१०.६.२०२६ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1049366.html
भाग-२

५. आध्यात्मिक भावाच्या स्तरावर गुरुदेवांनी करून घेतलेले प्रयत्न
अ. ११.८.२०२२ या दिवशी मी रुग्णालयात भरती झाले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचल्यावर ‘मी श्रीकृष्णाच्या प्रासादात प्रवेश करत आहे’, असाच माझा भाव होता. त्या वेळी माझा नामजप अखंड चालू होता.

आ. १२.८.२०२२ या दिवशी सकाळी ७ वाजता मला शस्त्रकर्मासाठी नेण्यात आले. आधुनिक वैद्य नाडकर्णी शस्त्रकर्म करणार होते. त्या वेळी ‘साक्षात् गुरुदेवच नाडकर्णी यांच्या माध्यमातून माझे शस्त्रकर्म करणार आहेत. ते केवळ निमित्तमात्र आहेत’, असा माझा भाव होता.
इ. शस्त्रकर्म कक्षात जाण्याआधी मला अन्य २ ठिकाणी नेण्यात आले. तिथे परिचारिका किंवा आधुनिक वैद्य जे काही विचारत होते, त्यांची उत्तरे मला स्थिरपणे देता आली. गुरुदेवांच्या कृपेने त्या वेळी मला अजिबात भीती वाटत नव्हती. मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हा देह मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे.’
ई. शस्त्रकर्म झाल्यावर गुरुकृपेने दुपारी १२ वाजता हळूहळू मला शुद्ध येऊ लागली. मी भ्रमणभाषवरून माझ्या जाऊबाई पू. ज्योतीताईंना (पू. (सौ.) ज्योती ढवळीकर १३२ व्या (समष्टी) संत, वय ६३ वर्षे यांना) ‘गुरुकृपेने शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडले’, याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना निरोप देण्यासाठी लघुसंदेश पाठवला. त्याच वेळी माझे आधुनिक वैद्य असलेले दीर येऊन माझी विचारपूस करून गेले. त्या काळातही मला अजिबात कुठेही दुखले नाही.
उ. माझी मुलगी प्रशिक्षणासाठी देहली येथे होती. तिची परीक्षा लवकर होऊन ती १२.८.२०२२ या दिवशी माझ्या समवेत रुग्णालयात रहायला येऊ शकली. मला माझ्या मुलीने विचारले, ‘‘आई, तुला थोडेसे काही झाले, तरी पुष्कळ भीती वाटायची ना ? मग या वेळी तू शांत आणि स्थिर आहेस, हे कसे ?’’ मी तिला सांगितले, ‘‘ही सगळी गुरुदेवांची कृपा आहे. त्यांनी मला सगळे सहन करायला बळ दिले.’’
६. आधुनिक वैद्य असलेला दीर आणि जाऊबाई यांनी सर्वच स्तरांवर भावपूर्ण साहाय्य करणे
अ. १५ दिवसांनंतर आम्ही मुंबईहून गोवा येथे आलो. मला ‘ड्रेन पाईप’ (शरिरातील टाकाऊ द्रव पदार्थ बाहेर टाकण्यासाठी नळी बसवून तो द्रव पदार्थ एका पिशवीत गोळा केला.) जोडलेले असल्यामुळे मी मडगावला दिराकडे रहायला गेले; कारण प्रतिदिन तो द्रव मोजून त्याचा अहवाल मुंबईला पाठवायचा होता.
आ. मडगावला जाऊबाईंनी माझी चांगली काळजी घेतली. ती वेळ काढून माझ्या समवेत येऊन बसायची आणि आम्ही दोघी सगळी स्तोत्रे म्हणत होतो. त्यामुळे मला पुष्कळ चांगले वाटत असे आणि माझी भावजागृतीही होत असे.
इ. रुग्णालयात परिचारिकेने माझ्यासाठी व्यायाम सांगितले होते. ते व्यायाम जाऊबाईंनी स्वतः शिकून घेतले आणि घरी आल्यावर तिने ते मलाही शिकवले अन् आरंभी काही दिवस तिने माझ्याकडून ते करवूनही घेतले. प्रत्येक केमोथेरपीसाठीसुद्धा (कर्करोगाच्या पेशींना मारण्याची उपचारपद्धत) ती माझ्या समवेत येत असे. मला तिचा पुष्कळ आधार वाटायचा. अशी प्रेमळ जाऊ दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
ई. माझे दीरही (आधुनिक वैद्य संदीप) मला धीर द्यायचे. प्रतिदिन टाकाऊ पदार्थ (‘ड्रेन’) किती आहे, ते मोजून आधुनिक वैद्यांना अहवाल पाठवणे, शस्त्रकर्म केलेल्या भागात मलमपट्टी करणे, अहवाल आल्यावर त्याविषयी आधुनिक वैद्यांशी पुढील उपचारांविषयी बोलणे, वेळोवेळी माझी विचारपूस करणे इत्यादी ते अगदी मनापासून करत असत. त्यांच्याकडे राहिल्यामुळे मला पुष्कळ आधार वाटायचा. माझ्यासाठी माझ्या कुटुंबियांना काहीच करावे लागले नाही, पूर्ण दायित्व त्यांनीच घेतले. अशी प्रत्येक कुटुंबियांची ते अगदी दायित्व घेऊन पूर्ण काळजी घेतात. ‘त्यांच्यासारखे आधुनिक वैद्य आम्हा कुटुंबियांना लाभणे’, ही गुरुमाऊलींचीच कृपा आहे.
७. इतर रुग्णांना ‘केमोथेरपी’ उपचार केल्यामुळे होणार्या त्रासाएवढा त्रास साधिकेला न होणे
अ. ‘केमो’साठी जातांना मी अगदी शांतपणे जायचे आणि येतांनासुद्धा मी तेवढीच शांत असायचे. वरच्या मजल्यावर जातांना, तसेच येतांना परिचारिका मला चाकांची आसंदी देत असत. तेव्हा मी त्यांना सांगायचे, ‘मी चालत जाऊ शकते. मला काहीच त्रास होत नाही’; परंतु त्यांच्या नियमानुसार त्या आसंदी देत असत.
आ. आधुनिक वैद्यांनी सांगितले होते की, ‘केमोथेरपी झाल्यावर थकवा आला की, झोपून रहायचे किंवा आराम करायचा’; परंतु गुरुदेवांच्या कृपेने मला कधी थकवा आला नाही किंवा झोपूनही रहावे लागले नाही. बहुतेक वेळा ‘केमो’ घ्यायला जातांना किंवा ‘केमो’ चालू असतांना मला सेवेविषयी, उदा. आश्रमात शहाळी, फुले किंवा अन्य साहित्य पाठवण्याविषयी साधक संपर्क करायचे. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत असे.
८. नवीन ठिकाणी रहायला गेल्यावर घरातील आरसा अकस्मात् कोणतेही कारण नसतांना फुटल्यावर भावाने या घटनेविषयी सकारात्मक रहाण्यास शिकवणे :
मध्यंतरी आमच्या मूळ घरी काम चालू असल्यामुळे मी फोंडा येथे १ मास एका सदनिकेत रहायला गेले होते. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता पुष्कळ मोठा आवाज आला आणि मोठा आरसा अकस्मात् फुटला अन् त्याचा पूर्ण चुरा झाला. त्या वेळी तिथे कुणीही नव्हते. त्या आधी अर्धा घंटा माझा भाऊ माझ्यासाठी श्री शांतादुर्गादेवीचा प्रसाद घेऊन आला होता. (तो श्री शांतादुर्गा देवळात पुजारी आहे.) आरसा फुटलेला बघून तो मला म्हणाला, ‘‘काही काळजी करू नकोस. जे काही वाईट होते, ते त्याच्यावर गेले. आपल्याला देवाने वाचवले.’’ त्याच्याकडून ‘प्रत्येक प्रसंगात सकारात्मक कसे रहायचे ?’, हे मला शिकायला मिळाले.
९. मुलीला बेंगळुरू येथे स्थायिक होण्यासाठी तिचे सर्व साहित्य लावून देण्याचे दायित्व गुरुदेवांच्या कृपेने पार पडणे
एप्रिल २०२३ मध्ये माझी मुलगी गौरी हिचे प्रशिक्षण (वैमानिक) पूर्ण होऊन ती बेंगळुरूला स्थायिक होणार होती. त्यासाठी १ मास आधीपासून तिची तिथे रहाण्याची सगळी सिद्धता, साहित्य गोळा करणे इत्यादी गोष्टी देवाने माझ्याकडून करवून घेतल्या. नंतर मी बेंगळुरू येथे गेले. तिचे सामान लावण्याची सर्व सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. हे सर्व करत असतांना माझ्या मनात ‘मी आजारी आहे’, असे विचार येतच नव्हते. ही सगळी गुरुदेवांचीच कृपा !
१०. माझे ‘रेडिएशन’चे उपचार (कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचारपद्धत) ५ मे या दिवशी चालू झाले. त्यासाठीही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला नामजप दिला. त्यामुळे सगळे सुसह्य झाले आणि व्यवस्थितपणे पूर्ण झाले.
११. कर्करोगाच्या उपचारांनंतर सर्व सेवा गुरुकृपेने अखंडपणे चालू रहाणे
ऑगस्ट २०२२ ते मे २०२३ हे १० मास माझे सर्व उपचार व्यवस्थित पार पडले. या उपचारांच्या कालावधीत माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या सेवेत गुरुदेवांच्या कृपेने कधीच खंड पडला नाही. ‘आश्रमात शहाळी, फुले, खाऊ इत्यादी पाठवणे, दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापनदात्यांना भ्रमणभाषवरून संपर्क करून विज्ञापने घेणे’, या सेवा अखंडपणे चालू होत्या.
‘हे गुरुराया, तुमची कृपादृष्टी अशीच आम्हा सर्व साधकांवर सदोदित राहू दे’, हीच आपल्या परम पवित्र चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– सौ. लता दीपक ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६६ वर्षे), महालक्ष्मी, बांदोडा, फोंडा. (२१.११.२०२५) ॐ
का उमेदवारांना मतांची भीक मागावी लागते ?
तिवसा (जिल्हा अमरावती) येथील कै. (श्रीमती) वंदना पंजाबराव कळमकर (वय ६५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !
पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !
कर्नाटक येथील श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी धर्माभिमान जागृत होण्यासाठी भक्तांना केलेले मार्गदर्शन आणि ‘सनातन संस्थे’च्या साधकांविषयी काढलेले कौतुकाद्गार !
मनुष्याच्या दोन्ही हातांच्या तळव्यांच्या रंगाची छटा वेगवेगळी असण्याचे कारण