हिंदूंनी संघटित होऊन भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवायचे ध्येय ठेवून काम केले पाहिजे ! – काजल हिंदुस्तानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

काजल हिंदुस्तानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

कराड, २५ एप्रिल (वार्ता.) – सध्या हिंदु महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. सर्व महिलांनी वज्रमूठ करून या जिहादच्या विरोधात स्वसंरक्षणार्थ लढायला शिकले पाहिजे. आपण ब्राह्मण, मराठा, जाट समजल्यास मूठभर आहोत; पण ‘आपण हिंदू समजल्यास १०० कोटी आहोत’, याची जाणीव आपल्यामध्ये निर्माण करून आपण १ लाख हिंदू देहलीत गेलो, तर विद्यमान सरकारला भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावेच लागेल. आपण वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलो गेलो आहोत. हिंदूंनी संघटित होऊन भारताला हिंदु राष्ट्र बनवायचे ध्येय ठेवून काम केले पाहिजे, असे वक्तव्य गुजरातमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ काजल हिंदुस्तानी यांनी केले. त्या ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने आयोजित शिवजयंती मिरवणुकीच्या सांगता सभेत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

कराडमध्ये प्रतिवर्षी पारंपरिक शिवजयंती निमित्ताने ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठी ‘शाही दरबार मिरवणूक’ काढण्यात येते. मिरवणुकीचा प्रारंभ ‘पांढरीचा मारुति’ येथून होऊन दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीजवळ सांगता झाली. या वेळी व्यासपिठावर ह.भ.प. अनिल देवळेकर महाराज, हिंदु एकता आंदोलनाचे प्रांत अध्यक्ष श्री. विनायक पावस्कर, संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत जिरंगे, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राहुल यादव, भाजप किसान मोर्चाचे श्री. रामकृष्ण वेताळ, तसेच विविध राजकीय, सामाजिक, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मान्यवर, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरबार मिरवणुकीत समाजप्रबोधन करणारे विविध चित्ररथ हे विशेष आकर्षण होते.