देवस्थान भूमी लाटण्याचा घाट घालणारा ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ रहित करा !

  • महाराष्ट्र मंदिर महासंघाची अहिल्यानगर येथे मागणी

  • प.पू. स्वामी गोविंददेव गिरि आणि आमदार संग्राम जगताप यांना निवेदन

निवेदन देतांना डावीकडून (पिवळा सदरा घातलेले) बापू ठाणगे, मध्यभागी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, सर्वश्री रामेश्वर भूकन, अमोल हुंबे, ओम पांडे

अहिल्यानगर – राज्यशासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेल्या ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’मुळे देवस्थानांच्या भूमींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा कायदा म्हणजे हिंदु देवस्थानांचे अस्तित्व संपवण्याचा आणि भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र मंदिर महासंघाने व्यक्त केली आहे. हा अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी मंदिर महासंघाच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरि आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले.

(डावीकडून) सर्वश्री बापू ठाणगे, रामेश्वर भूकन, मुकुल गंधे, आमदार संग्राम जगताप, गणेश पलंगे

प्रस्तावित कायद्यामुळे देवस्थान इनाम भूमींवरील देवस्थानांची मालकी संपुष्टात येऊन त्या भूमी वहिवाटदारांच्या नावे होतील, ज्यामुळे मंदिरांचा आधारच नष्ट होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

उपस्थित मान्यवर

या प्रसंगी मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक श्री. भरत शिंदे, सहसंयोजक श्री. गणेश पलंगे, मंदिर विश्वस्त श्री. ओम पांडे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा संघटक सर्वश्री बापू ठाणगे, रामेश्वर भूकन, मुकुल गंधे, हिंदुत्वनिष्ठ अमोल हुंबे, संजय जोशी, चैतन्य शेकडे आदी उपस्थित होते.