‘सेवा’ हा ध्यास असलेले आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे नाशिक येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिल विष्णु पाटील (वय ७९ वर्षे) !

साधनेचे महत्त्व लक्षात आल्यावर नाशिक येथील श्री. अनिल पाटील (वय ७९ वर्षे) यांनी वर्ष २००३ मध्ये रेल्वेच्या विद्युत् विभागातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि अधिकाधिक वेळ साधनेला देण्यास आरंभ केला. गेली २५ वर्षे ते तळमळीने साधना करत आहेत. त्यांच्या मुली आणि सहसाधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. अनिल पाटील

१. श्रीमती अनघा पित्रे (श्री. अनिल पाटील यांची मोठी मुलगी), द्वारका, नाशिक आणि सौ. आर्या पाटील (धाकटी मुलगी), कात्रज, पुणे.

श्रीमती अनघा पित्रे

१ अ. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ : ‘वर्ष २००० मध्ये मध्य रेल्वे (मुंबई) येथील कार्यालयात भोजनाच्या सुटीत (दुपारी १.३० ते २ या वेळेत) कर्मचार्‍यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने सत्संग घेण्यात येत असे. त्या सत्संगाचा माध्यमातून आमचे बाबा श्री. अनिल पाटील हे संस्थेशी जोडले गेले. सत्संगाला नियमितपणे गेल्यामुळे त्यांना आनंदाची अनुभूती आली. त्यानंतर त्यांनी ‘नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता’, या साधनेच्या त्रिसूत्रीने व्यष्टी साधनेला आरंभ केला.

१ आ. प्रसारसेवेला आरंभ आणि पूर्णवेळ साधनेचा निर्णय : त्यानंतर बाबांनी घरातील आणि संपर्कातील सर्वांना नामजपाचे महत्त्व सांगून प्रसारसेवेला आरंभ केला. त्यांनी नोकरी करत असतांना प्रसारात मिळतील त्या सेवा केल्या. वर्ष २००३ मध्ये त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.

१ इ. कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्साहन देणे : वर्ष २००२ मध्ये त्यांनी मला (सौ. आर्या पाटील हिला) देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले. बाबांच्या समवेत आईसुद्धा सेवा करू लागली. बाबा तिला जमेल तसे साहाय्य करत असत.

१ ई. अध्यात्म जगणे : बाबांनी साधनेला आरंभ केल्यावर काही वर्षांतच आमच्याशी व्यावहारिक बोलणे सोडून दिले. ते केवळ साधनेविषयीच आमच्याशी बोलू लागले. माझ्या (सौ. आर्या पाटील यांच्या) लग्नानंतरही ते माझ्याशी नेहमी साधनेविषयी बोलायचे आणि आशीर्वादसुद्धा ‘साधनेत प्रगती व्हावी’, असाच द्यायचे. मला मुलगी झाल्यावर ‘मला सेवा करता यावी’, यासाठी त्यांनी माझ्या वसाहतीमध्ये येऊन, प्रसार करून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्यासाठी मला साहाय्य केले. ‘मला संसारात राहून प्रत्येक कृतीतून सत्मध्ये रहाता यावे’, यासाठी त्यांनी मला मार्गदर्शन केले, उदा. जेवण करण्यापूर्वी अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे, अन्न ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करणे, वाहन चालवतांना वाहनदेवतेला प्रार्थना करणे, वाहनाची शुद्धी करणे इत्यादी.

१ उ. रुग्णाईत असतांना घरी दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील विविध विषयांवरील लेखांची कात्रणे कापून धारिका बनवणे : वर्ष २००५ च्या शेवटी अकस्मात् त्यांच्या छातीत दुखू लागले. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांच्या हृदयाच्या ३ रक्तवाहिन्या १०० टक्के बंद होत्या आणि एक रक्तवाहिनी ९० टक्के बंद होती. आधुनिक वैद्यांनाही आश्चर्य वाटले, ‘बाबांना अजूनही हृदयविकाराचा झटका कसा आला नाही ?’ आधुनिक वैद्यांनी लगेचच बाबांचे ‘बायपास’ शस्त्रकर्म (टीप) करण्याचा निर्णय घेतला. बाबांच्या साधनेमुळे भगवंताने त्यांची काळजी घेतली.

टीप – बायपास सर्जरी : हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळे (ब्लॉकेज) असल्यास रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी केले जाणारे जीवनरक्षक शस्त्रकर्म.

त्यानंतर पुढे वर्षभर त्यांना प्रसारासाठी बाहेर जाता येणार नव्हते; मात्र सेवेची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी घरात बसून ‘दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील वैशिष्ट्यपूर्ण लेख, आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भातील मार्गदर्शन आणि हिंदूंवरील आघातांच्या संदर्भातील लेख’, यांची कात्रणे कापून जुन्या चित्रकलेच्या वह्या वापरून त्यांच्या धारिका बनवल्या. एक वर्षानंतर जेव्हा त्यांना आधुनिक वैद्यांकडून प्रसाराला जाण्याची अनुमती मिळाली, तेव्हा त्या धारिकांचा वापर दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवण्यासाठी झाला. गुरुदेवांनी बाबांकडून आजारपणातही सेवा करून घेतली.

१ ऊ. रुग्णाईत पत्नीची सेवा सांभाळून व्यष्टी आणि समष्टी साधना करणे : वर्ष २०१४ मध्ये माझी आई सौ. अपर्णा पाटील ही गंभीर रुग्णाईत झाली. तिचे सर्व अंथरुणात करावे लागे, तरीही बाबांनी कोणतीही सवलत न घेता ५ वर्षे तिची सेवा केली. ते पहाटे ३ वाजता उठून व्यष्टी साधना पूर्ण करत आणि सकाळी ६ ते ८ या वेळेत आईची सेवा करून प्रसारसेवेसाठी सिद्ध रहात.

आताही ते पहाटे ३ वाजता उठून व्यष्टी साधनेची सर्व सूत्रे पूर्ण करून कधीही प्रसारासाठी जायला सिद्ध असतात. अशा वडिलांच्या पोटी जन्म दिल्याबद्दल ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता !’

‘पितृदोष आणि वास्तूदोष असूनही वडिलांच्या साधनेमुळे कुटुंबियांचे सर्व सुरळीत चालू आहे’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘वर्ष २०१५ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होता. त्या वेळी आमच्या घरी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा मुक्काम होता. त्यांनी आईला आणि माझ्या बहिणीला सांगितले होते, ‘‘तुम्हाला पितृदोष आणि वास्तूदोषसुद्धा आहे. काका साधना करत आहेत; म्हणून सर्व सुरळीत चालू आहे; अन्यथा तुम्हाला पुष्कळ त्रास झाला असता.’’

– सौ. आर्या पाटील (श्री. पाटील यांची धाकटी मुलगी), कात्रज, पुणे. (७.१०.२०२५)

२. सौ. प्राची प्रशांत कुलकर्णी, द्वारका, नाशिक.

२ अ. प्रेमभाव : ‘पाटीलकाका वर्गणीदारांशी त्यांच्या वयाप्रमाणे बोलतात. वयस्कर व्यक्तींशी बोलतांना काका त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना नामजप करायला सांगतात. एखाद्या घरात लहान मुले असतील, तर काका त्यांच्याशी लहान होऊन बोलतात. काका त्यांना खाऊ देतात. ते मुलांना प्रश्न विचारून बोलण्यास उद्युक्त करतात.

२ आ. वेळेचे पालन करणे : सेवा असेल किंवा सत्संगाला जायचे असेल, तर काका दिलेल्या वेळेच्या आधीच सिद्ध होतात. ते ‘साधकांचा वेळ व्यर्थ जाणार नाही’, याची काळजी घेतात. सकाळी ७ वाजता जरी सेवेला जाण्याचे नियोजन असले, तरी काका सकाळी ६.३० वाजता सिद्ध असतात.

सौ. आर्या पाटील

२ इ. परिणामकारक प्रसारसेवा करण्याचा प्रयत्न करणे : काका प्रसाराला जातांना त्यांच्याकडे असलेले वर्गणीदार अर्ज, ‘सनातन प्रभात’चे जुने अंक, ‘सनातन प्रभात’मधील विविध विषयांवरील कात्रणांच्या धारिका इत्यादी समवेत घेऊन येतात. त्यामुळे प्रसारात या साहित्याचा उपयोग होतो.

२ ई. काका ‘सनातन प्रभात’चे जुने महत्त्वाचे अंक, साधनेचे उपयुक्त लेख इत्यादी साधकांना वाचण्यासाठी देतात.

२ उ. सेवेची आत्यंतिक तळमळ : काकांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे नवीन वर्गणीदार करणे, त्यांचे नूतनीकरण करणे, वाचकांना संपर्क करणे, अर्पण आणि विज्ञापने आणणे’, अशा अनेक सेवा करण्याची पुष्कळ तळमळ आहे. काही वर्षांपूर्वी काका नाशिक रोड भागात रहात असतांना त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे ५०० हून अधिक वर्गणीदार केले होते. अजूनही त्यांतील बरेच वाचक संस्थेशी जोडलेले आहेत. नूतनीकरणाच्या सेवेसाठी साधक काकांना समवेत घेऊन जातात. काका साधकांसह सकाळी ९ वाजता सेवेला गेले की, दुपारी किंवा कधी कधी सायंकाळी ५ – ६ वाजेपर्यंत सेवा करतात. वयाच्या ७९ व्या वर्षीही काकांची सलग ६ ते ८ घंटे सेवा करायची सिद्धता असते. अशा वेळी ते दुपारचा महाप्रसाद आणि विश्रांतीसुद्धा घेत नाहीत. केवळ ‘सेवा’ हा त्यांचा ध्यास असतो.

२ ऊ. ‘वाचकांनी साधना करावी’, याची तळमळ : काका वाचकांना भेटल्यावर त्यांना ‘साप्ताहिकातील लेख वाचले का ?’, असे विचारतात. काका लेखात आलेल्या सूत्रांविषयी माहिती देतात, जेणेकरून वाचक ते लिखाण वाचायला सिद्ध होतील. काका वाचकांच्या घरातील सगळ्यांना नामजप सांगतात. ‘नाम घेता का ?’, असे काका त्यांना विचारतात. ‘वाचक किंवा त्यांची मुले यांनी सेवा करावी’, यासाठी काका त्यांना सेवेचे महत्त्व आणि साधनेचे लाभ सांगतात. काकांच्या या तळमळीमुळे सौ. माधुरी भावे आणि श्री. किरण कात्रे (सेवानिवृत्त बँक अधिकारी) हे वाचक वयस्कर असूनही त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करायला आरंभ केला आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ७.१०.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक