सध्या संपूर्ण विश्वावर युद्धाचे संकट आहे. अशा वेळी तपोभूमी भारताचे रक्षण होण्यासाठी ‘राजमातंगी’देवीचे कवच आवश्यक आहे !

राजमातंगीदेवीविषयी
देवी मातंगी आदिशक्तीची पंतप्रधान असल्याने तिला ‘राजमातंगी’ असे म्हटले आहे. सध्या संपूर्ण विश्वावर युद्धाचे संकट आहे. अशा वेळी तपोभूमी भारताचे रक्षण होण्यासाठी ‘राजमातंगी’देवीचे कवच आवश्यक आहे. दशमहाविद्यांपैकी ९ वी देवी असलेली ‘राजमातंगी’देवी वाणी शुद्ध करणारी आणि ज्ञानप्रदान करणारी देवता आहे. भगवान श्रीविष्णूच्या दशावतारांच्या वेळीही दशमहाविद्या कार्यरत असतात. श्रीराम अवतारात राजमातंगीचे तत्त्व कार्यरत होते, म्हणून आता रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला राजमातंगीदेवीच्या उपासनेची आवश्यकता आहे. मातंगी ही दशमहाविद्यांपैकी नववी विद्या (महाविद्या) आहे. असे मानले जाते की, मातंगी ही ‘मातंग शिवाची’ पत्नी आहे. ते ‘मातंग भैरव’ म्हणून प्रसिद्ध आहेत. खर्या अर्थाने ती ‘मातंग शिवा’ची शक्ती आहे. ती ‘वरदायिनी’ आहे, जी भक्तांना तात्काळ संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते. राजमातंगीदेवी साक्षात् आदिपराशक्तीचा अवतार आहे.
जेव्हा नारदांनी ब्रह्मदेवाला मातंगीच्या उत्पत्तीविषयी विचारले, तेव्हा ब्रह्मदेवाने उत्तर दिले, ‘मातंगऋषींनी १० सहस्र वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन आदिपराशक्ती ‘मातंगी’च्या रूपात मातंगऋषींसमोर प्रकट झाली. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान रुद्रांनीही याच मातंगीदेवीची उपासना करून तिला त्या कार्यासाठी प्रार्थना केली होती.’
– श्री. चेतन राजहंस (७.५.२०२६)
दशमहाविद्यांच्या उत्पत्तीची कथा
‘देवी भागवत पुराण’ आणि ‘महाभागवत पुराण’ यांनुसार दशमहाविद्यांच्या उत्पत्तीची एक कथा आहे.

एकदा दक्ष प्रजापतीने एका विशाल यज्ञाचे आयोजन केले होते; परंतु त्याने त्याची मुलगी सती आणि जावई शिव यांना आमंत्रित केले नव्हते. जेव्हा सतीला हे समजले, तेव्हा तिने तिच्या पित्याच्या घरी जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने भगवान शिवाकडे जाण्याची अनुमती मागितली; परंतु शिवाने निमंत्रणाविना जाणे योग्य नसल्याचे सांगून नकार दिला. सतीने वारंवार विनंती केली; पण शिव त्यांच्या निर्णयावर ठाम होते. सतीला वाटले की, शिव तिला केवळ पत्नी म्हणून पहात आहेत आणि तिचे मूळ ‘शक्ती’स्वरूप विसरले आहेत. शिवाला शक्तीची प्रचीती देण्यासाठी सतीने स्वतःला १० वेगवेगळ्या रूपांत विभाजित केले. शिव ज्या ज्या दिशेला जात होते, त्या प्रत्येक दिशेला एक देवी उभी होती. जेव्हा शिवाने दाही दिशांनी स्वतःला या १० शक्तींनी वेढलेले पाहिले, तेव्हा त्यांना जाणीव झाली की, सती ही केवळ त्याची पत्नी नाही, तर विश्वाची मूळ आदिशक्ती आहे. शिवाने सतीची क्षमा मागितली आणि तिला यज्ञासाठी जाण्याची अनुमती दिली.
या कथेचा आध्यात्मिक अर्थ हा आहे की, सृष्टीतील प्रत्येक अवस्था, मग ते सौंदर्य असो कि दुःख असो, दैन्य असो कि संपन्नता, ही त्या एकाच आदिशक्तीची रूपे आहेत. शिवाला दिशा दाखवण्याचे आणि त्यांचे रक्षण करण्याचे कार्य या महाविद्या करतात.
– श्री. चेतन राजहंस (७.५.२०२६)
आदिशक्तीची १० विशेष रूपे : दशमहाविद्या !
हिंदु धर्मात दशमहाविद्यांचे महत्त्व आहे. दश म्हणजे १० आणि महाविद्या म्हणजे महान ज्ञान किंवा विद्या. दशमहाविद्या, म्हणजे आदिशक्तीचीच १० विशेष रूपे आहेत. काली, तारा, षोडशी (त्रिपुरसुंदरी), भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दशमहाविद्या आहेत.

१. कालीमाता
हे दशमहाविद्यांमध्ये पहिले रूप आहे. कालीमाता काळावर विजय मिळवणारी आणि संहाराची देवता मानली जाते. ती अज्ञान आणि अहंकार यांचा नाश करते.
२. तारामाता
तारामाता ही संकटातून तारून नेणारी देवी आहे. पौराणिक कथांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा शिवाने विषप्राशन केले, तेव्हा त्याच्या शरिरातील दाह शांत करण्यासाठी तारामातेने त्यांना माता म्हणून दूध पाजले होते.
३. षोडशी
षोडशी म्हणजे १६ वर्षांची युवा देवी ! षोडशी किंवा त्रिपुरसुंदरी ही देवी सौंदर्याचे प्रतीक असून ती तिन्ही लोकांमध्ये सर्वांत सुंदर मानली जाते. ती ऐश्वर्य आणि मोक्ष प्रदान करणारी आहे.
४. भुवनेश्वरी
आदिशक्तीचे चौथे रूप, म्हणजे माता भुवनेश्वरी ! भुवनेश्वरी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाची स्वामिनी. पंचमहाभुतांवर तिचे नियंत्रण असून ती सृष्टीचे पालनपोषण करणारी शक्ती मानली जाते.
५. भैरवी
हे देवीचे उग्र रूप आहे. ती विनाश आणि परिवर्तनाची देवता आहे. वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी हे रूप प्रकट झाले आहे.

६. छिन्नमस्ता
या रूपात देवीने स्वतःचे मस्तक कापून हातात धरले आहे. हे रूप आत्मत्याग आणि कुंडलिनी शक्तीच्या जागृतीचे प्रतीक मानले जाते.
७. धुमावती
धुमावती हे देवीचे विधवा रूप मानले जाते. ती दारिद्र्य, दुःख आणि संकट यांचे प्रतीक असली, तरी ती भक्तांना जीवनातील असत्य गोष्टींपासून दूर करून वैराग्याकडे नेते.
८. बगलामुखीदेवी
हे आदिशक्तीचे आठवे रूप आहे ! बगलामुखीदेवीला ‘स्तंभन’ शक्तीची देवता म्हणतात. ती शत्रूंच्या बुद्धीचे आणि वाणीचे स्तंभन करते, म्हणजे त्यांना शांत करते.
९. माता मातंगी
ही कलेची आणि वाणीची देवता आहे. तिला ‘तांत्रिक रूपातील सरस्वती’ असेही म्हटले जाते. बुद्धी, चातुर्य आणि कला क्षेत्रांत प्रगतीसाठी तिची आराधना केली जाते.
१०. माता कमला
आदिशक्तीचे दहावे रूप म्हणजे माता कमला ! हे लक्ष्मीचे तांत्रिक रूप आहे. कमलामाता समृद्धी, संपत्ती आणि मांगल्य यांची देवता आहे. श्रीविष्णूच्या शक्तीच्या रूपात ती जगाचे कल्याण करते.
अयोध्येत श्रीराममंदिराची उभारणी ही रामराज्याच्या अवतरणाची वेळ आल्याचे निदर्शक आहे. जेव्हा त्रेतायुगात रामराज्य अवतरले, तेव्हा श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व कार्यरत होते आणि आता जेव्हा कलियुगातील रामराज्याच्या निर्मितीची वेळ आली आहे, तेव्हा देशाच्या आर्थिक राजधानीत श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होत आहे. हा ईश्वरी संकेत आहे की, रामराज्याची पहाट आता दूर नाही. – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (५.५.२०२६)
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !