सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज

हिंजवडी (पुणे) येथे आयोजित ‘वैदिक शाश्वत चिकित्सा शिबीर’ उत्साहात पार पडले

(डावीकडून) श्री. राजेश शर्मा, पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज आणि श्री. नीलेश जोशी

पुणे – सनातन धर्माचे रक्षण आणि धर्मप्रसार यांसाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. समितीच्या या धर्मकार्यात मीही समितीच्या समवेत राहून कार्य करीन, असे उद्गार पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज यांनी काढले. विविध शारीरिक व्याधींवर बिंदूदाबन उपचारपद्धती, योग आणि आयुर्वेद यांच्या साहाय्याने उपचार कसे करावेत ? याविषयी त्यांनी आयोजित शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शनही केले. हिंजवडी येथील ‘मेगापोलिस-स्प्लेंडर सोसायटीच्या क्लब हाऊस’मध्ये २० आणि २१ जून या कालावधीत पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज यांनी ‘वैदिक शाश्वत चिकित्सा शिबिरा’चे आयोजन केले होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश जोशी, श्री. राकेश शर्मा आणि श्री. ललित शर्मा यांनी पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला. त्यांना समितीच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्याची माहिती जाणून घेतल्यानंतर पू. स्वामीजींनी समिती करत असलेल्या कार्याचे कौतुक केले आणि समितीच्या कार्यात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. या शिबिराचा लाभ अनेक रुग्णांनी घेतला. पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज हे मूळचे लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील आहेत. बिंदूदाबन उपचारपद्धत, योगासने आणि आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीच्या उपयोगातून समाजाला निरोगी जीवनाचा मार्ग दाखवण्याचे कार्य स्वामीजी करत आहेत.