गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०१२ ते २०१७ या कालावधीत ग्रंथांशी संबंधित सेवा करत होतो. मला ऑगस्ट २०१७ मध्ये विदर्भातील प्रसारकार्याचे दायित्व सांभाळायला सांगितले. मी यापूर्वी प्रसारक्षेत्रात सेवा केली नव्हती. प्रसार सेवेतील बारकावे शिकण्यासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये १३ दिवस मी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत कोल्हापूर येथे गेलो होतो. त्यानंतर सद्गुरु स्वाती खाडये विदर्भात आल्यानंतर वर्ष २०२४ आणि २०२५ मध्ये मला त्यांचा सत्संग लाभला. त्या कालावधीत मला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सद्गुरु स्वाती खाडये

१. प्रीती

अ. ज्या साधकाचे पूर्ण कुटुंब साधनेत आहे, त्या साधकाच्या घरी जाऊन सद्गुरु स्वाती खाडये सर्वांना आवर्जून भेटतात. एखाद्या घरातील एखादा साधक इतर जिल्ह्यात पूर्णवेळ साधना करत असेल आणि त्याच्या घरातील इतर कुणी साधनेत नसेल, तरीही सद्गुरु स्वातीताई त्या साधकांच्या घरी आवर्जून भेट देतात.

आ. सद्गुरु स्वातीताई साधकांच्या साधनेतील किंवा वैयक्तिक अडचणींवर तत्परतेने उपाययोजना सांगतात. ‘एखादा साधक भावनेत अडकला आहे’, असे त्यांच्या लक्षात आल्यास त्या संबंधित साधकाला त्याची जाणीव करून देतात आणि ‘भावाच्या स्तरावर कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी सांगतात.

इ. सद्गुरु स्वातीताई धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक यांना भेटून त्यांच्याशी जवळीक साधतात आणि आवश्यक वाटल्यास त्यांच्या कुटुंबियांशीही बोलतात.

ई. त्या लहान मुलांवर पुष्कळ प्रेम करतात. त्या लहान मुलांच्या ‘लाडक्या आत्या’ आणि ‘लाडक्या मावशी’ आहेत.

‘‘नामजप केल्याने देहाची शुद्धी होते आणि स्वभावदोष निर्मूलन केले, तर मनाची शुद्धी होते. देह आणि मन शुद्ध झाले, तरच साधनेत पुढे जाणे शक्य आहे. नाहीतर आपत्काळात ‘अधे ना मधे’, अशी स्थिती होईल. व्यष्टी साधना म्हणजे साधकांच्या भोवती असलेले संरक्षककवच आहे. व्यष्टी साधना प्रामाणिकपणे केली, तर समष्टीमध्ये (समाजात) वावरतांना परिस्थितीचा त्रास होणार नाही.’’

– सद्गुरु स्वाती खाडये (५.४.२०२६)

२. इतरांचा विचार करणे  

पू. अशोक पात्रीकर

अ. सद्गुरु स्वातीताई माझी काळजी घेत असत. विदर्भातील साधकांना माझ्या अन्नपदार्थातील पथ्याविषयी ठाऊक आहे, तरीही सद्गुरु स्वातीताई आवर्जून ‘माझ्यासाठी पथ्याचे पदार्थ केले का ?’, याची निश्चिती करत होत्या. मला त्या वेळी खांदेदुखीचा त्रास होत होता. तेव्हा त्या साधकांना मला मर्दन करायला सांगत असत.

आ. मला उन्हाळ्यात ‘थंड पाणी प्यायला मिळावे’, यासाठी त्यांनी अमरावती सेवाकेंद्रासाठी एक लहान आकाराचा माठ दिला.

इ. विदर्भात सत्संग सोहळे आदी उपक्रम असतांना साधकांना बसण्यासाठी सद्गुरु स्वातीताईंनी मोठ्या सतरंज्या पाठवल्या. ‘कार्यक्रमांच्या वेळी कुठेही ध्वनीक्षेपकाची अडचण येऊ नये’, यासाठी त्यांनी विदर्भासाठी एक लहान ध्वनीक्षेपक पाठवला आणि तो माझ्या चारचाकी वाहनात ठेवायला सांगितला. त्याचा मला अनेक वेळा लाभ होतो.

ई. त्यांच्या समवेत चारचाकी वाहनातून प्रवास करतांना वाहनात भक्तीगीते लावलेली असतात. त्यांच्या वाहनात कोरडा खाऊ, साधक किंवा समाजातील व्यक्ती यांना देण्यासाठी आश्रमातील प्रसाद, लहान मुलांना देण्यासाठी गोळ्या, काही ग्रंथ, देवतांची मोठी चित्रे, पाण्याच्या बाटल्या, ध्वनीक्षेपक यंत्रणा इत्यादी साहित्य असते.

उ. सद्गुरु स्वातीताई एखाद्या जिल्ह्यात दौर्‍यावर असतांना त्यांना इतर जिल्ह्यातील धर्मप्रेमींचा भ्रमणभाष आल्यास त्या संबंधित धर्मप्रेमींना त्या जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांचा संपर्क क्रमांक देतात आणि त्या जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांना त्या धर्मप्रेमींचा संपर्क क्रमांक देतात.

ऊ. त्या अनेक वेळा संपर्क सेवेत किंवा व्यासपिठावर मार्गदर्शन करण्यासाठी बसलेल्या असतात. त्या वेळी त्यांना कुणीही भ्रमणभाषवर काही लघुसंदेश पाठवला किंवा भ्रमणभाष केला, तर त्या लगेच उत्तर देतात किंवा ‘नंतर बोलूया’, असे कळवतात.

३. काटकसरी 

त्या प्रवास करत असलेल्या चारचाकी गाडीत ‘सी.एन्.जी.’(एक प्रकारचे इंधन) किंवा पेट्रोल घालावे लागते. ‘सी.एन्.जी.’चा वापर केल्यास व्यय अल्प होतो. त्या दौर्‍यावर असतांना त्यांचा अधिकाधिक ‘सी.एन्.जी.’चा वापर करण्याचा प्रयत्न असतो. प्रवास करतांना मार्गात कुठेही ‘सी.एन्.जी.’ उपलब्ध असेल, तर त्या लगेच चालक साधकाला ते इंधन भरायला सांगतात.

४. गुरुकार्याचा ध्यास 

अ. त्या स्वतःच्या प्रकृतीकडे साक्षीभावाने पहातात. त्यांना थोडा फार त्रास होत असल्यासही त्या दिवसा सेवा करून रात्री औषधोपचार घेणे किंवा मर्दन करून घेणे, असे उपचार करतात. त्या वेळीही त्यांचे साधकांशी बोलणे चालूच असते.

आ. कोकणात गणेशोत्सवाचे महत्त्व पुष्कळ आहे. त्या घरच्या गणपति उत्सवासाठी १७ वर्षांनंतर घरी गेल्या होत्या. त्यांनी तिथेही घरी आलेल्या नातेवाइकांना साधनेचे महत्त्व सांगितले.

५. अल्प अहं 

त्या सत्संगात सांगतात, ‘‘माझे काही चुकत असल्यास सांगा.’’

६. साधकांना घडवणे

अ. सद्गुरु स्वातीताई नामजपादी उपाय करण्याचे महत्त्व साधकांच्या मनावर सतत बिंबवण्याचा प्रयत्न करतात.

आ. त्यांनी प्रसारात अनुभवलेल्या विविध प्रसंगांविषयी त्या साधकांना सांगतात.

इ. त्या साधनेचे प्रयत्न चांगले करणार्‍या साधकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात.

ई. एखादा उपक्रम चांगल्या रितीने आणि भावपूर्ण होण्यासाठी एखाद्या जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न त्या अन्य जिल्ह्यातील साधकांना सांगतात. त्यामुळे त्या साधकांना प्रोत्साहन मिळायला साहाय्य होते.

उ. साधनेचे प्रयत्न चांगले करणार्‍या साधकांना हेरणे आणि त्यांना साधनेच्या पुढील टप्प्यात नेणे, हा गुण सद्गुरु स्वातीताईंमध्ये प्रामुख्याने आढळतो.

ऊ. त्या साधकांना ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेची सांगड कशी घालावी ?’, याविषयी सोदाहरण सांगतात, उदा. दुसर्‍या दिवशी समष्टी सेवेचे नियोजन असेल, तर आदल्या दिवशी रात्री भाजी चिरून ठेवणे, सकाळी लवकर उठणे, त्या दिवशी अल्प वेळेत होणारे सोपे पदार्थ बनवणे.

७. सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या आदर्श शुद्धीसत्संगाचे स्वरूप !

अ. ‘सद्गुरु स्वाती खाडये कोणत्याही सत्संगाला आरंभ करण्यापूर्वी सर्व साधकांना आवरण काढायला सांगतात आणि कापूर अन् अत्तर यांचे उपाय करायला सांगतात.

आ. शुद्धीसत्संगात (टीप) साधक सांगत असलेल्या चुकांच्या मागे ‘मूळ स्वभावदोष कोणता आहे ?’, हे साधकांच्या लक्षात येण्यासाठी सद्गुरु स्वातीताई विविध प्रकारे प्रश्न विचारून साधकांना साहाय्य करतात. (टीप – शुद्धीसत्संग : साधकांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगितल्यावर ‘त्या चुका कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या?’, ते सांगून ते स्वभावदोष न्यून करण्यासाठी केलेले मार्गदर्शन.)

इ. एखाद्या साधकाच्या संदर्भातील प्रसंग इतर साधकांनी सांगितला असल्यास ‘त्या साधकांच्या शंकांचे निरसन व्हायला हवे आणि साधकांना शिकायला मिळेल’, अशा पद्धतीने प्रश्न विचारतात.

ई. साधकाच्या स्वभावदोषाच्या मुळापर्यंत जातांना त्या तत्त्वनिष्ठ राहून ‘उत्तरदायी साधकांना त्यांचे साहाय्य करण्याचे प्रयत्न कसे अल्प पडले ?’, हे उत्तरदायी साधकांच्या लक्षात आणून देत असत.

उ. सत्संगात चुका सांगणार्‍या साधकांना त्या आधी चुकांचे चिंतन करायला सांगत असत.

ऊ. त्या सत्संगात मधे मधे भावपूर्ण प्रार्थना सांगतात. त्या सत्संगात ‘आमचे स्वभावदोष अल्प होऊ देत. आमच्यामध्ये भाव वाढू दे’, अशी प्रार्थना सांगतात. त्या वेळी ‘मीही तुमच्यातीलच एक आहे’, हे त्या कृतीतून दर्शवतात.

ए. ‘साधकांमधील स्वभावदोषांचा वाईट शक्ती कसा अपलाभ घेतात आणि साधना कशी खंडित करतात ?’, हे सद्गुरु स्वातीताई सोदाहरण सांगतात.

ऐ. सत्संगात साधकांच्या चुकांच्या संदर्भात बोलणे होत असतांना सद्गुरु स्वातीताई कठोर वाटत असत; मात्र नंतर त्या साधकांशी एवढ्या प्रेमाने बोलत की, ‘साधकांना आलेला ताण लगेच न्यून होत असे.’

ओ. ‘सत्संग, शुद्धीसत्संग, भावसत्संग, धर्मशिक्षणवर्ग हे सर्व प.पू. डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) कशासाठी आणि कुणासाठी चालू केले ?’, असे सांगून सद्गुरु स्वातीताई सत्संगांचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवतात.

८. साधकांची सनातनचे संत, सद्गुरु, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या प्रती श्रद्धा वृद्धींगत करणे 

अ. सद्गुरु स्वातीताईंची प.पू. डॉक्टरांवर नितांत भक्ती आहे. त्या वाहनात गुरुमाऊलींचे छायाचित्र समवेत घेऊन बसतात. त्या साधकांना सांगतात, ‘‘तुमचा श्वास हा केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळे चालू आहे’, हे वाक्य मनात कोरून ठेवा आणि प्रत्येक श्वासागणिक लक्षात ठेवा.’’

आ. ‘प्रत्येक प्रसंगात गुरुमाऊलींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) दृष्टीकोन कसा साधकांच्याच हिताचा असतो !’, याविषयी त्या सांगत असतात.

इ. त्या साधकांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि अन्य धर्मप्रचारक सद्गुरु अन् संत यांच्या सत्संगांतील उदाहरणे सांगून त्यांच्यावरील श्रद्धाही वाढवतात.

९. सद्गुरु स्वाती खाडये यांच्यातील चैतन्याच्या संदर्भात येत असलेली प्रचीती  

सद्गुरु स्वातीताईंच्या चेहर्‍यावर २४ घंटे तेज जाणवते. ‘त्या थकल्या आहेत’, असे कधीही जाणवत नाही. त्यांचे हास्य निरागस वाटते. साधी रहाणी, गुरुकार्य वृद्धींगत होण्याची तळमळ, प्रत्येक क्षणी साधनारत असणे, उत्तम नियोजनकौशल्य, अनावश्यक न बोलणे, भावनिक स्तरावर कुणालाही न हाताळणे, हे त्यांचे गुण प्रत्येक क्षणी जाणवतात.

‘असे बहुगुणी आणि चैतन्यमय व्यक्तीमत्त्व असलेल्या सद्गुरु स्वातीताईंच्या मार्गदर्शनाखाली प्रसारातील सेवा शिकण्याची संधी प.पू. डॉक्टरांनी मला दिली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘मला आवश्यक ते शिकण्यासाठी सद्गुरु स्वातीताईंचा अमूल्य असा सत्संग मिळतो’, त्याबद्दल मी सद्गुरु स्वातीताईंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७६ वर्षे), अमरावती (५.४.२०२६)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.