श्री राजमातंगी महायज्ञ भावपूर्ण अनुभवून कृतकृत्य झाले भाविक !

श्री राजमातंगी महायज्ञाचे सहयजमान म्हणून उपस्थित असणार्‍या मान्यवरांना यज्ञ चालू असतांना आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्या. ‘यज्ञाच्या वेळी  दैवी वातावरण निर्माण झाले होते आणि विविध दैवी तत्त्वांचे अस्तित्व जाणवत होते’, असे अनेकांनी सांगितले आणि तेथील चैतन्यमय वातावरणाचा अनुभव घेत हा यज्ञसोहळा अनुभवला !

श्री राजमातंगी महायागाच्या वेळी पूर्णाहुती देतांना श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि अन्य पुरोहित

श्री राजमातंगी महायज्ञ, म्हणजे मुंबईसह भारतावर निर्माण झालेले आध्यात्मिक संरक्षककवच ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योगसमूह

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

‘श्री राजमातंगी महायज्ञा’चा अनुभव शब्दात मांडणे कठीण आहे. हा यज्ञ म्हणजे मुंबई आणि भारतावर निर्माण झालेले आध्यात्मिक संरक्षककवच. प.पू. गुरुदेव डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देशरक्षणासाठी हा यज्ञ झाला. ८ सहस्रांहून अधिक साधक आणि भाविक शिस्तबद्धपणे उपस्थित होते. विविध आहुत्या, मंत्रघोष आणि संतांची उपस्थिती यांमुळे आरंभापासूनच चैतन्यदायी वातावरण जाणवत होते. सद्गुरु आणि संत यांच्या सान्निध्यात चैतन्याला पारावार नव्हता. – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

श्री राजमातंगीदेवी देशातील मुख्य व्यक्तींना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देणार असून साधनेसाठी सर्वांना साहाय्य करणार असल्याचे जाणवणे ! – कु. प्रियांका रवींद्र प्रभुदेसाई, ठाणे

‘यज्ञस्थळी संतांचे आगमन होऊन ते आसनस्थ झाल्यानंतर माझे ध्यान लागले.

कु. प्रियांका प्रभुदेसाई

‘यज्ञस्थळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले उपस्थित आहेत. श्री गणेशपूजनाच्या वेळी गणेशतत्त्व कार्यरत झाले आहे. प्रार्थना, स्तोत्र आदींमध्ये ज्या ऋषि आणि देवता यांची नावे घेतली जात होती, ते सर्वजण तत्त्वरूपात यज्ञस्थळी प्रकट होत आहेत’, असे जाणवले. त्या वेळी अंगावर रोमांच आले. देवीला कुंकूमार्चन केल्यानंतर मला हलकेपणा जाणवू लागला. त्या वेळी ‘देवी भारताच्या बाहेरील आणि अंतर्गत शत्रूंवर सूक्ष्मातून शस्त्रे सोडत आहे’, असे दिसले. ‘श्री राजमातंगीदेवी देशातील मुख्य व्यक्तींना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देणार आहे, तसेच साधनेसाठी सर्वांना साहाय्यही करणार आहे’, असे जाणवले.’ – कु. प्रियांका रवींद्र प्रभुदेसाई, संचालिका, पितांबरी उद्योग समूह, ठाणे

यज्ञ सोहळ्याचे साक्षीदार झालो, यासाठी आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच ! – सौ. विजया राजेंद्र जाधव, घाटकोपर, मुंबई

‘यज्ञाच्या वेळी वातावरणात वेगळेच चैतन्य, आनंद आणि हलकेपणा जाणवत होता. सद्गुरूंच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो. असा क्षण मी प्रत्यक्ष अनुभवत आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. सोरटी सोमनाथाच्या दिव्यांश शिवलिंगाचे दर्शन झाले. सोहळ्यानंतर ‘कृतज्ञता’ हा शब्दच तोंडातून बाहेर पडला. संपूर्ण सोहळा दिव्य होता. त्याचे साक्षीदार होता आले, यासाठी आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत.’ – सौ. विजया राजेंद्र जाधव, घाटकोपर, मुंबई

सौ. विजया राजेंद्र जाधव

पूर्णाहुतीच्या वेळी श्री भगवतीदेवीचे दर्शन होणे आणि यज्ञकुंडाचा आकार कमळासारखा झाल्याचे दिसणे ! – कु. यशिता सुशील खोडवेकर, ठाणे

कु. यशिता खोडवेकर

‘पूर्णाहुती द्यायला प्रारंभ झाला, त्या वेळी यज्ञकुंडात मला पांढर्‍या धुरामध्ये वीणाधारित श्री भगवतीदेवीचे दोन हात दिसले. त्यानंतर वीणेचा मंद स्वर कानी पडला. यज्ञाला प्रारंभ होताच यज्ञकुंडाचा आकार मला कमळासारखा दिसला. गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे मला सहयजमानपदाची अमूल्य संधी मिळाली. यज्ञस्थळी माझ्यावर पुष्कळ आध्यात्मिक उपाय झाले. शांती आणि आनंद अनुभवता आला. श्री राजमातंगीदेवी आणि गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे अस्तित्व अनुभवता आले, याविषयी मी गुरुदेव आणि सर्व संत यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’ – कु. यशिता सुशील खोडवेकर, ठाणे

यज्ञस्थळी असतांना संसारिक बंधनांपासून मुक्त झाल्याचे जाणवणे आणि वैकुंठामध्ये श्रीविष्णूच्या सान्निध्यात असल्याप्रमाणे वाटणे ! – तेजल गांधी, गिरगाव, मुंबई

तेजल गांधी

‘४ – ५ घंटे यज्ञविधीच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष संत आणि सूक्ष्मातून देवतांचे दिव्य सान्निध्य अनुभवण्याचा क्षण अत्यंत अद्भुत होता. मला अत्यंत हलके वाटत होते. ‘जणू मी हवेत तरंगत असून संसारिक बंधनांपासून पूर्णतः मुक्त झाले आहे’, असे जाणवले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यज्ञस्थळी विराजमान असल्याचे मला सूक्ष्मातून दिसत होते आणि त्यांच्या समवेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याही उपस्थित होत्या. ‘मी जणूकाही वैकुंठात श्रीविष्णूच्या सान्निध्यात आहे’, असे वाटत होते.’ – तेजल गांधी, गिरगाव, मुंबई.

यज्ञ सोहळ्याचे वातावरण ऊर्जामय झाले होते ! – नितीन प्रधान, ज्येष्ठ विधीज्ञ

‘मी श्री राजमातंगी महायज्ञाला उपस्थित होतो. मनाला पुष्कळ आनंद आणि शांती मिळाली. सर्व वातावरण ऊर्जामय झाले होते. ही एक वेगळीच अनुभूती होती.’ – श्री. नितीन प्रधान, ज्येष्ठ विधीज्ञ

अधिवक्ता नितीन प्रधान

यज्ञातून राष्ट्ररक्षणाच्या कार्याला नवचैतन्य प्राप्त झाले ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

श्री. रणजित सावरकर

‘हा यज्ञ केवळ धार्मिक विधी नसून हिंदु समाजाला प्रेरणा देण्यासाठी होता. यज्ञ ही आपली सामाजिक संस्कृती होती. पूर्वी लोक एकत्र येऊन यज्ञ करायचे आणि राष्ट्रकार्य करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध व्हायचे. त्याचप्रमाणे आता हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हा यज्ञ होता. देवाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कृतीचे दायित्व हिंदु समाजावर आहे. हिंदु समाजामध्ये देशरक्षणासाठी या महायज्ञाने नवचैतन्य निर्माण केले.’ – श्री. रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.

मंत्रोच्चार चालू होताच यज्ञस्थळी देवता उपस्थित झाल्याचे दिसणे आणि वातावरण चैतन्याने भारीत होणे ! – रमेश मुंज, मुंबई

श्री. रमेश मुंज

‘प्रारंभी शंखनाद झाला, तेव्हा ‘यज्ञमंडप म्हणजे देवतांची सभा आहे’, असे जाणवले. श्री गणेशाचा मंत्र म्हटल्यावर ‘मारक रूपातील श्री गणेश अवतरत आहे’, असे दिसले. पुरोहितांनी मंत्रोच्चार करण्यास प्रारंभ केल्यावर देवता आकाशातून मंडपात येतांना दिसल्या. त्यामध्ये नारदमुनीही दिसले. संपूर्ण वातावरण चैतन्याने भारीत झाल्यासारखे वाटत होते. वेगळ्याच वातावरणात असल्याची जाणीव होत होती.’ – श्री. रमेश मुंज, मुंबई

मन, आत्मा आणि वातावरण यांचे शुद्धीकरण करणारा दिव्य आध्यात्मिक सोहळा अनुभवला ! – वीरेंद्र गनेडीवाला, उद्योजक

‘श्री राजमातंगी महायज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर तो संपूर्ण वातावरण, मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करणारा दिव्य आध्यात्मिक सोहळा होता. संपूर्ण यज्ञविधीमध्ये प्रत्येक क्षणी चैतन्य, सात्त्विकता आणि ईश्वरी स्पंदने यांचा अनुभव होत होता. अग्नी प्रज्वलित झाल्यापासून पूर्णाहुतीपर्यंत दिलेल्या प्रत्येक आहुतीमध्ये कुठेही नाममात्र धूर जाणवत नव्हता. हे दृश्य यज्ञाचे पावित्र्य आणि शुद्धता यांची प्रचीती देणारे होते. प्रत्येक आहुतीमधून सूक्ष्म स्तरावर वातावरणशुद्धी, नकारात्मक शक्तींचे निवारण आणि चैतन्याची निर्मिती होत असल्याची अनुभूती येत होती.

वेदांमध्ये यज्ञाला ‘देव आणि मानव यांच्यातील दैवी सेतू’ मानले गेले आहे. यज्ञातील प्रत्येक मंत्र, प्रत्येक आहुती आणि प्रत्येक स्पंदन हे पंचमहाभूतांना शुद्ध करून संपूर्ण सृष्टीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य करत असते. या महायज्ञामध्येही तेच अनुभवायला मिळाले. वातावरण इतके सात्त्विक झाले होते की, मन आपोआप निर्विचार, शांत आणि अंतर्मुख झाले होते.

श्री. वीरेंद्र गनेडीवाला

मी आजपर्यंत अनेक यज्ञांमध्ये सहभागी झालो; परंतु या महायज्ञातील अनुभूती पूर्णतः अलौकिक आणि शब्दांच्या पलीकडची होती. येथे केवळ विधी नव्हता, तर प्रत्यक्ष ईश्वरी चैतन्याचे कार्य अनुभवायला मिळत होते. गुरुकृपेने आणि तिन्ही मोक्षगुरूंच्या आशीर्वादाने या दिव्य महायज्ञात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे आमचे परमभाग्य आहे. अशा महायज्ञांमुळे केवळ वैयक्तिक साधनाच नव्हे, तर समाज, राष्ट्र आणि संपूर्ण विश्व यांच्या कल्याणासाठी सूक्ष्म स्तरावर कार्य घडत असते. नकारात्मकता दूर करून धर्म, सात्त्विकता आणि चैतन्य वाढवण्याचे महान कार्य यज्ञातून घडते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सर्व संत यांच्या चरणी मी मन:पूर्वक कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या कृपेमुळेच हा दुर्लभ, दिव्य आणि आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव प्राप्त झाला.

महायज्ञाच्या ठिकाणी अनुभवलेली सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता, आत्मीक समाधान आणि आध्यात्मिक आनंद याचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे. कार्यक्रमातील प्रत्येक गोष्टीचे नियोजन, व्यवस्था आणि शिस्त खरोखरच वाखाणण्याजोगी होती. संपूर्ण आयोजन पाहून सनातन संस्थेच्या साधकांप्रती मनापासून आदर निर्माण झाला.’ – श्री. वीरेंद्र गनेडीवाला, उद्योजक

यज्ञस्थळी तिन्ही मोक्षगुरूंचे अस्तित्व जाणवणे आणि जीवनातील अत्युच्च आनंदाचे क्षण अनुभवता येणे ! – अशोक दाभोलकर, मुंबई

श्री. अशोक दाभोलकर

‘या यज्ञाच्या माध्यमातून एक क्षणभर का होईना, मला सूक्ष्म ज्ञान अनुभवता येईल का ?’, अशी गुरुदेवांना प्रार्थना झाली. यज्ञातील मंत्रोच्चारांच्या वेळी हात जोडून प्रार्थना करत असतांना मला पुढील दृश्य दिसले. ‘यज्ञाच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले निळ्या रंगाचा फेटा, फिकट पिवळ्या रंगाचा सदरा आणि गुलाबी रंगाचे सोवळे परिधान करून बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि डाव्या बाजूला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ नमस्काराच्या मुद्रेत बसल्या होत्या. तिघांच्याही मुखकमलातून मंद प्रकाश प्रक्षेपित होत होता. त्यांच्यामागे श्री राजमातंगीदेवी, तसेच अनेक देवता उभ्या होत्या. ‘गुरुदेव शांत आणि गोड हास्यमुद्रेने सर्व साधकांना हात उंचावून आशीर्वाद देत आहेत’, असे दिसले. हे सर्व अनुभवतांना भावाश्रू येत होते. जीवनातील अत्युच्च आनंदाचे क्षण या वेळी मला अनुभवता आले. पूर्णाहुतीच्या वेळी ‘यज्ञकुंडातून सोनेरी पिवळ्या रंगाचा धूर वर जात आहे’, असे जाणवत होते.’ – श्री. अशोक दाभोलकर, अंधेरी, मुंबई

यज्ञस्थळी मोठ्या प्रमाणात चैतन्य कार्यरत असल्यामुळे तेथून निघावेसे न वाटणे ! – सौ. उज्ज्वला पंडित पाटील, रायगड

सौ. उज्‍ज्‍वला पाटील

‘यज्ञामध्ये माझे मन पूर्णवेळ निर्विचार होते. प्रार्थना होत होती आणि कृतज्ञता वाटत होती. यज्ञ चालू झाल्यानंतर शरीर आणि मन हलके होत गेले. रामसेतू बांधण्याच्या कार्यात खारूताईने तिच्या परीने श्रीरामाला साहाय्य केले, त्याप्रमाणे कलियुगामध्ये रामराज्याच्या स्थापनेसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आयोजित केलेल्या श्री राजमातंगीदेवीच्या यज्ञात आम्हाला सहभागी होता आले, याविषयी कृतज्ञता ! यज्ञस्थळी मोठ्या प्रमाणात चैतन्य कार्यरत असल्यामुळे तेथून निघावेसे वाटत नव्हते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून भावजागृती झाली. ‘शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या कुटुंबाला तन, मन आणि धन यांनी भगवंताची सेवा करता यावी’, ही भगवंताच्याच चरणी प्रार्थना !’ – सौ. उज्ज्वला पंडित पाटील, रायगड

मान्यवरांचे अभिप्राय

आध्यात्मिक कार्यक्रमांतूनच नीतीमत्तेचा स्तर उंचावेल ! – वाय.सी. पवार, निवृत्त पोलीस महानिरीक्षक

वाय.सी. पवार

सध्या नीतीमत्ता ढासळत चालली आहे. यातून पालट होण्यासाठी असे कार्यक्रम पुष्कळ उपयोगी आहेत, असे मी समजतो. यज्ञातील मंत्र आणि एकाग्रतेची शक्ती यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. मंत्रोच्चारातून एकाग्रता साधण्यास साहाय्य होते. समाजात वाढत असलेल्या चारित्र्यहननाच्या घटना थांबण्यासाठी असे आध्यात्मिक सोहळे अनेक ठिकाणी आणि वारंवार झाले पाहिजेत. – वाय.सी. पवार, निवृत्त पोलीस महानिरीक्षक

महायज्ञामुळे मनाला अतिशय शांती मिळाली ! – अधिवक्त्या शुभदा खोत

अधिवक्त्या शुभदा खोत

श्री राजमातंगी महायज्ञाचा अनुभव अवर्णनीय होता. यज्ञाच्या वेळी अतिशय शांत आणि आनंददायी वाटत होते. यज्ञाच्या आहुतीनंतर वातावरणामध्ये पसरलेला सुगंध सर्वांगामध्ये पसरला. या वेळी मनाला अतिशय शांती मिळाली. – शुभदा खोत, ज्येष्ठ अधिवक्त्या

येथे अनुभवायला मिळालेल्या खर्‍या संतांची ओळखही माध्यमांनी समाजाला करून द्यायला हवी ! – रेनी अब्राहम, ज्येष्ठ पत्रकार, बिझनेस इंडिया

श्री. रेनी अब्राहम

यज्ञाला आल्यावर मनाला एकदम शांत वाटले. खूप छान वाटले. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर माध्यमांतून सातत्याने फसवणूक करणार्‍या भोंदूबाबांच्या बातम्या दाखवल्या जातात. त्यामुळे सर्व संत असे असतात, असा लोकांचा अपसमज होतो. चांगले संतही आहेत. त्यांची ओळखही माध्यमांनी समाजाला करून द्यायला हवी. मला यज्ञाच्या ठिकाणी संतांचे अस्तित्व अनुभवायला मिळाले.

भावपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात सोहळ्याचा आनंद घेतला ! – मधुकर गावील, निवृत्त अधिकारी, पोलीसदल

आजचा श्री राजमातंगी महायज्ञाचा सोहळा अतिशय सुरेख, अतिशय आरोग्यमय, भक्तीपूर्ण वातावरणामध्ये आणि वेळेनुसार अप्रतिम पार पडला. यासाठी सनातन संस्थेच्या साधकांनी पुष्कळ परिश्रम केले आहेत. त्यांची संपर्क यंत्रणा पुष्कळ छान होती. संपूर्ण प्रेक्षक आणि भाविक यांनी स्वत:ची जागा न सोडता, चलबिचल न करता संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आले, यासाठी आम्ही अतिशय भाग्यशाली आहोत. – मधुकर गावील, निवृत्त अधिकारी, पोलीसदल

हिंदूंनी एकत्र येऊन संकल्प करणे महत्त्वाचे ! – सौ. मंजिरी मराठे

सौ. मंजिरी मराठे

यज्ञासाठी आल्यावर एक वेगळे समाधान इथे अनुभवायला मिळाले. भारताच्या संरक्षणासाठी आणि विश्वाच्या कल्याणासाठी हिंदु एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येणे अन् त्यांनी संकल्प करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे.

– सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.