महान विष्णुभक्त देवर्षि नारद यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘अक्षय्य तृतीयेच्या शुभ तिथीला, म्हणजे १९.४.२०२६ या दिवशी सकाळी मी नामजप करत असतांना अकस्मात् माझे श्री सरस्वतीदेवीशी अनुसंधान चालू झाले. तिने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि मला आशीर्वाद दिला. तिने आशीर्वादाच्या स्वरूपात सूक्ष्म विचारांद्वारे देवर्षि नारद यांच्याविषयीचे ज्ञान माझ्याकडे प्रवाहित केले. त्या वेळी मला देवर्षि नारदांविषयी उमगलेली ज्ञानसूत्रे मी येथे लेखबद्ध केली आहेत.

महान विष्णुभक्त देवर्षि नारद

 १. नारदमुनींचा जन्म आणि परिवार

१ अ. ब्रह्मपुत्र – दैवी उत्पत्ती : नारदमुनी हे ब्रह्माचे मनाद्वारे जन्मलेले पुत्र आहेत. त्यामुळे ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. त्यांना ‘ब्रह्मपुत्र’, ही उपाधी प्राप्त झाली आहे.

१ आ. परिवार : ‘ब्रह्मपुत्र दक्ष प्रजापति, सप्तर्षी आणि ‘सनक, सनातन, सनंदन आणि सनत्कुमार’ हे चार सनकादी कुमार, तसेच स्वयंभू मनु’ हे देवर्षि नारदांचे बंधू आहेत. दक्ष प्रजापतीची धर्मपत्नी महाराणी वीरणी आणि मनूची धर्मपत्नी शतरूपा, या देवर्षि नारदांच्या वहिनी आहेत, तसेच गंधर्वश्रेष्ठ अन् महामुनी असणारा ‘तुंबरू’ हा त्यांचा प्रिय मित्र आहे.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. देवर्षि नारदांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !  

२ अ. देवगुरु बृहस्पतींचा सर्वाेत्तम शिष्य : ब्रह्मपुत्र नारद हे देवगुरु बृहस्पतींचे सर्वाेत्तम शिष्य आहेत. इंद्राच्या स्वर्गलोकाच्या वर असणार्‍या बृहस्पतिलोकात, म्हणजे उच्च स्वर्गलोकात देवगुरु बृहस्पतींचा नित्य वास असतो. देवगुरु बृहस्पतींच्या उच्च स्वर्गलोकातील आश्रमात राहून ब्रह्मपुत्र नारदांनी त्यांच्याकडून वेद, उपनिषदे, दर्शने, आरण्यके, पुराणे इत्यादींचे ज्ञान प्राप्त केले. त्यामुळे त्यांची बुद्धी बृहस्पतींप्रमाणे विलक्षण सात्त्विक आणि सूक्ष्म आहे.

२ आ. देवर्षि : नारद ब्रह्मज्ञानी असण्यासह उत्तम वाक्पटू (बोलण्यात कुशल) आणि श्रेष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांना आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान, असे दोन्ही प्रकारचे ज्ञान अवगत झाले आहे. त्यामुळे शिष्य नारदाला देवतांना मार्गदर्शन करणार्‍या ऋषींचे ‘देवर्षि’ हे पद प्राप्त झाले.

२ इ. सरस्वतीच्या विशेष कृपेमुळे तिने नारदांचे विचार, वाणी आणि वीणा यांच्यामध्ये वास करणे : देवर्षि नारद हे माता सरस्वतीचेही मानसपुत्र आहेत. त्यांची श्रीविष्णुप्रतीची निस्सीम भक्ती पाहून माता सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना वरदान दिले, ‘मी सदैव तुझे विचार, वाणी आणि वीणा यांच्यामध्ये वास करीन.’ त्यामुळे देवर्षि नारद यांचे विचार अत्यंत शुद्ध आणि प्रगल्भ आहेत, तसेच त्यांची वाणी ओघवती, स्पष्ट अन् सुमधुर आहे.

२ ई. नारदीय वीणा : माता सरस्वतीने धारण केलेल्या दैवी वीणेतून एक दैवी वीणा निर्माण झाली. ही वीणा माता सरस्वतीने नारदांना दिली. त्यामुळे तिला ‘नारदीय वीणा’, हे नाव प्राप्त झाले. या वीणेतून निघणारे संगीत अत्यंत कर्णप्रिय आणि आल्हाददायी आहे. या वीणेच्या आधारे नारद इतरांशी संवाद साधतात आणि प्रभूचे गुणगान करत त्याचे नामसंकीर्तन करतात. ही नारदीय वीणा नारदमुनींच्या करकमलांत अत्यंत शोभून दिसते.

२ उ. परम विष्णुभक्त : नारद जरी ब्रह्मपुत्र असले, तरी त्यांच्या हृदयात विष्णुभक्तीचा सागर आहे. त्यामुळे ते केवळ श्रीविष्णूचे दूत नसून त्याचे परम भक्त आहेत. नारदमुनींचे मार्गदर्शन आणि सत्संग यांच्यामुळे ध्रुवबाळ अन् भक्त प्रल्हाद यांच्यामध्ये श्रीविष्णूप्रती उत्कटभाव आणि निस्सीम भक्ती जागृत झाली.

२ ऊ. पतितांचे उद्धारक : देवर्षि नारदांच्या सत्संगामुळे वाल्या कोळ्याला त्याच्या पापकर्मांची जाणीव झाली. त्यानंतर त्याने देवर्षि नारदांनी सांगितलेला रामनामाचा जप अनेक वर्षे अखंड करून प्रभु श्रीरामाची कृपा संपादन केली. त्यामुळे वाल्या कोळ्याचे रूपांतर वाल्मीकि ऋषींमध्ये झाले. अशा प्रकारे देवर्षि नारदांचा सत्संग आणि अनमोल मार्गदर्शन यांमुळे अनेक पतित जिवांचा उद्धार झाला.

 २ ए. कीर्तनभक्तीतून विश्वात धर्म आणि भक्ती यांचा प्रसार करणारे सर्वश्रेष्ठ कीर्तनकार : सर्वत्र संचार करत असतांना त्यांचा नेहमी ‘नारायण, नारायण’, असा नामजप चालू असतो. ते भगवंताच्या भक्तांना ‘श्रीविष्णूची महानता आणि त्याच्या उपासनेचे महत्त्व’, यांविषयी मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये भगवद्भक्ती जागृत करतात. त्यामुळे ते कीर्तनभक्तीतून विश्वात धर्म आणि भक्ती यांचा प्रसार करणारे सर्वश्रेष्ठ कीर्तनकार आहेत.

२ ऐ. श्रेष्ठ संगीतकार आणि ज्योतिष तज्ञ : देवर्षि नारद हे संगीत विशारद आहेत आणि ते वीणावादनात निपुण आहेत, तसेच त्यांना ज्योतिषशास्त्राचेही परिपूर्ण ज्ञान अवगत झाले आहे. जेव्हा बाल हनुमान गुरुरूपी सूर्यदेवाकडून ज्ञान संपादन करण्यासाठी सूर्यलोकात गेला, तेव्हा देवर्षि नारद यांनी त्याला संगीत आणि व्याकरण यांच्यासह भक्तीचेही ज्ञान दिले.

२ ओ. दक्षपुत्रांना संन्यासाची दीक्षा देणे : नारदांनी दक्षाच्या सहस्रो पुत्रांना संन्यासाची दीक्षा देऊन त्यांना मोक्षाच्या मार्गावर पाठवले. त्यामुळे दक्ष प्रजापति देवर्षि नारदांवर क्रोधित झाला आणि त्याने नारदांना ‘तू कधीही एकाच ठिकाणी १ प्रहरापेक्षा (३ घंट्यांपेक्षा) अधिक काळ रहाणार नाहीस आणि तुझ्या मनातील जिज्ञासेपोटी निर्माण होणारे प्रश्न कधीच संपणार नाहीत’, असा शाप दिला. त्यामुळे नारद या ब्रह्मांडातील १४ भुवनांमध्ये सतत भ्रमण करत असतात आणि प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी ब्रह्मलोक, वैकुंठ, कैलास इत्यादी लोकांत जातात. दक्ष प्रजापतीने नारदांना दिलेला हा शाप त्यांच्यासाठी वरदानच ठरला.

२ औ. भक्तीदेवीच्या ज्ञान आणि वैराग्य या पुत्रांना पुनरुज्जीवन देणे : कलियुगाच्या प्रारंभी भक्तीदेवीची शक्ती क्षीण झाली आणि तिची ज्ञान अन् वैराग्य ही दोन्ही तरुण मुले यमुनेच्या काठावर मरणप्राय स्थितीत पडली होती. देवर्षि नारदांनी त्या स्थानी श्रीमद्भागवताचे पठण करून ज्ञान आणि भक्ती यांनी युक्त असलेले दैवी चैतन्य प्रवाहित केले. त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य या भक्तीदेवीच्या अचेतन पुत्रांना पुनरुज्जीवन मिळाले.

२ अं. नारदवन : देवर्षि नारद यांनी त्यांच्या निर्मितीनंतर श्रीविष्णूची कृपा संपादन करण्यासाठी हिमालयातील घोर वनात अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. हे वन ‘नारदवन’, या नावाने विख्यात आहे. आजही तेथे गेल्यावर आपल्याला सूक्ष्मातून ‘नारायण, नारायण’, हा नामजप ऐकू येतो आणि नारायणाच्या अस्तित्वाची अनुभूती येते.

२ क. नारदपुराण आणि नारदाची भक्तीसूत्रे : नारदांवर आधारित असणारा धर्मग्रंथ हा ‘नारदपुराण’, या नावाने संबोधला जातो, तसेच नारदांनी सांगितलेली भक्तीसूत्रेही लोकप्रिय आहेत.

२ ख. महर्षि व्यासांचे मार्गदर्शक : महर्षि व्यास हे द्वापरयुगातील महाज्ञानी आणि थोर विद्वान होते. त्यांच्या अगाध ज्ञानापुढे सर्व जण नतमस्तक होतात. अशा महर्षि व्यासांनी महाभारतासारख्या अनेक ग्रंथांची रचना करूनही त्यांना मनःशांती लाभली नाही. तेव्हा देवर्षि नारद त्यांच्या समोर प्रगट झाले. त्यांनी व्यासांची व्यथा जाणून त्यांना भगवंताच्या समस्त लीलांचे वर्णन करणार्‍या ‘श्रीमद्भागवत पुराण’, या ग्रंथाची रचना करण्यास सांगितली. या ग्रंथाची रचना करत असतांना व्यासांमध्ये भक्तीरस जागृत झाला आणि त्यांच्या हृदयातील ज्ञानाचा रुक्षपणा दूर होऊन त्यांना परमानंद अन् परम शांती यांची अनुभूती आली.

३. महामुनी तुंबरू आणि देवर्षि नारद यांच्यातील साम्य अन् भेद !

३ अ. महामुनी तुंबरू आणि देवर्षि नारद यांच्यातील साम्य

१. दोघेही देवगुरु बृहस्पति यांचे शिष्य आहेत.

२. दोघांकडेही वीणा आहे.

३. दोघांनाही संगीतकलेची आवड असून दोघेही संगीतात निपुण आहेत.

४. दोघेही स्वर्गलोकात देवराज इंद्रापुढे वीणावादन करून मधुर गायन करतात.

५. दोघांकडेही विविध लोकांमध्ये भ्रमण करण्याची दिव्य क्षमता आहे.

३ आ. महामुनी तुंबरू आणि देवर्षि नारद यांच्यातील भेद

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

टीप १ – निसर्गाच्या सामान्य नियमांना (जन्म, मृत्यू आणि व्याधी यांना) छेद देण्याची क्षमता ज्या जिवांकडे असते, त्या वर्गाला ‘अतिमानवी योनी’, असे संबोधले जाते.

टीप २ – प्रकाम्य : जेव्हा सात्त्विक बुद्धी सूक्ष्माति-सूक्ष्म स्तरावर कार्यरत होते, तेव्हा तिचे प्राकट्य ‘परादिव्य’ असल्यामुळे सर्व कामना नष्ट होऊन मनुष्य कामनातीत होतो. त्यामुळे त्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्यामुळे या बुद्धीला ‘प्रकाम्य’ असे संबोधले आहे.

टीप ३ – दीप्तीमंडल : देहाभोवतीच्या प्रभावळीतून तेजाचे दिपून टाकणारे दिव्यतर आणि सूक्ष्मतर स्वरूप प्रगट होणे.

४. देवर्षि नारदांनी विविध साधनामार्गांनी साधना केल्यामुळे त्यांना प्राप्त झालेले बळ आणि त्यांच्यात विकसित झालेले दैवी गुण !

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

५. सारांश

देवर्षि नारद हे केवळ विष्णुदूत नसून सृष्टीतील जिवांशी सुसंवाद साधणारे आणि धर्म अन् भक्ती यांचे मूर्तीमंत स्वरूप आहेत.

नारदांचे दिव्यत्व पाहून येई श्रीहरीची प्रचीती ।
धन्य धन्य ही महान विभूती ।
अविरत करते श्रीहरीची कीर्तनभक्ती ।।

सत्संगाने अनेक जिवांना देई मुक्ती ।
नारदांचे दिव्यत्व पाहून येई श्रीहरीची प्रचीती ।।

कृतज्ञता आणि प्रार्थना

‘भगवान श्रीविष्णूच्या कृपेने त्याचे परम भक्त देवर्षि नारद यांच्याविषयीचा हा लेख सिद्ध झाला’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘आम्हा साधकांमध्येही देवर्षि नारदांप्रमाणे निस्सीम कीर्तनभक्ती निर्माण होऊन आमच्याकडूनही सर्वत्र सनातन हिंदु धर्माचा आणि भगवद्भक्तीचा प्रचार होऊ दे’, हीच माझी श्रीहरीच्या चरणी उत्कट प्रार्थना आहे.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १.५.२०२६, वेळ : सकाळी १०.२० ते ११, कालावधी : ४० मिनिटे)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.