चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सनातन संस्था’ आयोजित ५ दिवसांचा सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग !      

समारोप कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना देवस्थानचे सचिव श्री. नरेंद्र उपाख्य काका चव्हाण

चिपळूण, १३ मे (वार्ता.) – ‘सनातन संस्था’ आणि ‘मंदिर महासंघ’ यांच्या वतीने शहरातील पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात ५ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले होते. ९ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी ६ ते १० मे २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात आलेल्या या संस्कार वर्गात ४० मुलांनी सहभाग घेतला. हा वर्ग पूर्णपणे नि:शुल्क होता. या संस्कार वर्गाला मुले आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वर्गात सनातन संस्थेच्या सौ. भक्ती चव्हाण, श्री. जगन्नाथ मोरे, सौ. मेघना तांबे, सौ. उज्ज्वला कांगणे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाच्या वेळी सूत्रसंचालन मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक श्री. सुरेश शिंदे यांनी केले.

प्रस्तावना करतांना श्री. जगन्नाथ मोरे म्हणाले की, सध्या आपल्याकडून मुलांना शिक्षण, विविध सुविधा देऊन ‘स्मार्ट’ बनवले जाते; मात्र जीवन मूल्यांविषयी,  संस्कारांविषयी योग्य दिशादर्शन दिले जात नाही. भ्रमणभाषच्या माध्यमातून अर्थहीन अनावश्यक माहिती दिली जाते. समाजात नैतिकता घसरत चालल्याच्या अनेक घटना पहातो. त्यामुळे आज पालकांमध्ये मुलांच्या भविष्याविषयी चिंता असते. नेमके याच प्रश्नाचे प्रभावी उत्तर म्हणजे ‘संस्कार वर्ग’. सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचा हा सनातन संस्थेचा प्रयत्न आहे.

विद्यार्थ्यांना पारितोषिक देतांना देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य भाऊ खेडेकर

 विशेष

१. या वर्गाला श्री सुकाईदेवी देवस्थानचे विशेष सहकार्य लाभले.

२. मुलांच्या खाऊची व्यवस्था श्री सुकाईदेवी देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य भाऊ खेडेकर, सचिव श्री. नरेंद्र उपाख्य काका चव्हाण आणि धर्मप्रेमी श्री. महेश बोंडकर यांनी केली.

३. समारोपाच्या वेळी ११ पालक उपस्थित होते. ८ मुलांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.

४. मुले मार्गदर्शन करणार्‍या साधक आणि साधिका यांच्या पाया पडून बाहेर पडत होते.

५. सर्वांनी सनातनच्या या उपक्रमाविषयी आनंद व्यक्त करत आभार मानले. कृतज्ञता व्यक्त केली. आठवड्यातून १ दिवस- १ तास संस्कार वर्ग घेण्याची मागणी केली.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष श्री. भाऊ खेडेकर, सचिव श्री. काका चव्हाण आणि सर्व विश्वस्त, तसेच माजी नगरसेविका सौ. सई सुयोग चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.

सनातन संस्कार वर्गाच्या’ समारोपीय कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना माजी नगरसेविका सौ. सई सुयोग चव्हाण

मनोगत

१. श्री. भाऊ खेडेकर, अध्यक्ष : या संस्कार वर्गाला मुलानी चांगला प्रतिसाद दिला. ‘मुलांच्या ज्ञानात भर पडेल’, असे शिक्षणही या वर्गात दिले आहे.

२. श्री काका चव्हाण, सचिव : आज संस्काराची आवश्यकता का भासते, तर आपण पालक ते देण्यास कमी पडतो. सुसंस्कारित पिढीमुळे आपला हिंदु धर्म सक्षम होईल, देश समृद्ध होईल. सनातन संस्थेच्या माध्यमातून संस्कार वर्ग होतोय. या सेवेमध्ये आम्हाला खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल ऋणी आहे.

३. सौ. सई सुयोग चव्हाण, माजी नगरसेविका : सध्या लहान लहान मुलांवर अत्याचार होत आहेत. या घटना आपण टीव्हीवर ऐकतो. भ्रमणभाषच्या दुनियेमधून मुलांना बाहेर काढून, त्यांच्यावर चांगले संस्कार रुजवण्याचा सुंदर प्रयत्न सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आला आणि मुलांनीसुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला.  आपण देवाशी अनुसंधान साधले पाहिजे, देवाचे स्मरण केले, तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. या संस्कार वर्गातून मुलांना पुष्कळ छान माहिती मिळाली. सनातन संस्थेचे पुष्कळ मोलाचे कार्य चालू आहे. सनातनचे साधक झोकून देऊन कार्य करतात, ते स्वतःसाठी करत नाहीत, तर समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो. हिंदु जागृत व्हावेत, यांसाठी हे कार्य चालू आहे, या कार्यात आपला छोटासा वाटा असला पाहिजे, या हेतूने आम्ही सहकार्य केले.

४. श्री. राजेश सुतार, मंदिर प्रतिनिधी : अन्य धर्मीय त्यांच्या मुलांना प्रार्थना केल्याशिवाय जेवायला देत नाहीत, हिंदु मात्र आपली मुले देवाविषयी काय करतात कि नाही याकडे दुर्लक्ष करतात. पालकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.

५. श्री संदीप खरे, धर्मप्रेमी : हिंदु धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपली संस्कृती, संस्कार यांविषयी वर्गात जे विषय झाले ते कृतीत आणूया.

६. सौ. हर्षिता महेश कांबळी : पालक घरात शिकवतात; मात्र तुमचे शिकवणे पुष्कळ चांगले होते. ते पालक म्हणून आमच्या लक्षात आले. मुले घरी आल्यावर ‘आज आम्ही काय शिकलो’, हे कौतुकाने सांगत. ते ऐकून आनंद होई. मुले पुढे काय नवीन शिकायला मिळेल, यासाठी पुष्कळ उत्सुक झाली आहेत.

७. सौ प्रज्ञा वरवडेकर : मुलांच्या ज्ञानात भर पडली आहे. मुलांवर पुष्कळ चांगला परिणाम होतोय. सनातनने छान उपक्रम राबवला आहे.