पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटील यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी

 १. सौ. दीपा म्हात्रे (पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटील यांची मोठी नात), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे.

१ अ. पू. आजींच्या देहत्यागापूर्वी जाणवलेली सूत्रे

१ अ १. पू. आजींना राजमातंगी यज्ञाची विभूती लावल्यावर जाणवलेली सूत्रे

सौ. दीपा म्हात्रे

१ अ १ अ. पू. आजींनी आनंदून हात जोडणे आणि ‘परम पूज्य आले !’, असे मोठ्याने म्हणणे : ‘१८.५.२०२६ या दिवशी सकाळी मी पू. आनंदी पाटीलआजींना भेटण्यासाठी गेले. तेव्हा मी त्यांना १७.५.२०२६ या दिवशी मुंबईत झालेल्या श्री राजमातंगी महायज्ञाची विभूती लावली. त्या वेळी पू. आजींना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी हात जोडले आणि त्या मोठ्याने म्हणाल्या, ‘‘परम पूज्य आले !’’ त्या ‘जय गुरुदेव ।’, हा जप करत होत्या.

१ अ १ आ. त्या वेळी माझी लहान बहीण तिथे आली आणि तिने भ्रमणभाषवर ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ लावले. तेव्हा मी पू. आजींकडे पाहिले, तर मला त्यांच्या ठिकाणी श्रीविष्णूचे दर्शन झाले.

१ अ २. ‘तुम्ही श्रीकृष्णाकडे गेल्यावर हाक मारली तर याल ना ?’, असे विचारल्यावर रुग्णाईत असूनही मान हालवून होकार दर्शवणे : पू. आजींनी एप्रिल २०२६ पासून जेवण सोडले होते. त्यामुळे आम्हाला त्यांची काळजी वाटत होती. मी सहजच त्यांना विचारले, ‘‘तुम्ही कृष्णाकडे गेलात आणि मी हाक मारली, तर आमच्यासाठी याल ना ?’’ त्यांची प्रकृती ठीक नव्हती, तरी त्या जोरात मान हालवून ‘हो’ म्हणाल्या. त्यांनी पलंगावर पहुडलेल्या स्थितीतच माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला.

१ अ ३. माझे यजमान त्यांना भेटण्यासाठी आले. तेव्हाही पू. आजींनी त्यांना इतक्या प्रेमाने जवळ घेतले की, आमचा भाव जागृत झाला.

 १ अ ४. पू. आजींची सेवा करतांना गुरुदेवांना प्रार्थना केल्याने त्यांनीच ती सेवा करून घेतल्याचे जाणवून त्यातून आनंद मिळणे : २०.५.२०२६ या दिवशी माझ्या यजमानांनी पू. आजींना आमच्या घरी आणले. २१.५.२०२६ या दिवशी पू. आजींना शौचाला झाले; पण अशक्तपणामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती. आता त्यांची सर्व सेवा मलाच करायची होती. मी अशा प्रकारची सेवा कधीच केलेली नसल्यामुळे ‘आता कसे करायचे ?’, असा विचार माझ्या मनात आला. माझ्याकडून लगेचच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना झाली, ‘तुम्हीच माझ्याकडून ही सेवा करून घ्या.’ त्यानंतर ‘गुरुदेवांनी पू. आजींच्या देहत्यागापर्यंत माझ्याकडून सर्व सेवा सहजतेने करून घेतल्या’, असे मला जाणवले. मला पू. आजींच्या सेवेतून आनंद मिळाला.

नावाप्रमाणेच आनंदी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी या नावाप्रमाणेच आनंदी होत्या. त्यांच्या संदर्भातील या अनुभूती वाचल्यावर त्यांची आध्यात्मिक श्रेष्ठता लक्षात येते. अशा पू. आजींच्या आध्यात्मिक प्रगतीबद्दल त्यांना माझा नमस्कार !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२.६.२०२६)

१ आ. पू. आजींच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

१. पू. आजींनी देह ठेवल्यावर मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. तेव्हा ‘पू. आजी आमच्यातच आहेत’, असे मला वाटत होते.

२. मी पू. आजींचे हात हातात घेतले आणि त्यांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी स्पर्श केला. तेव्हा ‘त्यांचा प्रत्येक अवयव पुन्हा जागृत झाला आहे’, असे मला वाटत होते.

३. मध्यरात्री २.३० च्या सुमारास मी त्यांचा हात हातात घेतला आणि नामजप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझा ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’, हा जप होऊ लागला.

४. २६.५.२०२६ या दिवशी मी पू. आजींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेले. तेव्हा माझ्याकडून त्यांच्या चरणी प्रार्थना झाली, ‘तुमच्या कृपेने माझी साधना होऊ दे. माझी आध्यात्मिक उन्नती होऊ दे.’

२. श्री. अमोल नारायण पाटील (पू. आनंदी पाटील यांचा मधला नातू), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे.

अ. ‘पू. आजींच्या देहत्यागानंतरही त्यांच्यात जिवंतपणा जाणवत होता.’

३. सौ. कपिला महेश घाणेकर (पू. आनंदी पाटील यांची धाकटी नात), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे.

सौ. कपिला महेश घाणेकर

३ अ. पू. आजींच्या देहत्यागापूर्वी जाणवलेली सूत्रे

३ अ १. खालावलेल्या शारीरिक स्थितीविषयी कोणतेही गार्‍हाणे न करता शांत आणि स्थिर असणे अन् देवाच्या अनुसंधानात रहाणे : ‘पू. आनंदी पाटीलआजी रुग्णाईत असतांना शेवटचे २ मास केवळ भाताची पेज आणि पाणी घेत असत, तरी त्यांच्या चेहर्‍यावर किंवा त्यांच्या बोलण्यातून कधीच गार्‍हाणे जाणवत नसे. त्या अत्यंत शांत आणि स्थिर होत्या. त्यांची शारीरिक स्थिती अत्यंत खालावलेली होती; पण त्यांनी आम्हाला त्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही. अशा रुग्णाईत स्थितीतही पू. आजी दोन्ही हात वर करून हात जोडून देवाला नमस्कार करायच्या. त्या वेळी ‘जणू भगवंत त्यांच्या समोर येऊन उभा आहे आणि त्या त्याला नमस्कार करत आहेत’, असे मला वाटत असे.

३ अ २. पू. आजींच्या देहावर अनेक दैवी कण दिसणे : शेवटच्या आजारपणात पू. आजींना हालचाल करणे कठीण झाले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘डायपर’ (मल-मूत्र शोषून घेण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) वापरावे लागत असे. पू. आजींचे डायपर पालटतांना त्यांच्या आठव्या आणि नवव्या द्वाराच्या ठिकाणी अनेक दैवी कण दिसायचे. रुग्णाईत असतांनाही त्यांच्या देहावर नेहमीच दैवी कण दिसायचे. त्यांची सेवा करतांना माझ्या हातावरही दैवी कण दिसत असत.

३ अ ३. ‘पू. आजींनी अन्न-पाणी त्यागणे’, हे ऋषिमुनी करत असलेल्या तपस्येप्रमाणे वाटणे आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनीही तसेच विश्लेषण करणे : आधी पू. आजी काही चमचे भाताची पेज आणि पाणी घेत असत. २२.५.२०२६ या दिवशी रात्री पू. आजींनी पाणीही घेणे थांबवले. त्या वेळी त्यांची सून, म्हणजेच माझी आई श्रीमती नयना नारायण पाटील हिने मला विचारले, ‘‘या काहीच न खाता-पिता कशा रहातात ? त्यांना पाहून पुष्कळ वाईट वाटते. त्यांच्यासाठी काय करायचे ?’’ तेव्हा मी पू. आजींकडे पाहिले असता मला त्या अत्यंत शांत वाटल्या. ‘पू. आजी या लोकात नसून वेगळ्याच लोकात आहेत आणि ध्यानावस्थेत आहेत’, असे मला स्पष्ट जाणवत होते. मी आईला सांगितले, ‘‘त्या सध्या देहाने आपल्यात आहेत; पण सूक्ष्म रूपाने ऋषींप्रमाणे ध्यान-धारणा करत आहेत. ऋषी थंडी-वार्‍यात अन्न-पाण्याविना कित्येक वर्षे तपस्या करून भगवंताची भक्ती करायचे. आता पू. आजीही त्या स्थितीत आहेत. त्या आता थोर ऋषींप्रमाणे झाल्या आहेत.’’

२५.५.२०२६ या दिवशी सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे) आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५७ वर्षे) पू. आजींना भेटायला आल्या. त्या वेळी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितले, ‘‘पू. आजी वेगळ्याच स्थितीत आहेत. ध्यानावस्थेत आहेत. अशी स्थिती प्राप्त होण्यासाठी कोट्यावधी वर्षांची साधना लागते, तेव्हा कुठे ही अवस्था काही काळ अनुभवता येते. ऋषी जशी ध्यान-धारणा करतात, तशीच पू. आजींची स्थिती आहे.’’

३ अ ४. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) जाधवकाकू घरी आल्यावर घरातील वातावरणात पुष्कळ पालट जाणवला. त्यांच्या आगमनानंतर चैतन्य पुष्कळच वाढले. वातावरणात वेगळीच शांतता जाणवत होती.

३ आ. पू. आजींच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

१. पू. आजींच्या देहत्यागाच्या रात्री मी पू. आजींच्या पार्थिवाच्या शेजारी बसून नामजप करत होते. त्या वेळी मला चैतन्य मिळाल्याने मला वाईट शक्तीचा पुष्कळ त्रास होऊ लागला.

२. त्यानंतर पहाटे ४ वाजता मी माझा एक हात पू. आजींच्या आज्ञाचक्रावर आणि दुसरा हात त्यांच्या अनाहतचक्रावर ठेवून नामजप करत होते. त्या वेळी ‘पू. आजींच्या कपाळावरच्या शिरा हलत आहेत, तसेच त्यांची छाती श्वासोच्छ्वास चालू असल्याप्रमाणे धडधडत आहे’, असे मला जाणवत होते. मी साधारण अर्धा घंटा हाताने आजींच्या त्याच चक्रांवर न्यास केला. त्या वेळीही मला ‘पू. आजी जिवंत आहेत. त्यांच्या हृदयाचे कार्य चालू आहे’, असे जाणवत होते.

३. रात्री १ वाजता मी पू. आजींच्या पार्थिवाच्या हाता-पायांना तेल लावू लागले. तेव्हा आधी त्यांचे हात-पाय कडक लागत होते; पण तेल लावल्यानंतर त्यांचे हात-पाय नेहमीप्रमाणे मऊ, कोमल आणि पिवळे झाले. मला त्यांची हालचाल एखाद्या जिवंत व्यक्तीप्रमाणे जाणवत होती.

४. पू. आजींचे अंतिम दर्शन घेतांना त्यांचा तोंडवळा अधिकच तेजस्वी आणि चैतन्यमय जाणवला.

५. त्यांचे चरण नुकत्याच जन्मलेल्या बालकाप्रमाणे नाजूक वाटत होते.

६. त्यांच्यातील तेजतत्त्व वाढल्यामुळे त्यांचे चरण चमकत होते.’

४. सौ. ऋतिका मयुरेश म्हात्रे (पणती (नातीची मुलगी)), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे.

४ अ. ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या भेटीनंतरच पू. आजी देहत्याग करतील’, असे वाटणे अन् तसेच घडणे : ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव, या दोघी पू. आजींना भेटायला येणार होत्या; पण अन्य सेवांमुळे त्यांचे पू. आजींना भेटणे होत नव्हते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘पू. आजी सद्गुरु अनुराधाताई आणि पू. जाधवकाकू यांच्या भेटीसाठीच थांबल्या आहेत. पू. आजींची त्या दोघींशी भेट झाल्यानंतर पू. आजी देहत्याग करतील’ आणि प्रत्यक्षातही तसेच झाले.’

५. सौ. सुजाता अमोल पाटील (नातसून), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे.

अ. ‘पू. आजींच्या देहत्यागाच्या वेळी ‘पू. आजी श्री गुरूंच्या चरणांजवळ बसून त्यांना नमस्कार करत आहेत’, असे मला जाणवले.

आ. पू. आजींना ज्या खाटेवर झोपवले होते, तिच्या मागच्या भिंतीवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र होते. ‘त्या छायाचित्रातील श्री गुरूंच्या चरणांतून पू. आजींच्या दिशेने पांढरा प्रकाश येत आहे’, असे मला जाणवत होते.’

६. कु. आराध्या महेश घाणेकर (पणती (नातीची मुलगी), आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय १३ वर्षे), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे.

६ अ. पू. आजींचे पार्थिव रुग्णवाहिकेतून देवदला नेतांना भीती न वाटणे : आम्ही अंतिम संस्कारांसाठी पू. आजींचे पार्थिव रुग्णवाहिकेतून देवद (पनवेल) येथे घेऊन जात होतो. त्या वेळी मी आईच्या समवेत रुग्णवाहिकेत बसले होते. रस्त्यावरून जातांना अन्य कोणाचे पार्थिव किंवा अंत्ययात्रा पाहिली की, मला भीती वाटते. पू. आजींच्या देहत्यागानंतर मी पहिल्यांदाच इतक्या जवळून पार्थिव पहात होते, तरीही मला भीती वाटली नाही.

६ इ. पू. आजींकडे पाहून मला आनंद जाणवत होता.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ३१.५.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.