Trump China Visit : अमेरिका आणि चीन भागीदार व्हावेत, प्रतिस्पर्धी नसावेत ! – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प चीनच्या दौर्‍यावर गेले आहेत. त्यांनी १४ मे या दिवशी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये २ घंटे बैठक झाली. यात इराण युद्ध, युक्रेन संकट आणि इतर जागतिक सूत्रे, यांवर  चर्चा झाली. बैठकीच्या प्रारंभी शी जिनपिंग म्हणाले की, संपूर्ण जग या बैठकीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. जग झपाट्याने पालटत आहे आणि जागतिक स्थिरतेसाठी अमेरिका-चीन संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोन्ही देशांनी प्रतिस्पर्धी नव्हे, तर भागीदार बनले पाहिजे.

या वेळी ट्रम्प म्हणाले की, तुमचा मित्र असणे, हा आमचा सन्मान आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षाही अधिक चांगले होणार आहेत. जगातील काही अत्यंत प्रमुख व्यावसायिक नेत्यांना येथे आणले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

अमेरिका-चीन संबंधांमध्ये तैवान सर्वांत महत्त्वाचे सूत्र ! – शी जिनपिंग

बैठकीत शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना सांगितले की, अमेरिका-चीन संबंधांमध्ये तैवान सर्वांत महत्त्वाचे सूत्र आहे. जर हे सूत्र चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले, तर परिस्थिती धोकादायक बनू शकते. तैवानचे स्वातंत्र्य आणि तैवान सामुद्रधुनीतील शांतता, या विसंगत गोष्टी आहेत.

प्रादेशिक अस्थिरतेचे एकमेव कारण चीन ! – तैवानचे प्रत्युत्तर

शी जिनपिंग यांच्या वक्तव्यानंतर तैवानने प्रत्युत्तर दिले आहे. तैवान सरकारने म्हटले आहे की, चीनच्या सैनिकी हालचाली तैवान सामुद्रधुनी आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील अस्थिरतेचे मुख्य कारण आहे. तैवानच्या मंत्रीमंडळाच्या प्रवक्त्या मिशेल ली म्हणाल्या की, चीनची सैनिकी धमकी हेच प्रादेशिक तणावाचे एकमेव कारण आहे. सुरक्षा टिकवण्यासाठी संरक्षण क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे.

संपादकीय भूमिका

दोन विश्वासघातकी लोक एकत्र आल्यानंतर एकमेकांवर विश्वास ठेवतील, अशी कुणीतरी अपेक्षा व्यक्त करू शकेल का ? दोघांनी कितीही काही म्हटले, तरी यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही !