मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !

श्री राजमातंगी महायागाच्या वेळी पूर्णाहुती देतांना  श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि अन्य पुरोहित

१. श्रीमती सोम गुप्ता, ठाणे, महाराष्ट्र. 

अ. ‘१६.५.२०२६ या दिवशी, म्हणजे यज्ञाच्या आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी ‘श्री दुर्गादेवी वाघावर स्वार होऊन यज्ञस्थळी भ्रमण करत आहे आणि ती चहुबाजूंचे निरीक्षण करत आहे’, असे मला जाणवले.’

२. कु. एकता राम, देवघर, झारखंड. 

अ. ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ पहातांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती.

आ. जेव्हा यज्ञाचा संकल्प होऊन मंत्रोच्चारांना आरंभ झाला, तेव्हा मला माझ्या विशुद्धचक्रावर वेगळीच संवेदना जाणवू लागली. ‘त्या चक्रामध्ये शक्ती कार्यरत झाली आहे आणि तेथे साक्षात् राजमातंगीदेवी उपस्थित आहे’, असे मला पुनःपुन्हा जाणवत होते.’

३. श्रीमती रेणु शर्मा, जमशेदपूर, झारखंड.

अ. ‘यज्ञ चालू असतांना बराच वेळ मला त्या यज्ञाचा मधुर सुगंध येत होता. त्यामुळे माझे मन आनंदी होत होते.

आ. ‘माझ्या घरातच यज्ञ चालू आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता.’

४. श्रीमती बबिता गांगुली, कोलकाता, बंगाल; सौ. पिंकी केशरी, कतरास, झारखंड; सौ. रजनी श्रीवास्तव, कतरास, झारखंड आणि सौ. स्मिता राठौर, धनबाद, झारखंड.

अ. ‘महापूर्णाहुती चालू असतांना मला यज्ञाचा तीव्र सुगंध येत होता. त्या वेळी ‘जणू आमच्या घरीच हा यज्ञ होत आहे’, असे मला वाटत होते.

आ. मला यज्ञाच्या धुराचा स्पर्श अनुभवता येत होता.

इ. जेव्हा यज्ञातून पुष्कळ धूर येत असल्याचे प्रक्षेपणाच्या पडद्यावर दिसले, तेव्हा तो धूर माझ्या डोळ्यांत जाऊन डोळ्यांची जळजळ झाली आणि डोळ्यांतून पाणी येत होते.

ई. पुरोहित यज्ञात गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करत असतांना मला गुलाबाचा मधुर सुगंध येत होता.’

५. सौ. मीनू खैतान, कोलकाता, बंगाल.

अ. ‘महायज्ञाचे प्रक्षेपण पहातांना ‘प्रक्षेपणासाठी लावलेल्या भ्रमणसंगणकाच्या पडद्यातून महायज्ञाचा धूर बाहेर येत आहे’, असे मला जाणवले.

आ. यज्ञ करणार्‍या पुरोहितांनी सांगितल्यानंतर सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, तसेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दांपत्यांनी परस्परांना हार घातले. तेव्हा ‘ते दृश्य दिव्य लोकाची अलौकिक अनुभूती देत आहे’, असे मला  जाणवले.’

६. कु. आद्या सिंह, बेंगळुरू, कर्नाटक.

अ. ‘महायज्ञाच्या वेळी मला आकाशात नारंगी, गुलाबी, जांभळा, निळा इत्यादी वेगवेगळे रंग दिसत होते. त्या वेळी आकाश अत्यंत सुंदर दिसत होते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक