साधकांना ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात सेवा करण्यासाठी दिशा देऊन त्याद्वारे त्यांची साधना करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘मी वर्ष २०२२ पासून ज्योतिषशास्त्राशी संबंधित सेवा करत आहे. मी या सेवेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा अनुभवत आहे.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करतांना अनुभवलेली गुरुकृपा !

१ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ईश्वरस्वरूप आहेत’, असे जाणवणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करून त्यांच्यातील दैवी पैलू उलगडण्याची माझी पुष्कळ इच्छा होती. जन्मकुंडलीतील ग्रहयोगांवरून व्यक्तीमध्ये जन्मतः असलेले गुण-दोष लक्षात येतात. मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केल्यावर त्यांच्यातील अनेक गुण माझ्या लक्षात आले; मात्र त्यांच्यामध्ये एकही स्वभावदोष आढळला नाही. तेव्हा मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी लिहिलेल्या ‘स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुणसंवर्धन प्रक्रिया’, या ग्रंथातील एक सूत्र आठवले. ते सूत्र असे आहे की, ‘सत्ययुगात मनुष्य सोहम् भावात होता; म्हणजे मी ईश्वर आहे, अशी अनुभूती प्रत्येक व्यक्ती घेत होती. त्या युगात ‘तत्परता, गुणग्राहकता, नम्रता आणि आज्ञाधारकपणा’ आदी गुण मानवात उपजतच होते.’ हे सर्व गुण मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मकुंडलीत आढळले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ईश्वरस्वरूप आहेत’, असे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण पुष्कळ आवडणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर मी ते त्यांना वाचण्यासाठी पाठवले. गुरुदेवांना त्यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण पुष्कळ आवडले. त्यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त असलेल्या विशेषांकात १४.५.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झाले होते. मी ‘ज्योतिष विशारद’, ही पदवी प्राप्त केल्यानंतरचे हे माझे पहिलेच विश्लेषण होते.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अन् काही सद्गुरु यांच्या जन्मकुंडल्यांचे विश्लेषण करण्याची संधी मिळणे

श्री. यशवंत कणगलेकर

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मी करत असलेल्या ज्योतिषशास्त्रीय संशोधनास गती मिळाली. त्यानंतर मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सद्गुरु राजेंद्र शिंदे, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्याही जन्मकुंडल्यांचे विश्लेषण केले. हे करतांना मला ज्योतिष विशारद श्री. राज कर्वे यांचे साहाय्य लाभले. या सर्वांचे आम्ही केलेले विश्लेषण सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना आवडले. त्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि ‘सेवेतून आनंद कसा मिळवायचा ?’, हे मला शिकवले.

३. साधकांना साधनेत लाभ होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या जन्मकुंडल्यांचे विश्लेषण करण्यास सांगणे

एकदा माझी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी भेट झाली. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘जन्मकुंडली पाहिल्यावर संबंधित व्यक्तीच्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही सांगू शकता ?’’मी त्यांना सांगितले, ‘‘जन्मकुंडलीवरून व्यक्तीमधील गुणवैशिष्ट्ये, तिचे स्वभावदोष, साधनेत प्रगती होण्यासाठी तिला लाभलेली अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती, तिला आध्यात्मिक त्रास असल्यास त्याविषयी आणि तिच्या प्रारब्धाची तीव्रता इत्यादी गोष्टी सांगू शकतो.’’ त्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव म्हणाले, ‘‘काही साधकांच्या जन्मकुंडल्यांचे विश्लेषण करून पाठवा.’’ तेथे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ उपस्थित होते. त्यांना उद्देशून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव म्हणाले, ‘‘श्री. कणगलेकर यांनी बुद्धीच्या स्तरावर केलेले ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण तुम्ही सूक्ष्मातून तपासा आणि साधकांना नामजपादी उपाय सांगा.’’

४. ‘ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून साधकाची साधना व्हावी आणि इतर साधकांनाही ज्योतिषशास्त्राचा लाभ व्हावा’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या तळमळीमुळे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळणे

त्यानंतर आम्ही २६ साधकांच्या जन्मकुंडल्यांचा अभ्यास केला. अनेक साधकांना त्यांच्या प्रारब्धातील अडचणींवर उपाय म्हणून ग्रहांचा जप करणे आणि शांती विधी करणे आदी ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगण्यात आले. यामुळे अनेक साधकांना त्याचा लाभ झाला. या सेवेच्या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला अनेक वेळा प्रसाद पाठवला. ‘ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून आमची साधना व्हावी, तसेच इतर साधकांनाही ज्योतिषशास्त्राचा लाभ व्हावा’, या गुरुदेवांच्या तळमळीमुळे आम्हाला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळत होते.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘ज्योतिषशास्त्राचा उपयोग साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी व्हावा’, या दृष्टीने विचार करण्यास शिकवणे आणि ‘सर्व काही गुरुदेवच करतात’, हे अनुभवता येणे

व्यवहारात व्यक्ती ज्योतिषशास्त्राचा उपयोग अधिकतर व्यावहारिक अडचणींवर उपाय मिळवण्यासाठी करतात. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘ज्योतिषशास्त्राचा उपयोग साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कसा करता येईल’, या दृष्टीने विचार करण्यास आम्हाला शिकवले. ते आम्हाला वेळोवेळी संशोधन करण्यासाठी नाविन्यपूर्ण विषय सुचवत असत. त्यांनी आम्हाला ज्योतिषशास्त्रावर लेखमाला लिहिण्यास सांगितले. हे सर्व करत असतांना आम्हाला ‘हे कसे जमणार ?’, असे वाटायचे. प्रत्यक्ष परिणाम पाहिल्यावर ‘सर्व काही गुरुदेवच करून घेतात’, याचा अनुभव येतो. सर्व काही गुरुदेवच करतात; मात्र त्याचे श्रेय आम्हाला देऊन ते स्वतः नामानिराळे रहातात.’

– श्री. यशवंत कणगलेकर (वय ७७ वर्षे), ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक