भोंदू साधूच्या विळख्यातून साधकाची सुटका करणारे कल्याणचे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

‘एक साधक एका साधूच्या नादी लागला; परंतु नंतर तो साधू भोंदू असल्याचे त्याच्या लक्षात आले. कल्याणचे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी काळी विद्या जाणणार्‍या त्या साधूच्या विळख्यातून साधकाची कशी सुटका केली, याची ही ‘चक्षुर्वै सत्यम् ।’ म्हणजे ‘जे प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसते, तेच सत्य आहे’, अशी रोमांचक कथा आहे.                                                                      

(भाग १)

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

१. भोंदू साधूच्या नादाला लागून साधकाची झालेली फसगत

१ अ. गोष्ट एका भोंदू साधूची : ‘नागपूरला माझे आजोळ होते. आजोबा स्वतः अत्यंत धार्मिक असून त्यांची त्यांच्या साधना मार्गात पुष्कळ प्रगती झाली होती. त्यांनी पाण्यात उभे राहून अनेक अनुष्ठाने केली होती. गणपति अथर्वशीर्ष घरात सदैव चालू असायचे. आजोबांची ध्यान धारणा ते भावसमाधीपर्यंत मजल गेली होती. घरातील वातावरणही अत्यंत धार्मिक असेच होते. वेगवेगळे सत्पुरुष आणि संन्यासी इत्यादी भक्तीमार्गातील लोकांचे घरात वरचेवर येणे-जाणे असे.

अशा वातावरणात वाढलेले आमचे सुदेशकाका देवधर्म आणि उपासना यांची आवड असणारे आहेत. स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनीयर) झाल्यावर काका पाटबंधारे खात्यात चाकरीला लागले. काका चाकरीनिमित्त फिरतीवर असायचे. एक दिवस काकांची एका साधूशी ओळख झाली. साधूचे वास्तव्य नागपुरात फारसे नसायचे; पण साधूला नागपुरात जागा हवी होती. मग काकांनी त्यांच्या बंगल्यातील मागच्या बाजूला दोन खोल्या दिल्या. काही दिवसांनी गच्चीवर दोन खोल्या बांधूनही दिल्या.

१ आ. साधू पूर्वाश्रमी कोण होता ? : आता या साधूच्या पूर्वाश्रमाची माहिती आपण पाहू या. हा माणूस उच्च शिक्षित होता, तसेच तो अत्यंत धनाढ्य, उंचापुरा, देखणा आणि त्याच्या वाणीत गोडवा होता. उच्च शिक्षित असल्याने वेगवेगळ्या कारखान्यांतून व्यवस्थापकाचे काम केल्यावर साधू नागपुरातीलच एका आस्थापनात (कंपनीत) उच्च पदावर चाकरी करू लागला. साधूचे व्यक्तीमत्त्व मुळातच विलक्षण आकर्षक, त्यात मोठ्या पदाची नोकरी त्यामुळे लोक त्याच्याकडे सहज आकर्षित होत असत. काकांच्या बंगल्यात ४ खोल्या काकांकडे आणि उरलेल्या ४ खोल्या साधू अन् त्याच्या कुमारी साधिका (नन्स) यांच्याकडे होत्या.

१ इ. काकांनी साधूला गुरु करणे : काकांकडील वास्तव्यात साधू काकांशी अत्यंत प्रेमाने बोलायचा. त्यांची नेहमी विचारपूस करायचा. एकदा आमच्या काकूला बरे नव्हते. साधूला ते कळताच त्याने चौकशी करून काही औषधे दिली. नन्ला काकूकडे काही हवे-नको बघायला पाठवले.

काका हळूहळू साधूकडे जाऊ लागले. एक दोनदा काका गेले असता साधूने काकांना गायत्रीची उपासना करायला सांगितली. त्याने काकांना सांगितले, ‘‘मी अमेरिकेत गायत्रीवर दिलेली भाषणे पुष्कळ गाजली होती. मला असलेेले सर्व ज्ञान मी तुला देईन.’’ काका अत्यंत भारावून गेले अन् त्यांनी साधूला आपला गुरु केले. त्याच्याकडून दीक्षा घेऊन उपासना चालू केली.

१ ई. साधूने काकांच्या घराची रचना पालटण्यास सांगणे : हळूहळू साधू काकांकडे येऊ लागला. काकांच्या घराची रचना अशी होती की, काकांचे शयनकक्ष (बेडरूम) आणि साधूची खोली यामध्ये लाकडी दरवाजा होता. काकांच्या शयनकक्षाच्या डाव्या हाताला स्वयंपाकघर, स्वयंपाकघरात एका कोपर्‍यात देवघर होते. महाराजांनी घर फिरून पाहिल्यावर एका भेटीत ते म्हणाले, ‘‘काय हे ? एवढे मोठे घर आणि देव स्वयंपाक घरात ? छे छे ! हे योग्य नाही ! देव दुसर्‍या खोलीत ठेवा.’’ अशा प्रकारे त्यांनी देव काकांच्या शयनकक्षामध्ये आणून ठेवायला लावले. मग ‘देवाच्या खोलीत झोपू नका’, असे सांगून खोलीतील रचना स्वतःच्या देखरेखीखाली पालटून घेतली. काकांचे शयनकक्ष आणि साधूची खोली यांमधील लाकडी दरवाज्याला लागून एक लाकडी कपाट ठेवायलाही लावले.

१ उ. साधूचा जगावेगळा उपदेश : साधूने सांगितल्याप्रमाणे काकांनी गायत्रीची उपासना चालू केली. त्यांनी जिद्दीने, चिकाटीने जपसंख्या वाढवली. हळूहळू बैठकही जमू लागली. जोडीला अक्कलकोट स्वामींची सेवाही चालू होतीच. काकांना उपासनेतील प्रगतीने काही आश्‍चर्यकारक अनुभवही येऊ लागले.

साधूचे काकांवर लक्ष होतेच. काकांची साधनेतील प्रगती पाहून साधू गारच झाला. मुळातच काही हेतूने साधू काकांच्या बंगल्यात आला होता. त्याच हेतूने तो काकांशी जवळीक साधत होता.

काका साधूला गायत्रीबद्दल खोदून खोदून विचारायचे; पण साधू ताकास तूर लागू देईना. शेवटी काकांना वाटले, ‘महाराजांची आपल्याला ज्ञान देण्याची इच्छा नाही अथवा आपली पात्रता नाही. या दोन्ही गोष्टी खर्‍या नसतील, तर साधूजवळ मुळातच काही नसावे.’

पुढे साधू काकांना सांगू लागला, ‘‘गायत्रीचा जप बंद कर. अती जपाने तुला वेड लागेल. घरातील कुलाचार बंद कर. अक्कलकोट स्वामींची सेवा बंद कर. घरातील देवांचे पाण्यात विसर्जन कर. तुझा झालेला गायत्री जप मला अर्पण कर आणि मला पूर्णतः शरण ये. आपण करार (ट्रस्ट) करू आणि तूही स्वतःला ईश्‍वरी कार्यात वाहून घे.’’ साधूची ही मुक्ताफळे ऐकून काका थक्क झाले. ‘कसला करार ? तो कोण करणार ?’ काकांना सर्वच गोष्टी विचित्र वाटू लागल्या अन् काका हळूहळू साधूपासून दूरच राहू लागले.

१ ऊ. साधूने काकांच्या घरात हात-पाय पसरणे : काकांनी स्वयंपाकघराच्या जवळील खोलीत भिंतीत कपाटे करून घेतली आहेत. साधूने गोड गोड बोलून ती कपाटे वापरायला मागितली. ‘नाही कसे म्हणायचे ?’, या भीतीमुळे काकांनी होकार दिला. दिवसभर नन्चा कपाटातील सामान काढणे-ठेवणे या निमित्ताने घरात वावर चालू झाला. या खोलीत बाहेरच्या दुसर्‍या खोलीतून आत जायला लागायचे, म्हणजेच या दोन्ही खोल्यांतही साधू आणि मंडळींचा धुडगूस चालू झाला. शेवटी काकाकडे स्वयंपाकघर आणि बैठकीची खोली अशा दोनच खोल्या उरल्या. काका आधीच साधूपासून दूर राहू लागला होता. त्यातच घरात नन्सचा वावर चालू झाला. मालकालाच घरात रहायची चोरी म्हणतात, त्यातला हा प्रकार होता.

१ ए. काकूंचे आजारपण : हळूहळू काकांकडील मंडळींना याचा त्रास चालू झाला. घरात सातत्याने नैराश्य, दडपण यायचे आणि भीती वाटायची. घरात आजारपण चालू झाले. घरातील अंथरुण काही निघेना. एकाचे झाले की, दुसरा अशी घरातील चारही माणसे सारखी आजारी पडू लागली. काकूंचा पाय बोलता बोलता सुजायचा आणि हळूहळू सूज उतरून पुन्हा पूर्ववत् व्हायचा.

काकूंना आणखी काही व्याधी चालू झाल्या. नागपुरातील आधुनिक वैद्य (डॉक्टर) झाले, वैद्य झाले; पण गुण येईना. इतकेच नव्हे, तर निदानही होईना. या आधुनिक वैद्यांना दाखव, त्या आधुनिक वैद्यांना दाखव, असे करता करता शेवटी काकूला जसलोक रुग्णालयात नेले. तेथेही काही निदान होईना, कंटाळून दोघे नागपूरला आले.

नागपूरला आल्यावर काका साधूकडे जायचे पूर्ण बंद झाले. सकाळी साधक मंडळी आरतीला यायची, तेव्हा १० मिनिटे काकू तेथे जाऊन यायची.

१ ऐ. स्वतःच्या घरात पाहुणे असल्याप्रमाणे रहावे लागणे : घरात आणखी एक प्रकार चालू झाला. घरातील सर्व बोलणे साधूला समजू लागले. आज घरात काही बोलणे झाले की, उद्या काकू आरतीला गेल्यावर साधू सूचक बोलायचा. असे दोन-तीनदा झाल्यावर ‘आपल्याकडील सर्व बोलणे साधूला कळते’, याची निश्‍चिती होऊन काका-काकू हतबल झाले. घरात काही महत्त्वाचे बोलायचे झाल्यावर नातेवाइकांकडे जाऊन बोलायचे, एवढाच उपाय आता उरला होता.

स्वतःच्याच घरात नीट रहाता येत नाही. आपल्याच घरात आपण पाहुणे ! वर काही बोलायची सोय नाही. या सर्व प्रकारांनी काका कंटाळून गेले. निर्वाणीचा उपाय म्हणून अखेर त्याने अक्कलकोट स्वामींच्या पोथीच्या पारायणास आरंभ केला.

१ ओ. साधूचा भोंदूपणा उघड झाल्याने काकांची स्थिती भ्रमिष्टासारखी होणे : रात्री सर्व निजानिज झाल्यावर काकांनी शुचीर्भूत होऊन देवघरात पारायणाला आरंभ केला. पोथी चालू होऊन एक दिवस होऊन काही वेळ झाला, तोच काकाला कसलीतरी चाहूल लागली. काहीतरी खुसफूस आवाज येऊ लागले. ‘भास असेल’, असे समजून काका गप्प बसले. दुसर्‍या रात्रीही तोच प्रकार. तिसर्‍या दिवशी मात्र काकांनी या प्रकाराचा छडा लावायचा ठरवला. रात्री परत चाहूल, आवाज, खुसफूस चालू झाल्यावर काकांनी घरात फिरून पाहिले. सर्व मंडळी झोपली होती. घराचे दरवाजे बंद होते. मग हा आवाज येतो कुठून ? अरेच्या ! आवाज साधूच्या खोलीतून येतोय तर ! काकांनी धीर करून फटीतून पाहिले, तर काय ? महाराज नन्ससमवेत चक्क प्रणयलीला करत होते.

क्षणभर काकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना. ‘आपल्या डोक्यावर कुणीतरी घण घालतोय’, असे काकांना वाटले. अरेरे ! भगव्या वस्त्राखाली काय हा अधःपात ! दिवसभर कितीतरी माणसे येऊन याचे पाय धरतात. माणसाने विश्‍वास तरी कुठे ठेवायचा ?

एक ना दोन, विचार करून काकांचे डोके सुन्न झाले, बरं एक दिवस नाही, दोन दिवस नाही. लागोपाठ ३ दिवस हा प्रकार काकांनी डोळ्यांनी पाहिला.

या प्रकारानंतर काका २ – ३ आठवडे भ्रमिष्टासारखे झाले. रात्री दीड घंट्यापेक्षा झोप मिळेना, जेवण जाईना, पचनशक्तीवर परिणाम झाला. काकांची बेचैनी वाढतच गेली.

१ औ. काकांनी साधूपासून होत असलेला त्रास सांगणे : माझी आई काकूला बघायला नागपूरला गेली होती. १ – २ दिवसांतच तिच्या ‘काकांचे काहीतरी बिनसले आहे’, हे लक्षात आले. दुसर्‍या दिवशी तिने अप्पाकाकांना बोलावून दोघांनी मिळून सुदेशकाकांना विचारले. काकांनी हळूहळू आपल्याला साधूपासून होत असलेल्या त्रासांबद्दल सांगितले. ‘हा साधू भाडोत्री असल्याने इथून हलणे कदापीही शक्य नाही’, असा वेगवेगळ्या वकिलांचा सल्ला असल्याचेही सांगितले. बिचकत बिचकत ३ रात्री दिसलेल्या साधूच्या संदर्भातील गोष्टी सांगितल्या आणि यावर उपाय म्हणून बंगला विकून टाकायचा विचारही त्यांच्या कानावर घातला.

१ अं. साधूच्या पूर्वायुष्याविषयी माहिती मिळणे आणि साधू भोंदू असल्याचे कळणे : पुढे साधूचे भोंदूपण उघड झाल्याने हैराण झालेल्या काकांनी आपल्या अत्यंत विश्‍वासातल्या लोकांजवळ साधूचा विषय काढला अन् हळूहळू महाराजांचे ‘अलौकिक लीलाचरित्र’ बाहेर येऊ लागले.

उत्तरेकडे एक साध्वी रहात होती. तिने देवीचे एक पीठ स्थापन केले होते. ‘मुलगा हुशार आहे, पुढे आपल्या कार्याचा उत्तम प्रचारक होईल’, या हेतूने त्या साध्वीने या सद्गृहस्थांना (साधूला) ते शिशु असतांनाच जवळ केले. पुढे आपल्याच नात्यातील एका मुलीशी या गृहस्थाचे लग्नही करून दिले.

साधूची बायको या साध्वीची पट्टशिष्या होती. या साध्वीने देह ठेवल्यावर साधूची बायको ‘पीठा’वर बसली. मध्ये काही काळ गेला. साधूच्या बायकोचा अंतःकाळ आला. साधूची बायको तीनतीनदा सांगत होती, ‘‘मला स्पर्श करू नका.’’ साधूने तिच्या पायाचा अंगठा गच्च धरून ठेवला होता. त्यामुळे साधूच्या बायकोने देह ठेवल्यावर तिच्या शक्ती साधूकडे आल्या.

या ‘पीठा’च्या ट्रस्टचा अध्यक्षही साधूच बनला. अशा प्रकारे साधू एक दिवस चक्क महाराज बनला. या पिठाच्याच गावी या महाराजावर फौजदारी झाली होती. सर्वोच्च न्यायालयातील एका अग्रगण्य वकिलाचा मुलगा वकील होता.

काकांच्या खास विश्‍वासातील माणसाने काकांना सांगितले, ‘‘बाबा रे, या माणसापासून सावध रहा. त्याच्याजवळ ‘काळी’ विद्या आहे.’’

(क्रमश:)

– श्री. अजित कुलकर्णी, ‘राधेश्याम’ पंडितवाडी समोर, म. गांधी चौक, कल्याण.


लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1037129.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक