जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !

देहू (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी सोहळ्यात यंदा नवीन चांदीचा रथ सिद्ध करण्यात येत असून त्याचे लाकडी नक्षीकाम पूर्ण झाले आहे. लाकडी रथाला चांदी लावण्याचे काम चालू करण्यात आले. साधारणत: २५० किलो चांदीचा वापर त्यासाठी करण्यात येणार आहे. पुण्यातील कोंढवा येथील सुरेश मिस्री आणि त्यांचे १० कारागीर चांदी लावण्याचे काम करत आहेत. राजस्थान येथील सुमेरपूर येथून बर्मा टिक सागवण लाकूड खरेदी करून वापरण्यात आले.

नवीन रथ निर्मितीसाठी साधारणत: १५० घनफूट लाकूड वापरण्यात आले असून त्यावर अत्यंत सुबक आणि कलात्मक कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. रथावरील नक्षीकाम दाक्षिणात्य स्थापत्यशैलीवर आधारित असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिकृतींमुळे रथ अधिक देखणा अन् भव्य बनत आहे. यंदाचा पालखी सोहळा ७ जुलैला देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून त्यापूर्वी नवीन पालखी रथाचे सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे.