Nida Khan Arrest : ‘टी.सी.एस्.’ धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला अटक

  • आश्रय देणारा ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चा नगरसेवक मतीन पटेल कह्यात

  • माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या चौकशीची मागणी

(ए.आय.एम्.आय.एम्. म्हणजे ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ अर्थात् ‘अखिल भारतीय मुसलमान एकता संघ’)

आरोपी निदा खान

छत्रपती संभाजीनगर – नाशिक येथील ‘टी.सी.एस्.’ धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली आणि ४० दिवसांपासून पसार असलेली निदा खान हिला पोलिसांनी अंततः छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातील एका सदनिकेतून अटक केली आहे. तिच्या भ्रमणभाषमधील माहितीवरून या धर्मांतराचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, याची माहिती आता समोर येईल. यामागे विदेशातून पैशांचा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणा असल्याचा दाट संशय आहे. हिंदु महिलांचे शोषण आणि धर्मांतर करणार्‍या नराधमांना साहाय्य करण्यात निदा खानची महत्त्वाची भूमिका होती.

निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते; मात्र न्यायालयाने या प्रकरणाचे धागेदोरे ‘आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचले असल्याचे सांगत तिचा जामीन फेटाळला. जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्याच्या ती सिद्धतेत होती. दानिश शेख याच्या भ्रमणभाषमधील लिखित संवाद (चॅट्स) आणि ‘कॉल रेकॉर्ड्स’वरून निदा संभाजीनगरात असल्याची निश्चिती पटली. नाशिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय अन्वेषण पथक या तिघांनी मिळून ही कारवाई केली.

निदा खानला आश्रय देणारा एम्.आय.एम्.चा नगरसेवक मतीन पटेल कह्यात !

एम्.आय.एम्. पक्षाचा नगरसेवक मतीन पटेल याने निदा खान हिला आश्रय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कौसर भागात घर घेऊन तिच्यासह तिच्या कुटुंबियांना त्याने आश्रय दिला होता. त्यामुळे या नगरसेवकालाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पटेल यांचीही चौकशी करण्यात आली.

इम्तियाज जलील यांची चौकशी झाली पाहिजे ! – संजय शिरसाट, मंत्री, शिवसेना

निदा खान संभाजीनगरमध्ये झोपडपट्टी भागात, तसेच अमली पदार्थांचे धंदे चालतात तिथे लपली होती. तिला ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ने सहकार्य केले. निदा खान हा एक मोहरा आहे. पुणे, संभाजीनगरसह सगळीकडे असे प्रकार होत आहेत.

ए.आय.एम्.आय.एम्.’चे इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन तिला उघड पाठिंबा दर्शवला होता. त्यांची चौकशी झाली पाहिजे. निदा खान प्रत्येक वेळी छत्रपती संभाजीनगरमध्येच का येत होती ? यापूर्वीही हे शहर देशद्रोही कारवायांसाठी चर्चेत राहिले आहे. २२ ते ३० वयोगटांतील धर्मांध तरुणांना अशा कृत्यांसाठी प्रशिक्षित केले जात असून त्यांच्याकडे पैसा आणि वाहने कुठून येतात, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

पोलिसांनी कौशल्याने केली अटक !

निदा खान लपलेली इमारत दुर्गम भागात होती. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तिचे स्थळ शोधून त्यावर गुप्त पाळत ठेवली होती. आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाई करत तिला कह्यात घेतले. गर्दी जमा होण्याची, माहिती फुटण्याची किंवा वातावरण बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी तिला थेट न्यायाधिशांच्या निवासस्थानी नेऊन ‘ट्रान्झिट रिमांड’ संमत करून घेऊन रातोरात नाशिकला आणले. प्रवासातही गुप्तता पाळून १५ सेकंदात एका गाडीतून दुसर्‍या गाडीत हालवले.

ए.आय.एम्.आय.एम्. हा अतिरेकी पक्ष – नितेश राणे !

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवणे हे या लोकांचे मनसुबे आहेत. एम्.आय.एम्. हा अतिरेकी पक्ष आहे. या पक्षात काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी पडताळली पाहिजे. इम्तियाज जलील हे निदा खानची बाजू घेत होते. इम्तियाज जलील यांच्या समर्थनाविना हे शक्य नाही.

‘निदा खान आतंकवादी नाही, तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत’, असे एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील म्हणाले.

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ पक्षावर बंदी का आणू नये ? ‘भगवा आतंकवाद’ म्हणून आवई उठवणारे आता या पक्षाविषयी काही बोलणार नाहीत, हे जाणा !