US Iran War : इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या सैनिकी तळांची मोठी हानी

लंडन (ब्रिटन) – इराणवरील आक्रमणांना अमेरिका आणि इस्रायल यांनी स्थगिती दिली आहे; मात्र या युद्धात इराणची हानी झाली, तशीच अमेरिकेच्या सैनिक तळांचीही मोठी हानी झाली आहे. या संदर्भात ‘सीएन्एन्’ (केबल न्यूज नेटवर्क) या वृत्तवाहिनीने उपग्रह प्रतिमा आणि प्रत्यक्ष दृश्य यांचा वापर करून प्रसारित केलेल्या वृत्तानुसार अमेरिकेच्या शस्त्रसामुग्रीसमवेतच अत्याधुनिक यंत्रणा अंशतः किंवा पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात इराणला यश आले आहे.

१. इराणने शेजारील अरब देशांमधील अमेरिकेच्या सैनिकी तळांना लक्ष्य करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यामध्ये कुवेत, कतार, बहारिन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यासह ८ देशांमधील किमान १६ सैनिकी तळांची मोठी हानी झाली आहे.

२. कुवेतमधील ‘कॅम्प ब्युरिंग’ हा अमेरिकेचा सैनिकी तळ युद्ध चालू होण्यापूर्वी सैनिकांनी आणि त्यांच्या विविध उपक्रमांनी गजबजलेला असे. तो आता शांत आहे, तिथे कुणीही नाही.

३. कतारमधील ‘अल् उदेद’ वायूदलाच्या तळावर दोनदा आक्रमण करण्यात आले. येथील युद्ध कक्षातून अमेरिका २९ देशांच्या संपर्कात असे. इराणच्या आक्रमणात याही तळाची लक्षणीय हानी झाली. हा कक्ष आता हलवण्यात आला आहे.

४. कुवेतमधील ‘कॅम्प अरिफजान’ या तळावर इराणच्या आक्रमणात डेटा (महिती) पाठवण्यासाठी अत्यावश्यक असलेले अनेक ‘रडार डोम’ उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे हवाई संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक रडार प्रणालीची प्रचंड हानी झाली आहे.

५. उपग्रह प्रतिमांवरून इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आक्रमणे केल्याचे दिसत आहे. त्यात अमेरिकेच्या वायूदलाच्या तळांवर मोठे खड्डे पडले असून बांधकामाची हानी झाली आहे. लढाऊ विमाने आणि अन्य साधनसामुग्री नष्ट झाली किंवा त्यांची मोठी हानी झाली.

६. या घडामोडींची माहिती असलेल्या एकाने ‘सीएन्एन्’ला सांगितले की, मी यासारखी हानी याआधी कधीही पाहिलेली नाही. लक्ष्यांवर वेगाने आणि अचूक आक्रमणे करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

७. इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुल्तान तळावर केलेल्या क्षेपणास्त्र आक्रमणात  अमेरिकेच्या ‘ई-३ सेंट्री एडब्ल्यूएसीएस्’ या लढाऊ विमानाची हानी झाली. त्यात अमेरिकेची ५ लाख डॉलरची (४ कोटी ७४ लाख ५५ सहस्र रुपयांची) हानी झाली.