भारतियांमधील गुलामगिरीचा आजार मुळातून बाहेर काढणारी शिक्षणप्रणाली हवी !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. वर्ष १८३९ पर्यंत भारतात पावणेसात लाख गुरुकुल आणि ९१ टक्के साक्षरता !

‘वर्ष १८३९ च्या पूर्वी भारतीय शिक्षणव्यवस्था उन्नत होती. केवळ तमिळनाडूमध्ये  १ लाखांहून अधिक गुरुकुल कार्यरत होती आणि संपूर्ण भारतवर्षात पावणेसात लक्ष गुरुकुल चालवली जात होती. प्रत्येक गावात एक मोठे गुरुकुल होते. वर्ष १८३९ मध्ये इंग्रजांनी भारतातील मूळ संस्कृत विद्यालये आणि गुरुकुल बंद पाडली. त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीची कोणतीही व्यवस्था चालवणार्‍याला शिक्षा करण्याचे घोषित केले. वर्ष १८४९ मध्ये त्यांनी जनगणना केली. त्यात ९१ टक्के भारतीय लोक शिकलेले होते. मधल्या १० वर्षांत जन्मलेल्या मुलांना शिक्षणच मिळू शकले नाही; कारण त्यांना शिक्षण घेण्यासाठी एकही विद्यालय उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते सोडून अन्य सर्व जण साक्षर होते. यावरून ज्यांना वाटते की, भारतियांनी गरीब आणि स्त्रिया यांना शिक्षण दिले नाही किंवा विशिष्ट वर्गासाठीच शिक्षण दिले गेले, तर हे चूक आहे, हे येथे लक्षात येते. स्वातंत्र्यपूर्व भारतात भारतीय अशिक्षित होते, ही माहिती इंग्रजांनीच पसरवली होती आणि त्यांचा अहवालही खोटा होता.

श्री. जगदीश चौधरी यांचा परिचय

श्री. जगदीश चौधरी

श्री. जगदीश चौधरी हे ‘बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’चे संचालक आहेत. ते ‘ग्रीन इंडिया फाऊंडेशन’चे अध्यक्ष आहेत. ‘वर्ल्ड वॉटर कौन्सिल फ्रान्स-आशिया वेगन सोसायटी, काठमांडू’चे ते सदस्य आहेत. पर्यावरण रक्षण आणि जलसंवर्धन या क्षेत्रात ते मागील २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहे. ते त्यांच्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्र आणि धर्म’विषयक कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन करत असतात.

२. भारतात पाश्चात्त्य विचारसरणीच्या विश्वविद्यालयांची स्थापना

वर्ष १८३५ मध्ये ब्रिटिश संसदेत लॉर्ड मेकॉलेने म्हटले होते, ‘मी संपूर्ण भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत फिरलो. मला तेथे एकही गरीब, दरिद्री किंवा चोर व्यक्ती दिसली नाही. अशा लोकांशी आपण जिंकू शकत नाही आणि त्यांच्यावर शासनही करू शकत नाही. जोपर्यंत आपण त्यांची आध्यात्मिक शक्ती आणि सांस्कृतिक व्यवस्था नष्ट करत नाही, तोपर्यंत आपण भारतावर राज्य करू शकणार नाही. त्यांची सांस्कृतिक व्यवस्था तुच्छ दाखवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. विशेषत: आध्यात्मिक शक्तीच्या सूत्राचा मार्ग आपल्या शिक्षणपद्धतीतून गेला पाहिजे.’ त्यानंतर मूळ भारतीय शिक्षण केंद्रांनाच नष्ट करण्यात आले आणि ख्रिस्ती प्रचारकांची विद्यालये उघडण्यात आली. वर्ष १८५८ ते वर्ष १८६० या कालावधीत कोलकाता, मुंबई, प्रयागराज, चेन्नई, अशा विविध ठिकाणी विश्वविद्यालये चालू करण्यात आली. त्यातून भारतियांच्या २-३ पिढ्या शिकून बाहेर पडल्या, ज्यांच्यावर इंग्रजांच्या पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव होता.

जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष १९९२ नंतर जन्मलेल्या मुलांचे वय अनुमाने ३४ वर्षे झाले आहे. त्यांच्यामध्ये भारताप्रती कोणताच भाव दिसून येत नाही. त्यांच्याहून वयाने मोठे असलेल्या लोकांना भारताविषयी खरी माहिती आहे आणि ते भारताशी मनाने जोडलेले आहेत. या नवीन मुलांनी बालपणापासूनच गोळीबार आणि आतंकवादी व्यवस्था पाहिली आहे. त्यामुळे ‘भारताचे सैनिक त्यांच्या विरोधात कार्य करत असून ते त्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे’, असेच कदाचित् त्यांना वाटत असावे.

३. स्वतंत्र भारताच्या शिक्षणपद्धतीत मूळ भारतीय दर्शनाचा अभाव

वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले. भारताच्या शिक्षण सल्लागार मंडळातही अनेक मुसलमान सदस्य रहात आले आहेत. त्यामुळे भारताचा इतिहास वाचला, तर केवळ भारतीय समाजावर बाहेरच्या लोकांनी कसे आक्रमण केले आणि त्यांनी कशा प्रकारे राज्य चालवले ? हेच शिकवले जाते. त्यात भारताचे खरे दर्शनच होत नाही. या व्यतिरिक्त सध्याच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भारताचा खरा इतिहास मिळणार नाही. भारताच्या सहस्रो लोकांनी इंग्रजी भाषेत साहित्य लिहिले आहे, त्यांचे साहित्य विद्यालयात शिकवले जात नाही. भारताचे लोक नव्या दमाने भारतीय म्हणून उभे न रहाता ब्रिटिशांचे गुलाम म्हणून रहावे, यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्नपूर्वक तशी शिक्षणव्यवस्था निर्माण केली. कुणाही भारतियाला शिक्षणानंतर नोकरी करायची असते. नोकरी ही गुलामगिरीचे प्रतीक आहे. भारतीय शिक्षण मुक्ती, तर पाश्चात्त्य शिक्षण गुलामी देते.

४. मनुष्याचे जीवन सार्थक करणारी शिक्षणव्यवस्था हवी !

उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतरही त्या व्यक्तीला संपत्तीची हाव असते. त्यामुळे ती सतत असंतुष्ट असते. स्वत:च अशांत असलेली व्यक्ती दुसर्‍याला शांती देऊ शकत नाही. त्यामुळे आजचे शिक्षण मनुष्याला ना मोक्ष देते, ना शांती देते. जे शिक्षण मनुष्याचे जीवन सार्थक बनवू शकत नाही, त्याला शिक्षित म्हणता येत नाही. इंग्रजांनी भारतियांच्या हाडाचा कणा तोडून त्यात एक नकली लोह भरले आणि वरून दिखाऊ पॉलिश केले आहे. भारताची शैक्षणिक धोरणे ही केवळ ‘दिखाऊ पॉलिश’चे काम करतात. ती भारतियांमधील गुलामगिरीचा आजार मुळातून बाहेर काढत नाहीत. देशात अशी व्यवस्था हवी, जेथे मनुष्य स्वतःच सिद्ध होईल आणि त्याच्या क्षमतांसह त्याचे कार्य अनमोल होईल. भारताची माती, पाणी आणि हवा यांच्यामुळे आपल्याला कितीही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, तरी आपण हिंदू कायमचे दबले जाऊ शकत नाही; कारण ही भारताची दैवी मातीच आपल्याला स्वतःच्या पायावर उभे रहाण्याचे बळ देते. येथे स्वामी विवेकानंद यांच्यासारखे धर्मयोद्धे माणसे निर्माण करून जगाला खर्‍या हिंदुत्वाचे दर्शन घडवतात.’

– श्री. जगदीश चौधरी, संचालक, ‘बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’, बल्लभगड, हरियाणा.