Taiwan Anti-India Poster : तैवानमध्ये भारतीय कामगारांना हाकलून लावण्याची होत आहे मागणी

भारतीय कामगार गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचा विरोधी पक्षाचा आरोप

भारतविरोधी भित्तीपत्रक

तैपेई (तैवान) – तैवानमधील स्थानिक निवडणुकांमध्ये तेथील भारतीय कामगारांना हाकलून देण्याचे सूत्र उपस्थित करून त्यांना विरोध केला जात आहे. एका अपक्ष उमेदवाराने भारतविरोधी भित्तीपत्रकही लावले आहे. यात पगडी घातलेल्या एका शीख व्यक्तीच्या चित्रावर मोठे ‘नो’ म्हणजे बंदीचे चिन्ह बनवले होते. अशा प्रकारच्या भित्तीपत्रकाद्वारे भारतातून येणार्‍या स्थलांतरित मजुरांना विरोध केला जावा आणि त्यांना देशाबाहेर हाकलून दिले जावे, अशी मागणी होत आहे. तैवान भारतासमवेत झालेल्या कामगार सहकार्य करारांतर्गत भारतीय कामगारांना बोलावण्याची सिद्धता करत आहे. अशा वेळी हा वाद उफाळून आल्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या करारानुसार अनुमाने १ सहस्र भारतीय मजूर या वर्षाच्या शेवटी तैवानमध्ये पोचतील. यानंतर जर व्यवस्था योग्य प्रकारे चालली आणि उद्योगांची मागणी वाढली, तर ही संख्या पुढे वाढवली जाऊ शकते.

१. तैवान अनेक वर्षांपासून कामगार संकटाचा सामना करत आहे. तेथे जन्मदर सातत्याने घटत आहे, लोकसंख्या वृद्ध होत आहे आणि तरुणांची संख्या अल्प होत चालली आहे. याचा परिणाम विशेषतः कारखाना, शेती, बांधकाम आणि वृद्धांची काळजी यांसारख्या क्षेत्रांवर होत आहे. याच कारणामुळे तैवान दीर्घकाळापासून इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि थायलंड यांसारख्या इतर आशियाई देशांमधून मजूर बोलावतो आहे. आता त्याने भारतालाही या सूचीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

२. तैवानमधील विरोधी पक्ष कुओमिनतांग भारतीय मजुरांना बोलावण्यास विरोध करत आहे. खासदार हुआंग चिएन-पिन यांनी भारताच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीचा हवाला दिला आहे. त्यांनी संसदेत सांगितले होते की, भारतात वर्ष २०२२ मध्ये महिलांविरोधात ४ लाख ४५ सहस्रांहून अधिक गुन्हे नोंदवले गेले होते, ज्यात ३१ सहस्रांहून अधिक बलात्काराच्या घटनांचा समावेश होता. अशा परिस्थितीत भारतीय मजुरांवर अधिक कठोर तपास आणि पाळत ठेवली पाहिजे. भारतीय मजूर येथे महिलांवर बलात्कार करू शकतात.

३. तैवानच्या स्थानिक राजकीय पक्ष न्यू पॉवर पार्टीचे नेते वांग यी-हेंग यांनी या भित्तीपत्रकारवर टीका केली. ते म्हणाले की, भारतीय ध्वज आणि पगडी यावर बंदीचे चिन्ह लावणे हे अज्ञान दर्शवते. पगडी केवळ कापड नाही, तर श्रद्धा आणि सन्मान यांचे प्रतीक आहे.

हा वर्णद्वेष आहे ! – भारतीय

तैवानमध्ये रहाणार्‍या एका भारतियाने सामाजिक माध्यमावर याला ‘वर्णद्वेषी भेदभाव’ म्हटले. ते म्हणाले की, एखाद्या धोरणाला विरोध करणे वेगळी गोष्ट आहे; परंतु एखाद्या समुदायाच्या ओळखीला आणि सांस्कृतिक प्रतीकांना लक्ष्य करणे चुकीचे आहे.