकडे होणे आणि ही श्री महालक्ष्मीदेवीची कृपा असल्याचे जाणवणे
आम्ही पुढील उपचार आधुनिक वैद्य मंदार नाडकर्णी यांच्याकडून घेण्याचे ठरवले. ३०.७.२०२२ या दिवशी आधुनिक वैद्य नाडकर्णी यांच्याकडे आम्ही तपासणीसाठी गेलो होतो. त्यांनी मला तपासल्यावर पुष्कळ धीर दिला. ते मला म्हणाले, ‘‘तुम्हाला काहीही झालेले नाही. तुम्ही लवकर बर्या होऊन आणखी पुष्कळ वर्षे जगणार आहात.’’ डॉ. नाडकर्णी यांच्याशी बोलत असतांना गोव्याचा विषय निघाला आणि ‘आम्ही श्री महालक्ष्मी मंदिराजवळ रहातो’, असे मी त्यांना सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आमचा कुलदेव श्री मंगेश आहे आणि पालवी (साहाय्यक किंवा विस्तारित शक्ती, तिला कुलदेवीसारखाच मान असतो.) श्री महालक्ष्मी आहे.’’ ते ऐकून गुरुदेव आणि श्री महालक्ष्मीदेवी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
३. प्रत्येक चाचणीला जातांना अनुभवलेली गुरुदेवांची कृपा
३ अ. चाचणीसाठी जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर भावपूर्ण प्रार्थना अन् नामजप होणे : प्रत्येक चाचणीला जातांना मी नामजपादी सर्व उपाय पूर्ण करून जात असे. तेथे मी पुढील प्रार्थना करायचे, ‘हे श्रीकृष्णा, तुझ्या सुदर्शनचक्राने त्या वास्तूची शुद्धी होऊ दे, तसेच चाचणीसाठी वापरल्या जाणार्या सर्व उपकरणांचीही शुद्धी होऊ दे. त्यांच्यावरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होऊ दे.’
३ आ. भीती वाटल्यास किंवा ताण आल्यास पू. (श्रीमती) सुमन नाईक यांच्याशी बोलल्यानंतर हलके वाटणे : माझ्या मनात भीतीचे विचार नव्हते. ‘जे काही होणार, ते गुरुदेवांच्या इच्छेने होणार आहे’, या विचाराने मला बळ दिले. मला अधून मधून कधी भीती वाटली किंवा ताण आला, तर मी पू. (श्रीमती) सुमन मावशी यांच्याशी बोलायचे. त्या मला धीर द्यायच्या. त्यानंतर मला हलके वाटायचे. अशा प्रकारे ‘संतांचे मार्गदर्शन मिळणे’, हीसुद्धा गुरुदेवांचीच कृपा आहे.
३ इ. ‘शरिरात इतर ठिकाणी कर्करोगाच्या पेशी आहेत का ?’, यासाठी करावी लागणारी चाचणी करण्यापूर्वी देण्यात येणारे औषध ‘गुरुदेवांच्या चरणांचे तीर्थ पीत आहे’, असा भाव ठेवून प्यायल्याने इतर रुग्णांना होणारा त्रास साधिकेला न होणे : ‘कर्करोगाच्या पेशी माझ्या शरिरात अजून कुठे पसरलेल्या आहेत का ?’, हे पहाण्यासाठी एक चाचणी करायची होती. या चाचणीच्या आधी १ घंटा १ लीटर पातळ औषध प्यायला देतात. ते चवीला चांगले नसते; परंतु मी ‘गुरुदेवांच्या चरणांचे तीर्थ पीत आहे’, असा भाव ठेवून ते प्यायले. त्यामुळे मला त्या औषधाचा काही त्रास झाला नाही. माझ्या समवेत असलेल्या इतर रुग्णांना पुनःपुन्हा शौचाला होणे, उलटी होणे इत्यादी पुष्कळ त्रास झाले.
माझे सर्व अहवाल आधुनिक वैद्यांना दाखवले. गुरुदेवांच्या कृपेने सगळ्या चाचण्यांचे अहवाल चांगले म्हणजेच ‘आजार गंभीर नसून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळेल’, असे लक्षात आले. त्यांनी १२.८.२०२२ या दिवशी माझे शस्त्रकर्म करण्याचे निश्चित केले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वात्सल्यमय स्पर्श आणि त्यांच्या चैतन्यमय वाणीतून मिळालेले मार्गदर्शन यांतून पुढील सर्व त्रास सहन करण्यासाठी प्रचंड बळ मिळणे
अ. ६ ते ९.८.२०२२ या कालावधीत गोवा येथील सनातन आश्रमात एक यज्ञ पार पडला. गुरुदेवांच्या कृपेने मला यज्ञातील चैतन्य ग्रहण करण्याची संधी मिळाली. यज्ञाच्या शेवटच्या दिवशी यज्ञ संपल्यानंतर माझी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला पुष्कळ आधार दिला, चैतन्य दिले आणि पुढील सगळ्या उपचारांसाठी बळ दिले.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला त्यांच्या चैतन्यमय वाणीने आश्वस्त केले. त्या मला म्हणाल्या, ‘‘लता, अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यावर गुरुदेवांची अनंत कृपा आहे आणि त्यांचे अनंत आशीर्वाद आहेत. गुरुदेव यातूनही तुला सहजपणे बाहेर काढतील. निश्चिंतपणे जा.’ (२ दिवसांनी मी शस्त्रकर्म करून घेण्यासाठी मुंबईला जाणार होते.) गुरुदेवांच्या आशीर्वादाने प्रारब्धाची तीव्रता अल्प होते. अशा वेळी आपण सतत वर्तमानकाळात रहायचे. भूतकाळाचा आणि पुढे काय घडणार ? याचा अजिबात विचार करायचा नाही; कारण ते आपल्या हातात नाही. ‘त्याचे काय करायचे ?’, ते गुरुदेव बघतील. आपण केवळ ईश्वराच्या स्मरणात आणि शांत रहायचे. अजून कसलाच विचार करायला नको. आपल्याला आपल्या साधनेमुळेच ऊर्जा मिळते.’’
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या या भावशब्दांतून आणि प्रेमळ वाणीतून मला प्रचंड चैतन्याचा स्रोतच मिळाला. त्या चैतन्याचे अभेद्य असे संरक्षककवच माझ्याभोवती निर्माण झाले. त्यांनी माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवला. त्यांचा वात्सल्यमय स्पर्श आणि त्यांच्या चैतन्यमय वाणीतून मिळालेले मार्गदर्शन यांतून जणू मला पुढील सर्व त्रास सहन करण्याचे प्रचंड बळ मिळाले.
(क्रमशः)
– सौ. लता ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६६ वर्षे), महालक्ष्मी, बांदोडा, फोंडा. (२१.११.२०२५)
पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने जात असलेला समाज !
स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत !
साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !
साधकसंख्या अल्प असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड कार्यरत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !