गंगा नदीचे आध्यात्मिक माहात्म्य !

१७ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत ‘गंगा दशहरा’ आहे. त्या निमित्ताने…

‘गंगा नदी ही विश्वातील समस्त पावित्र्याचे प्रतीक आहे. सत्ययुगात वैशाख शुक्ल सप्तमीला गंगादेवीची उत्पत्ती झाली. त्यानंतर गंगापूजनाची प्रथा चालू झाली. यावर्षी १७.५.२०२६ या दिवशी ‘गंगा दशहरा’ चालू होऊन तो २५.५.२०२६ या दिवशी समाप्त होणार आहे.

६.५.२०२६ या दिवशी सकाळी मी नामजप करत असतांना अकस्मात् माझे श्री सरस्वतीदेवीशी अनुसंधान चालू झाले. तिने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि मला आशीर्वाद दिला. तिने आशीर्वादाच्या स्वरूपात सूक्ष्म विचारांद्वारे गंगा नदीविषयीचे ज्ञान माझ्याकडे प्रवाहित केले. तेव्हा मला गंगा नदीविषयी उमगलेली ज्ञानसूत्रे मी येथे लेखबद्ध केली आहेत.

(भाग १)

गंगादेवी

१. गंगा नदीची निर्मिती 

गंगा नदीची उत्पत्ती श्रीविष्णूच्या चरणांपासून झाली. त्यानंतर ब्रह्मदेवाने गंगा नदीचे पावित्र्य जाणून तिला सुरक्षित करण्यासाठी त्याच्या कमंडलूमध्ये स्थान दिले. नंतर जेव्हा पृथ्वीवर भगीरथाने गंगेचे आवाहन केले, तेव्हा गंगा ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून श्रीहरीचा निरोप घेण्यासाठी वैकुंठात गेली. तेथे श्रीविष्णूने गंगा नदीला तिच्या पृथ्वीवरील अलौकिक कार्याची व्याप्ती आणि स्वरूप समजावून सांगितले. त्यानंतर गंगा नदी वैकुंठातून प्रयाण करून कैलासावर प्रगट झाली. तेथे शिवाने विराट रूप धारण करून गंगा नदीला त्याच्या जटांमध्ये बांधून ठेवले. त्यामुळे शिवाला ‘गंगाधर’ आणि ‘गंगेश’, या नावांनी ओळखले जाऊ लागले. नंतर भगीरथाच्या प्रार्थनेवरून शिवाने गंगा नदीच्या एका धारेला जटेतून मुक्त केले. त्यामुळे गंगा नदी ‘गंगोत्री’ या स्थानातील गोमुखातून प्रगट झाली आणि पृथ्वीवर वाहू लागली.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. गंगा नदीचा परिवार 

२ अ. माता-पिता : मैनावती आणि हिमालयराज

२ आ. भाऊ : हिमालयपुत्र मैनार्क पर्वत

२ इ. बहिणी : यमुना नदी आणि माता पार्वती या गंगेच्या बहिणी आहेत, तसेच अलकनंदा, रामगंगा, कोसी, महानंदा इत्यादी गंगा नदीच्या उपनद्या, या तिच्या लहान बहिणीसमान आहेत.

२ ई. पती : द्वापरयुगातील हस्तिनापुर नरेश शंतनु राजा

२ उ. पुत्र : अष्टवसूंपैकी ‘प्रभास’ नावाचा आठवा वसु हा गंगापुत्र होता. तो ‘राजकुमार देवव्रत’ बनून हस्तिनापूर येथील राजमहालात वाढू लागला आणि पुढे तो ‘भीष्माचार्य’ झाला.

३. गंगा नदीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये ! 

३ अ. गंगा नदीमध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांची तत्त्वे कार्यरत असणे


३ आ. पितरांना तारणारी : भगीरथाने त्याच्या पितरांचा उद्धार करण्यासाठी ज्या ठिकाणी त्याचे पितर पाषाण बनले होते, त्या ठिकाणी गंगा नदीला नेले. गंगा नदीचे जल इतके निर्मळ आणि पवित्र होते की, तिच्या जलाच्या स्पर्शमात्रे भगीरथाचे पितर मुक्त झाले. अशा प्रकारे गंगा नदी पितरांना तारणारी देवी झाली. त्यामुळे गंगा नदीच्या किनारी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्धादी धार्मिक कर्मे केली जातात.

३ इ. मुक्तीदायिनी : गंगा नदीमध्ये समस्त पापे नष्ट करण्याचे आध्यात्मिक सामर्थ्य आहे. त्यामुळे काशीक्षेत्री प्राणत्याग करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. गंगा नदीच्या किनारी अनेक स्मशाने असून तेथे प्रेतांचे दहन केले जाते, तसेच गंगेच्या जलात अस्थिविसर्जनही केले जाते. त्यामुळे गंगा नदी मुक्तीदायिनी आहे.

३ ई. गंगा त्रिपथगामिनी : जेव्हा गंगा नदी वैकुंठातून पृथ्वीकडे येऊ लागली, तेव्हा स्वर्गलोकातील देवता आणि मनुष्याचे पुण्यवान पितर यांना तिचे दर्शन घ्यायचे होते. तेव्हा ती काही क्षण स्वर्गात थांबली. त्या वेळी तिची गती मंद झाल्याने तिला स्वर्गात ‘मंदाकिनी’, या नावाने संबोधले गेले. त्यानंतर भगीरथाच्या प्रार्थनेवरून ती पृथ्वीवर अवतरित झाली आणि तिने पृथ्वीवरील भगीरथाच्या पितरांना मुक्ती दिली. त्यामुळे तिला ‘भागीरथी’, या नावाने गौरवले गेले. पाताळातही काही पुण्यात्मे पतित जिवांच्या रूपात दुःख आणि त्रास भोगत होते. त्यांचा उद्धार करण्याची आज्ञा शिवाने गंगेला केली. तेव्हा शिवाने स्वतः पाताळेश्वर रूप धारण करून पृथ्वीपासून पाताळापर्यंतचा मार्ग बनवला. या मार्गाने गंगानदीची एक धारा पाताळातही प्रवाहित झाली आणि तिने पतित जिवांचा उद्धार केला. तेव्हा तिने पतित जिवांचे भोग स्वतः भोगून त्यांना मुक्ती दिली. त्यामुळे ती ‘भोगावती’, या नावाने विख्यात झाली. अशा प्रकारे पवित्र गंगा नदी स्वर्गात ‘मंदाकिनी’, पृथ्वीवर ‘भागीरथी’ आणि पाताळात ‘भोगावती’, या नावांनी ओळखली जाऊ लागली. त्यामुळे तिला तिन्ही लोकांत विचरण करणारी ‘गंगा त्रिपथगामिनी’ म्हणून गौरवांकित करण्यात आले.

३ ई १. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ येथील गंगेची वैशिष्ट्ये 


३ उ. सप्तनद्यांमधील प्रमुख नदी : भारतामध्ये ‘गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, सिंधु आणि कावेरी’, या प्रमुख सात नद्या आहेत. यांना ‘सप्तनद्या’, असे म्हणतात.

३ उ १. सप्तनद्यांमध्ये कार्यरत असणारे देवतेचे तत्त्व आणि चैतन्याचे प्रमाण !


टीप – नर्मदा नदीमध्ये गंगा नदीपेक्षाही अधिक चैतन्य कार्यरत असल्यामुळे प्रतिवर्षी गंगानदी पवित्र होण्यासाठी एका काळ्या गायीचे रूप धारण करून नर्मदा नदीमध्ये स्नान करते.’

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ७.५.२०२६, वेळ : सकाळी १०.२० ते ११, कालावधी : ४० मिनिटे)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1041812.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.