या अनुभूती वाचल्यानंतर ‘देव आणि गुरु आपले श्रद्धाळू साधक, तसेच भक्त यांची कशी काळजी वहातात’, हे वाचकांच्या निश्चितच लक्षात येईल ! आपणही श्रद्धेने साधना करत राहिलो, तर देव युद्धजन्य काळातही आपल्यासाठी धावून नाही का येणार ? त्यामुळे साधकांनी येणार्या आपत्काळाचे भय न बाळगता श्रद्धेने साधना करावी. या अनुभूतींवरून ‘जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती’ हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वचन किती सार्थ आहे’, हे लक्षात येते. या अनुभूतींसाठी देवता, गुरु आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या भक्ताला स्वामी समर्थांनी सुखरूप ठेवून कोणत्याही वेदना जाणवू न देणे

अ. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्यावर भक्ताच्या छातीत दुखणे आणि डोळे बंद असतांना त्यांना स्वामी समर्थांचे दर्शन होणे : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे एक परम भक्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. ते म्हणाले, ‘‘एकदा मी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. तेव्हा अकस्मात् मला दमल्यासारखे वाटू लागल्याने मी एका झाडाखाली बसलो. त्या वेळी मला चक्कर येऊन माझ्या छातीत दुखत होते. माझे डोळे बंद असतांनाच मला श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला.’’

आ. हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील रुग्णालयात भरती केल्यावर चार दिवसांनी शुद्धीवर आलेल्या भक्ताने ‘स्वामी समर्थांनी मला कोणत्याही वेदनांची जाणीव होऊ दिली नाही’, असे सांगणे : त्या भक्तांनी पुढे सांगितले, ‘‘नंतर मी डोळे उघडले. तेव्हा मी मुंबईतील एका रुग्णालयात होतो. याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटल्याने मी नातेवाईकांना ‘मी कुठे आहे ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘तुम्ही अक्कलकोटला गेला असतांना तुम्हाला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला. तेथे स्थानिक उपचार करून तुम्हाला तातडीने मुंबईला आणावे लागले. येथे आल्यावर तुमच्यावर वैद्यकीय उपचार झाले आणि आज ४ दिवसांनंतर तुम्ही शुद्धीवर आला आहात !’’ ते भक्त पुढे म्हणाले, ‘‘आजारपणाचा हा संपूर्ण काळ मला ‘स्वामींचे दर्शन होणे, त्यांनी आशीर्वाद देणे आणि मला आनंद होणे’, असा क्षणार्धात गेल्याचेच आठवते. स्वामींनी मला अन्य कोणत्याही वेदनांची जाणीवच होऊ दिली नाही.’’
– श्री. योगेश जलतारे
भक्तांना तीर्थयात्रेला जाण्यापासून थांबवून मोठ्या अपघातातून त्यांचे रक्षण करणार्या पू. कलावतीआई !

अ. तीर्थयात्रेला जाण्यास इच्छुक असलेल्या भक्तदांपत्याला पू. कलावतीआई यांनी परावृत्त करूनही त्यांनी आगाऊ रक्कम देऊन यात्रेस जाण्याचे ठरवणे : बेळगाव येथील संत पू. कलावतीआई यांचे एक भक्तदांपत्य रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी त्यांची अनुभूती सांगितली. ते तीर्थयात्रेला जाण्यास इच्छुक होते. त्यांनी पू. कलावतीआई यांच्याकडे तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती मागितली. पू. आई म्हणाल्या, ‘‘जायलाच हवे का ?’’ भक्तांची इच्छा प्रबळ असल्याने त्यांनी आईंच्या अनुमतीची वाट न पहाता तीर्थयात्रेचे पूर्व आरक्षण करून पैसेही भरले. पू. कलावतीआईंनी पुन्हा २ – ३ वेळा त्यांना ‘तीर्थयात्रेला जायलाच हवे का ?’, असे विचारले. भक्तांनी सांगितले, ‘‘भरलेले पैसे वाया जातील. त्यामुळे आम्ही जाऊन येतो.’’ पू. आई म्हणाल्या, ‘‘ठीक आहे, तुमची इच्छा !’’
आ. तीर्थयात्रेला जाण्याच्या आदल्या रात्री जुलाबाचा त्रास होऊन जाणे रहित करावे लागणे आणि नंतर यात्रेच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे कळणे : तीर्थयात्रेला जाण्याच्या आदल्या रात्री दांपत्याला जुलाबाचा त्रास झाला. त्यांना नाईलाजाने तीर्थयात्रेला जाणे रहित करून चिकित्सालयात उपचारांसाठी जावे लागले. कालांतराने कळले की, त्यांनी तीर्थयात्रेसाठी ज्या गाडीचे आरक्षण केले होते, त्या गाडीला अपघात झाला होता. सर्व यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. या अपघातात काहींचे प्राणही गेले. तेव्हा त्यांना ‘पू. कलावतीआई तीर्थयात्रेला जाण्यापासून का परावृत्त करत होत्या ?’, ते कळले. भक्तांनी आज्ञापालन केले नाही, तरी त्यांच्याप्रती असलेल्या प्रेमामुळे जुलाबाच्या निमित्ताने पू. आईंना त्यांना बळे बळे थांबवावे लागले. यावरून संतांचे सामर्थ्य लक्षात येते.
– श्री. योगेश जलतारे
शिष्येच्या (पू. लोंढेआजी यांच्या) यजमानांना सेवेत गुंतवून ठेवून त्यांचा मृत्यूयोग टाळणार्या पू. गोदावरीआई !

अ. पू. गोदावरीआई यांच्या मठात सेवा करणार्या सनातनच्या संत पू. लोंढेआजींच्या यजमानांना पू. आईंनी सायंकाळी घरी जाण्याची अनुमती न देणे : अहिल्यानगर जिल्ह्यात साकुरी गावात शिर्डीच्या साईबाबांचे शिष्य प.पू. उपासनी महाराज हे थोर संत होऊन गेले. त्यांच्या शिष्या पू. गोदावरीआई यांच्याकडे सनातन संस्थेच्या पू. (कै.) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढेआजी (वय ९५ वर्षे) नियमितपणे परिवारासह सेवेसाठी जात. पू. आजींचे यजमान क्वचितच तेथे जात आणि रात्री घरी परत येत. एकदा मठात उत्सव होता. पुष्कळ पाऊस पडत होता. पू. लोंढेआजींना सोडण्यासाठी लोंढेआजोबा मठात आले. त्यांनी तेथे थोडा वेळ सेवा केली. सायंकाळी त्यांनी पू. गोदावरीआई यांच्याकडे घरी जाण्याची अनुमती मागितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आणखी थोडा वेळ सेवा करू शकता का ? अजून थोडी सेवा बाकी आहे !’’ आजोबांनाही विशेष अडचण नव्हती; म्हणून ते आणखी थोडा वेळ सेवा करत राहिले.
आ. रात्र झाली, तरी आजोबांना घरी जाण्याची अनुमती न मिळणे आणि काही वेळाने ‘मुसळधार पावसामुळे त्यांचा पूर्ण वाडा कोसळून भुईसपाट झाला’, अशी बातमी कळणे : पुन्हा एकदा त्यांनी पू. गोदावरीआईंना घरी जाण्याविषयी विचारले; कारण वाड्यामध्ये अन्य कुणी नव्हते; परंतु पू. गोदावरीआईंनी अनुमती दिली नाही. काही वेळानंतर बातमी कळली की, ‘मुसळधार पावसामुळे त्यांचा पूर्ण वाडा कोसळला. त्या वेळी ‘पू. गोदावरीआई सेवेसाठी आग्रह का करत होत्या’, हे लक्षात आले. ते जर सेवा सोडून वाड्यात झोपायला गेले असते, तर त्यांना जीवनाला मुकावे लागले असते. त्यांच्या रक्षणासाठीच गुरुमाऊलींनी सेवेचे निमित्त करून त्यांना मठात थांबवून घेतले.
– श्री. योगेश जलतारे
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी त्यांच्या शिष्याला भूकंपाच्या वेळी ध्यानस्थ बसवून जीवदान देणे

अ. पहाटे नामजप आणि ध्यान करणार्या भक्ताला ध्यानातून बाहेर आल्यावर स्वतःचे पूर्ण अंग मातीने माखलेले दिसणे : सनातन संस्थेच्या सत्संगात एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे एक भक्त आले होते. ते पूर्वी लातूर येथे रहात असत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतल्यानंतर प्रतिदिन पहाटे साडेतीन वाजता उठून नामजप करण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्याप्रमाणे ते नियमित नामजप करण्याचा प्रयत्न करत. एकदा पहाटे उठून ते नामजपाला बसले असतांना त्यांचे ध्यान लागले. थोड्या वेळाने कुणीतरी त्यांना ध्यानातून उठवले. तेव्हा त्यांना ‘स्वतःचे पूर्ण अंग मातीने माखलेले आहे’, असे दिसले.
आ. गावात ४ दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाल्याने भक्ताचे घर भुईसपाट होणे; पण ध्यानमग्न भक्त मात्र महाराज यांच्या कृपेमुळे मातीच्या ढिगार्याखाली ४ दिवस जिवंत रहाणे : त्या भक्तांनी तेथे जमलेल्या लोकांना विचारले, ‘‘काय झाले आहे ?’’ तेव्हा लोकांनी सांगितले की, ‘या गावात ४ दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला आणि त्यात तुमचे घर भुईसपाट झाले. मातीच्या ढिगार्याखाली ‘कुणी जिवंत आहेत का ?’ याची शोधमोहीम चालू असतांना ‘तुमचा श्वास चालू आहे’, असे लक्षात आल्यावर लोकांनी ढिगारा बाजूला करून तुम्हाला बाहेर काढले.’ तेव्हा भक्त म्हणाले, ‘‘मी नामजपात मग्न झाल्याने महाराज यांनीच माझे रक्षण केले. त्यांच्यामुळे ४ दिवसांनंतरही मी मातीच्या ढिगार्याखाली जिवंत राहू शकलो.’’
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (५.३.२०२६)
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !