शेवटच्या दिवसांत लाभलेल्या आश्रमजीवनाचा साधनेसाठी लाभ करून घेऊन स्वतःत पालट घडवून आणणार्‍या तिवसा (जिल्हा अमरावती) येथील कै. (श्रीमती) वंदना पंजाबराव कळमकर (वय ६५ वर्षे) !

२५.५.२०२६ या दिवशी कै. (श्रीमती) वंदना पंजाबराव कळमकर यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्या निमित्ताने….

१५.५.२०२६ या दिवशी रात्री १२.३० वाजता अमरावती येथील साधिका श्रीमती वंदना पंजाबराव कळमकर (वय ६५ वर्षे) यांचे निधन झाले. २५.५.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि एक साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. (श्रीमती) वंदना पंजाबराव कळमकर

१. सौ. नम्रता नीलेश वानखडे (कै. (श्रीमती) वंदना कळमकर यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. गुरूंवरील श्रद्धेमुळे पतीच्या निधनानंतरही स्थिर असणे : ‘२.६.२०२५ या दिवशी माझे वडील (कै. पंजाबराव कळमकर) यांचे निधन झाले. त्या कठीण परिस्थितीतही आई अत्यंत स्थिर होती. ‘प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आहेत. सर्वकाही चांगलेच होणार’, अशी तिची श्रद्धा होती.

सौ. नम्रता नीलेश वानखडे

१ आ. रामनाथी आश्रमात आल्यानंतर मनातील सर्व नकारात्मक विचार आणि दुःख दूर होणे : वडील गेल्यानंतर आईचे व्यवहारातील लक्ष पूर्णपणे उडाले होते. तिची कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नव्हती. रामनाथी आश्रमात येण्याच्या एक आठवडा आधी आईच्या मनात संघर्ष चालू होता, ‘आपल्याला आश्रमात रहाता येईल का ?’ तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘तू प.पू. डॉक्टरांना प्रार्थना कर आणि सर्वकाही त्यांच्यावर सोडून दे.’’ त्यानंतर ती आश्रमात यायला सिद्ध झाली. नातेवाइकांनी वडिलांच्या निधनानंतर कोणतेही साहाय्य केले नाही, याचे तिला मनातून वाईट वाटत होते; पण  आश्रमात आल्यानंतर तिच्या मनातील सर्व नकारात्मक विचार आणि दुःख दूर झाले. तिला आश्रमात इतके छान वाटत होते की, ती मला म्हणाली, ‘‘आता मी आश्रमातच रहाते.’’

१ इ. शिकण्याची वृत्ती : आश्रमात आल्यानंतर स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत ती आढाव्याला जात असे. आढाव्यात तिला जे काही शिकायला मिळाले, ते ती प्रसंगानुसार मला सांगत असे किंवा ‘त्याविषयी तिची विचारप्रक्रिया काय झाली ?’, हेही सांगत असे.

१ ई. ती उपायांसाठीचा नामजप गांभीर्याने करत असे.

१ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : एकदा आई तिच्या आजारपणात तिला परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) संदर्भात आलेली अनुभूती सांगत होती. ‘परम पूज्य प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या समवेत कसे असतात ?’, हे सांगत असतांना तिच्या बोलण्यात पुष्कळ भाव जाणवत होता आणि ‘ती परम पूज्यांना अनुभवत आहे’, असे मला वाटत होते. एरव्हीही ती परम पूज्यांविषयी बोलत असतांना तिचा भाव जागृत होत असे.

१ ऊ. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

१ ऊ १. स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागणे

अ. जून मासामध्ये आईचे हृदयाचे शस्त्रकर्म करायचे ठरले होते. त्याविषयी मी आईशी बोलल्यावर ती मला म्हणाली, ‘‘शस्त्रकर्म करावे लागणार नाही.’’ असे ती अनेक वेळा म्हणायची. तिच्या मृत्यूनंतर मला जाणवले, ‘तिला तिच्या मृत्यूची चाहूल लागली होती.’

आ. तिने नातेवाइकांना आधीच सांगून ठेवले होते, ‘‘मी १५.५.२०२६ या दिवशी येते. तुम्ही मला भेटायला या.’’ तिने १५.५.२०२६ या दिवशी रात्री १२.३० वाजता प्राण सोडले.

१ ऊ २. शेवटच्या क्षणी मुखात ‘प.पू. डॉक्टर’, हे नाव असणे : १५.५.२०२६ या दिवशी रात्री ११.३० वाजता अकस्मात् आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी लगेच सद्गुरु गाडगीळकाकांना (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (वय ६२ वर्षे) यांना) उपाय विचारले. त्यांनी आईला ‘निर्गुण’, हा नामजप करायला सांगितला. आईला श्वास घेण्यास त्रास होत असतांना ती माझ्या बहिणीला (सौ. नितल मुरादे यांना) ‘प.पू. डॉक्टर’ म्हणा’, असे सांगत होती. शेवटी ‘प.पू. भक्तराज महाराज, प.पू. डॉक्टर, तुम्ही या आणि मला घेऊन जा’, असे म्हणत तिने शेवटचा श्वास सोडला. शेवटच्या क्षणी तिने आम्हा तिघा भावंडांची आठवण काढली नाही. त्या वेळी तिच्या मुखात केवळ ‘प.पू. डॉक्टर’, हेच नाव होते.

१ ए. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. रात्री १ वाजल्यापासून दुसर्‍या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मी जेव्हा जेव्हा आईला पाहिले, तेव्हा तेव्हा तिच्या चेहर्‍यावर एक वेगळेच तेज दिसत होते.

२. तिच्या चेहर्‍यावर ताण, काळजी किंवा त्रास, असे काही नव्हते.

३. ‘ती शांत झोपली आहे’, असे मला वाटत होते.

४. तिच्या डोक्यावर एक दैवी कण होता.

५. आईला पाहून नातेवाईक आणि शेजारी म्हणाले, ‘‘मृत व्यक्तीचा चेहरा चांगला दिसत नाही’, असे म्हणतात; पण आईच्या चेहर्‍यावर पुष्कळ तेज आहे. ‘घरात कोणाचे निधन झाले आहे’, असे वाटतच नाही. घरात शांत जाणवत आहे.’’

२. श्री. नीलेश वानखडे (कै. (श्रीमती) वंदना कळमकर यांचे जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. नीलेश वानखडे

२ अ. पतीच्या निधनानंतर स्थिर राहून नामजप आणि त्यांच्या मृत्यूत्तर विधींची सेवा भावपूर्ण करणे : ‘बाबा (माझे सासरे कै. पंजाबराव कळमकर) रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती होते. बाबा नामजप करू शकत नव्हते. तेव्हा आई (सासूबाई) बाबांसाठीचा जप भावपूर्ण करायच्या. ‘बाबांचे देहावसान झाले’, हे कळल्यावर आई स्थिर राहून नामजप करत होत्या. त्यांनी या कालावधीत दत्ताचा नामजप केला आणि बाबांच्या मृत्यूत्तर विधींची सेवाही भावपूर्ण केली.

२ आ. स्वीकारण्याची वृत्ती : आम्ही त्यांना ‘रामनाथी आश्रमात राहून साधना करा’, असे समजावून सांगितले. आरंभी हे स्वीकारणे त्यांना कठीण जात होते. ‘मी घरी एकटी राहून साधना करते’, असे त्या म्हणत होत्या. आम्ही त्यांना ‘काही दिवस आश्रमात राहून बघा’, असे सांगितल्यावर त्यांनी ते सहजतेने स्वीकारले.

२ इ. इतरांचा विचार करणे : रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्यांनी केवळ ८ दिवसांतच आश्रमजीवन स्वीकारले. आई पूर्वीपासून पहाटे ४ ते ५ या वेळेत नामजप करायच्या. आश्रमात त्या ज्या खोलीत रहात होत्या, तेथील साधिका सेवा करून रात्री उशिरा खोलीत येत असे. आपण पहाटे उठल्यावर आपल्यामुळे साधिकेची झोपमोड होऊ नये; म्हणून आई पलंगावर पडूनच नामजप करत असत. खोलीतील साधिकांनी त्यांना जे पालट करायला सांगितले, ते त्यांनी सहजतेने स्वीकारले.

२ ई. रामनाथी आश्रमात आल्यानंतर जाणवलेले पालट

१. आई आश्रमात आल्यानंतर त्यांचे विचार पालटले. त्या नातेवाइकांना साधनेचे महत्त्व सांगायच्या.

२. त्या आम्हाला म्हणायच्या, ‘‘माझ्या मनातील मायेचे विचार न्यून झाले आहेत. आता मला इथेच रहायचे आहे.’’

३. आई आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करायच्या. तेथील साधक मला सांगायचे, ‘‘आई पुष्कळ भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करतात.’’

२ उ. ‘त्यांच्या मृत्यूनंतरही ‘त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला वाटत होते. इतर नातेवाईक आणि साधक यांनाही तसेच जाणवले.’

३. सोनाली बधाले (साधिका), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ अ. सेवेची तळमळ आणि आश्रमाप्रतीचा भाव : ‘एकदा कळमकरकाकूंना बरे नव्हते. रामनाथी आश्रमात दुपारचे आणि रात्रीचे जेवण झाल्यावर भोजनकक्ष आवरण्याची सेवा असते. काकूंनी जेवढी शक्य होईल, तेवढी सेवा केली. याविषयी मी त्यांना म्हणाले, ‘‘काकू, तुम्हाला बरे नसेल, तर सेवा करू नका.’’ त्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘देवाने मला आश्रमात रहाण्याची संधी दिली आहे. येथे आपल्याला सर्व मिळते. घरी आपण सर्वच कामे करतो. मग येथे करायला काय अडचण आहे ?’’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १८.५.२०२६)