राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथे २० सहस्र रुपयांची लाच घेतांना कोतवाल संजना माने आणि मंडळ अधिकारी पूनम गावीत यांना पकडले !

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

राजापूर – सात-बारावर पत्नीचे नाव नोंदवण्यासाठी २५ सहस्र रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २० सहस्र रुपये स्वीकारतांना तालुक्यातील कोतवाल (महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचारी) संजना माने आणि मंडळ अधिकारी पूनम गावीत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

१. मौजे जवळेथर येथे तक्रारदारांची वडिलोपार्जित भूमी आहे. सात-बारा उतार्‍यावर पत्नीचे नाव नसल्याने त्यांनी फेरफारसाठी अर्ज केला होता. १३ मे या दिवशी मिळंद येथील तलाठी कार्यालयात कोतवाल संजना नंदकुमार माने यांनी फेरफार संमतीसाठी मंडळ अधिकारी पूनम जससिंग गावीत यांनी २५ सहस्र रुपये मागितल्याचे सांगून माने यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली.

२. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केल्यानंतर १४ मे या दिवशी करण्यात आलेल्या पडताळणीत कोतवाल माने यांनी मंडळ अधिकारी गावीत यांच्यासाठी २० सहस्र रुपये लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

३. मिळंद तलाठी कार्यालयात पंचासमक्ष कोतवाल संजना माने यांनी २० सहस्र रुपये स्वीकारले. त्यानंतर मंडळ अधिकारी पूनम गावीत यांना फोनवरून याविषयी कळवताच त्यांनी संमती दर्शवली. त्यामुळे दोघींनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका

  • प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्पर्धा करणार्‍या महिला, भ्रष्टाचारातही मागे नाहीत, हेच या उदाहरणातून दिसून येते !
  • अशा लाचखोरांना बडतर्फ करून त्यांची संपत्ती जप्त केली, तरच भ्रष्टाचाराला थोडा तरी आळा बसेल आणि प्रशासनाचा कारभारही सुधारेल !