Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक

पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नाही !

आगर माळवा (मध्यप्रदेश) – येथील माँ बगलामुखी मंदिराच्या दानातील गैरव्यवहाराच्या प्रकरणी चर्चा चालू सतांनाच आता मंदिराचे नाव आणि छायाचित्रे यांचा वापर करून फेसबुक, यू ट्यूब, इंस्टाग्राम यांसह अनेक सामाजिक माध्यमांत खोट्या ओळखीद्वारे खाती चालवली जात आहेत. याद्वारे मिरची हवन, वशीकरण, सरकारी नोकरीत यश आणि विशेष तांत्रिक विधी करण्याचे दावे करून भाविकांकडून मोठी रक्कम उकळली जात आहे.

दुसरीकडे मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, मंदिर परिसरात मिरची हवन करण्यास पूर्णपणे बंदी असून अशा प्रकारच्या कोणत्याही ऑनलाईन सेवांशी मंदिराचा कोणताही संबंध नाही.

पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नाही !

मंदिर व्यवस्थापन समितीने जून मासात आगर माळवाचे पोलीस अधीक्षक आणि नलखेडा ठाणे प्रमुखांना पत्र पाठवून सामाजिक माध्यमांवरील बनावट खाती बंद करण्याची आणि भाविकांची होणारी ऑनलाईन फसवणूक रोखण्याची मागणी केली होती; मात्र अद्यापपर्यंत कोणतीही मोठी कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

महिलांच्या दागिन्यांची चोरी

या मंदिरात प्रतिवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी आणि पूजा-अर्चा करण्यासाठी येतात. विशेषतः चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये प्रतिदिन सहस्रो भक्तांची गर्दी होते. याच गर्दीचा अपलाभ घेऊन समाजकंटक महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि मंगळसूत्र यांच्या चोरी करत असल्याच्या घटना घडत आहेत.

संपादकीय भूमिका

हे पोलीस आणि सरकार यांना लज्जास्पद ! हिंदूंच्या मंदिरांच्या संदर्भात अशा घटना रोखण्याविषयीची इतकी असंवेदनशील असणार्‍यांना कारागृहातच डांबले पाहिजे !