भारतीय चित्रपटांमधील हिंदुविरोधी षड्यंत्र !

'हिंदू आणि राष्ट्र हितैषी' सदर !

१. चित्रपट आणि मालिका यांवर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे नियंत्रण आवश्यक !

‘भारतात चित्रपट हे समाजाला दिशा देणारे आणि समाजात परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे. चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांचा आपल्या अंतर्मनावर पुष्कळ परिणाम होतो. आपली मुले विज्ञापनांमधून दाखवण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांसाठी नेहमी आग्रही असतात. अशा या प्रभावी माध्यमांतून राष्ट्र आणि धर्म यांविरोधात चुकीचे कथानक प्रसारित केले जाते. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे पडताळण्यासाठी जातो. त्या चित्रपटातील विषयानुसार त्यांनी त्याला प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्या चित्रपटात देश, धर्म आणि सैन्य यांच्या विरोधात विषय असेल, तर तो तेथेच थांबवला गेला पाहिजे. एखादी आक्षेपार्ह गोष्ट प्रदर्शित होण्यापूर्वीच काढणे, हे चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे काम आहे.

२. चित्रपटांमधून हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे होणारे विडंबन थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न

अधिवक्त्या ज्योत्स्ना गर्ग

अ. ‘द शॅडो मास्टर हनुमान’ चित्रपटाच्या माध्यमातून होणारे हनुमंताचे विडंबन थांबवले : मी वर्ष २०१८ पासून चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या सल्लागार समितीतील सदस्या (ॲडवायझरी पॅनल मेंबर) आहे. माझ्याकडे ‘हॉलीवूड’ (विदेशी चित्रपट)पासून भारतातील सर्व प्रांतातील चित्रपट येतात. त्या चित्रपटांमध्ये अश्लीलता आणि हिंदु धर्माचे विडंबन असल्यास त्याला आम्ही थांबवतो. मागील वर्षी ‘द शॅडो मास्टर हनुमान’ या हॉलीवूडपटात ‘हनुमान सैतान असून तो लहान मुलांचा बळी घेतो आणि त्यातून त्याला शक्ती मिळते’, असे दाखवण्यात आले होते. एका प्रसिद्ध भारतीय निर्मात्याने हा चित्रपट विदेशातून खरेदी करून आणला होता. या चित्रपटाला आम्ही तीव्र विरोध केला. संकटमोचक हनुमान हे कोट्यवधी हिंदूंचे दैवत आहे. त्यामुळे मी मंडळाला या चित्रपटाला स्पष्टपणे नकार द्यायला भाग पाडले.

आ. अभिनेते अक्षय कुमारच्या ‘ओएम्जी २’ हिंदी चित्रपटातील विडंबनाविषयीच्या ३१ प्रसंगांना कात्री : काही वर्षांपूर्वी अभिनेते अक्षय कुमार यांचा ‘ओएम्जी २’ हा हिंदी चित्रपट आमच्याकडे आला होता. ‘ओएम्जी १’ या चित्रपटातून हिंदु मुलांना मंदिरांपासून लांब नेण्याचे फार मोठे दुष्कर्म केले होते. ‘मंदिरात दुधाचा अभिषेक केल्याने दूध वाया जाते’, हे या चित्रपटात दाखवले होते. हाच विषय ‘ओएम्जी २’मध्ये पुढे नेण्यात आला होता. या चित्रपटात त्यांनी भगवान शिवाला कामवासनेशी जोडले होते. वास्तविक भगवान शिव हे संपूर्ण वैराग्याचे प्रतीक असून त्यांनी साक्षात् कामदेवाला भस्मसात् केले होते. मी या चित्रपटाचे ५२ भाग पाहिले आणि त्यांना निक्षून सांगितले, ‘जोपर्यंत या चित्रपटातून भगवान शिवाविषयीचे चित्रीकरण काढले जात नाही, तोपर्यंत या चित्रपटाला अनुमती मिळू शकत नाही.’ हा चित्रपट मी तेथेच रहित केला. या चित्रपटातील ३१ आक्षेपार्ह चित्रणे काढल्यानंतरच त्याला पुनर्तपासणी समितीने (Revising committee) अनुमती दिली.

इ. भोजपुरी चित्रपटातील भगवान श्रीकृष्णाच्या विडंबनाला लगाम : सध्या भोजपुरी चित्रपटात नवीन पद्धत रूढ होत चालली आहे. त्यांच्या चित्रपटात मुसलमान नायक आणि हिंदु नायिका दाखवली जाते, तसेच खलनायक म्हणून ब्राह्मण व्यक्तीरेखा दाखवली जाते. यावरून त्यांना देशात फुटीरता निर्माण करायची आहे, हे स्पष्ट दिसते. असे चित्रपट लोकांपर्यंत जाणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेतो. एका भोजपुरी चित्रपटात ‘बासुरीवाला’ हा शब्द, जो भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे, त्याला शिवीसारखा वापरला होता. हे पाहिल्यावर मी त्याच्या निर्मात्याला जाब विचारला; पण त्याच्याकडे त्यावर उत्तर नव्हते.

ई. चित्रपटातील शिव-शंकर नावे पालटायला सांगितली : एका हिंदी चित्रपटात शिव आणि शंकर नावाचे २ जुळे बंधू गुंडगिरी करतांना दाखवले. त्यात शिव नावासह एक शिवीही उच्चारली जाते. त्यामुळे आम्ही दोन्ही नायकांची नावे पालटायला सांगितली.

अशा प्रकारे अनेक चित्रपट निर्माते आणि अभिनेते हिंदु धर्माची विटंबना करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

अधिवक्त्या ज्योत्स्ना गर्ग यांचा परिचय

अधिवक्त्या ज्योत्स्ना गर्ग ‘नेशन फर्स्ट कलेक्टिव्ह’ या संस्थेच्या महासचिव, तसेच चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या सल्लागार समितीच्या सदस्या आहेत. या माध्यमातून त्या चित्रपटात होणारे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे विडंबन थांबवण्यासाठी प्रयत्न करतात.

३. अयोध्येतील श्रीराममंदिराविषयीच्या माहितीपटातून कारसेवकांना जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न

मी अनेक चित्रपट महोत्सवांच्या ‘ज्युरी कमिटी’ (परीक्षक समिती)च्या निवड समितीत असते. दोन वर्षांपूर्वी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला. त्यात देश-विदेशातील सर्व माहितीपट (डॉक्युमेंटरी) आले होते. माझ्याकडे ‘रामजन्मभूमी टेंपल : द रिटर्न ऑफ स्प्लेंडीड सन’ (रामजन्मभूमी मंदिर : तेजस्वी सूर्याचे पुनरागमन) नावाचा माहितीपट आला होता. या माहितीपटाचे नाव ऐकल्यावर आपल्याला तो पहावासा वाटू शकतो; पण तो बनवणारा अमित त्रिपाठी हा साम्यवादी विचारांचा होता, हे मला ठाऊक होते. यापूर्वी त्याच्या काही माहितीपटांतून हिंदु धर्माविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. असा संभ्रम आपल्या नवीन पिढीमध्ये निर्माण होता कामा नये. त्याच्या ‘रामजन्मभूमी टेंपल : द रिटर्न ऑफ स्प्लेंडीड सन’ या माहितीपटाचा प्रारंभ आणि शेवट चांगला करण्यात आला; पण चित्रपटामध्ये त्याने हिंदूंनी बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त करून श्रीरामजन्मभूमीसाठी आंदोलन चालू केले, तेव्हापासूनच देशात वादविवाद चालू झाला, असे म्हटले. त्यातून त्याने कारसेवकांना ‘जातीयवादी’ ठरवले होते. या माहितीपटात त्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव श्री. चंपत राय यांचा वार्तालाप दाखवला. यात त्यांच्या नावाचा अपवापर झाला, हे त्यांनाही ठाऊक नसेल. या माहितीपटाचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होईल, याचाही विचार होणे आवश्यक आहे. नवीन पिढीने असे चित्रपट पाहिले, तर त्यांच्या मनात हिंदूंविषयी अपसमज निर्माण होऊ शकतो; कारण ते खरा इतिहास वाचतच नसतात.

४. ‘जोधा-अकबर’ चित्रपटातून खोट्या इतिहासाचे प्रदर्शन

‘जोधा-अकबर’ या चित्रपटात या दोघांचे प्रेमप्रकरण दाखवले आहे. वास्तविक जोधाबाईचे अकबरावर प्रेम नव्हते, तर ‘तिचा राजपूत भाऊ मानसिंह याने स्वधर्माभिमान धुळीस मिळवून स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी त्याने त्याची बहीण जोधा हिचा विवाह अकबराशी लावून तिला जनानखान्यात लोटले’, असे दाखवले. प्रत्यक्ष सत्य इतिहास न दाखवता चुकीचे दाखवले जाते.

५. हिंदु धर्म, देश आणि भारतीय सैन्य यांच्या विरोधी चित्रपटांना विदेशातून आर्थिक साहाय्य

हिंदु धर्म, संस्कृती आणि भारतीय सैन्य यांच्यावर आघात करणारे चित्रपट किंवा मालिका यांना विदेशातून भरघोस अर्थसाहाय्य मिळते. त्यामुळे भारतातील चित्रपट निर्माते चुकीचे आणि आघात करणारे चित्रपट बनवतात. वास्तविक ‘आदिपुरुष’ म्हणून दाखवण्यासारखे पुष्कळ काही साहित्य उपलब्ध होते; परंतु त्यांनी मुद्दाम हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभु श्रीराम आणि सीता यांना केंद्रस्थानी ठेवून तो चित्रपट बनवला. त्यातील हीनभाषा ही आपल्या संस्कृतीवर आघात करणारीच होती. त्यामुळे आपण सर्वांनी एकजूट होऊन या चित्रपटावर बहिष्कार टाकला आणि आक्षेपार्ह विषय हटवण्यास भाग पाडले.

पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये नेहमीच खलनायकाच्या भूमिकेत कपाळावर लाल टिळा असणारे साधू किंवा पंडित दाखवले जायचे आणि मौलवी किंवा पाद्री यांना प्रामाणिक अन् सद्गुणी दाखवले जायचे. त्या काळी आजच्या एवढी लोकांमध्ये जागृती नव्हती. त्यामुळे ते दाखवले गेले; पण आता लोकांच्या माध्यमातून विरोध केला जात आहे.’

– अधिवक्त्या ज्योत्स्ना गर्ग, महासचिव, ‘नेशन फर्स्ट कलेक्टिव्ह’ आणि सदस्या, चित्रपट परिनिरीक्षण मंडळ.