वारकरी संप्रदायावर टीका कि राजकीय डाव ?
‘मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वारकर्यांमध्ये फूट पाडणारे एक मोठे वक्तव्य केले. अर्थात् वारकरी सूज्ञ असल्याने पवारांच्या या वक्तव्याला ते भुलले नाहीत; परंतु स्वतःचा कार्यभाग साधल्याविना विषय सोडतील, तर ते पवार कसले ? दोनच दिवसांत त्यांच्या विकास लवांडे या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायातील धर्मांध वारकरी म्हणून २० वारकर्यांची नावे घोषित केली. त्यात अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी आयुष्यभर झटत असलेले संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचीही नावे घेतली. वास्तविक आताच्या काळात हा विषय काढण्याचे काहीच औचित्य नव्हते. काही नवीन विषय आला आहे, असेही नव्हते; परंतु काहीतरी बोलून सनसनाटी निर्माण करायची, शांत वातावरण ढवळून काढायचे, सर्वत्र अस्वस्थता निर्माण करायची आणि त्यातून स्वतःची पोळी भाजून घ्यायची, ही पवारांची नेहमीची पद्धत आहे ! पवारांचे पुरोगामित्व कसे समाजघातकी आहे, हे स्पष्ट करणारे काही तुलनात्मक प्रसंग या लेखात पाहूया.

१. वारकर्यांना पुरोगामी करू पहाणारे ‘टी.सी.एस्.’ किंवा अचलपूर (अमरावती) प्रकरणांत गप्प का ?

शरद पवारांच्या दृष्टीने एखादा धर्माचरण करतो, म्हणजे तो पक्का प्रतिगामी आणि जो नास्तिकतावादी आहे, साम्यवादी आहे, कथित स्त्री स्वातंत्र्याचा उदो उदो करणारा आहे, तो म्हणजे पुरोगामी ! परंतु ‘पवारांचे हेही पुरोगामित्व ढोंगी आहे, भोंदूगिरी करून लोकांना फसवणारे आहे’, हे बुद्धीजीवी लोकांनी लक्षात घ्यायला हवे. आता नुकतेच घडलेले उदाहरण पहा.
अ. ‘टी.सी.एस्.’ या नामांकित आणि बहुराष्ट्रीय आस्थापनात काही जिहादी कर्मचार्यांनी हिंदु महिलांचे शोषण केले.
आ. अचलपूर येथे अयान अहमद या धर्मांधाने १८० मुलींना फसवले.
या भयावह प्रकरणांविषयी पवार किंवा त्यांचे प्रवक्ते यांनी एकतरी वक्तव्य केल्याचे कुणाच्या ऐकण्यात किंवा वाचनात आले आहे का ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी घरचे अन् जवळचे असल्याप्रमाणे पवार त्यांचा उल्लेख अनेकदा एकेरीत करतात. इतका हक्क आहे, तर पवारांनी फडणवीसांना ‘या दोन्ही प्रकरणांत शून्य सहनशीलता बाळगा’, असा सल्ला का दिला नाही ? हा प्रश्न पवारांना कथित स्त्रीमुक्तीसाठी संघर्ष करणार्या अथवा स्त्री स्वातंत्र्यवाल्यांनीच विचारायला हवा. पवार यांना या दोन्ही प्रकरणांविषयी विचारणा करण्याची इच्छा नसल्यास ‘पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या अशा घटना होणे योग्य आहे का ?’, हे तरी पवारांनी स्पष्ट करायला हवे.
२. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे स्वच्छ, तर पवारांच्या शिलेदारांचे भ्रष्ट चरित्र !

पवारांचे प्रवक्ते विकास लवांडे हे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांना धर्मांध वारकरी संबोधतात. खरेतर स्वामीजींचे नाव घेण्याचीही या प्रवक्त्यांची लायकी नाही. या दृष्टीने विचार करता पवारांनी वारकर्यांवर केलेला हा मोठा वारच आहे; कारण प.पू. स्वामी गोविंददेव गिरि हे अजातशत्रू व्यक्तीमत्त्व ! ते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष म्हणून सेवा करत आहेत. श्रीराममंदिर उभारणीच्या प्रक्रियेत अब्जावधी रुपयांची उलाढाल त्यांनी स्वतः केली आणि होतांना पाहिलेली आहे; परंतु त्यांचे चरित्र एकदम निष्कंलक आहे ! कुणाला बोट दाखवायला जागा शिल्लक नाही, तर दुसरीकडे पवारांचे अनुयायी तथाकथित अधर्माचे पाईक आहेत, ज्यांनी देवाचा पैसाही कसा हडपता येईल, याकडे पुरेपूर लक्ष दिले आहे. पवार यांच्या पक्षाचे निस्सीम कार्यकर्ते तथा शरद पवार गटाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार केला; म्हणून त्यांना १४ एप्रिल २०२६ या दिवशी पोलिसांनी अटक केली आहे. अर्थात् उघड झालेले हे काही एक प्रकरण नाही. यापूर्वीही पवारांचे अनेक निस्सीम कार्यकर्ते भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे समोर आले आहे.
३. संतवीर ह.भ.प. बंडातात्या युवकांना व्यसनमुक्त करतात, तर पवार किराणा दुकानात मद्यविक्रीचा विचार करतात !

पवारांच्या धर्मांध वारकर्यांच्या सूचीत दुसरे मुख्य नाव आहे, संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे ! ह.भ.प. बंडातात्यांनी स्वतःची पदरमोड करून अनेक युवकांना व्यसनापासून दूर करून अनेकांची घरे सावरली. यासाठी समाज त्यांचे ऋण कधीही चुकवू शकणार नाही. दुसरीकडे पवारांनी त्यांच्या हाती सत्ता असतांना केवळ महसुलासाठी किराणा दुकानात, मॉलमध्ये दारू विकण्याचा चंग बांधला होता. हा विचार करतांना ‘आपण कितीतरी कुटुंबांना व्यसनाधीन बनवून असंख्य बायकांचे संसार उद्ध्वस्त करून देशोधडीला लावत आहोत’, हा विचार पवारांच्या मनाला शिवला नाही. शरद पवार सत्तेत असतांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी तपस्या केलेला भामचंद्र डोंगर फोडून तेथे ‘डाऊ’ ही रासायनिक कंपनी आणण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यांचे हे षड्यंत्र संतवीर ह.भ.प. बंडातात्या यांनी उलथवून लावले होते. याचा राग मनात ठेवून त्यांना धर्मांध ठरवू पहाणार्या शरद पवारांच्या पक्षाची कीव करावीशी वाटते; कारण ह.भ.प. बंडातात्यांनी युवकांना खर्या अर्थाने वारीचा अर्थ समजावला आणि धर्ममार्गाला लावून व्यसनापासून दूर केले.
४. वारकरी संप्रदायाने केली समाजाची जडणघडण, तर पवारांनी केला समाजाचा विध्वंस !

११ व्या शतकापासून आजतागायत वारकरी संप्रदायातील अनेक धुरिणांनी समाजाला धर्मपरायण करून सन्मार्गाला लावले. एकदा का माळ गळ्यात घातली की, आपसूक तो मनुष्य व्यसनाधीनता त्यागतो, मांसाहार बंद करतो, प्रतिदिन ‘हरिपाठ’ म्हणतो, सदाचरणाने रहातो, इतरांमधील भगवंताकडे पाहून त्याच्यापुढे नतमस्तक होतो. प्रतिवर्षी शेकडो किलोमीटर चालत वारी करतो आणि विठ्ठलाच्या दर्शनाने तृप्त होतो, असा वारकरी पवारांना नको. पवारांना संतांच्या अभंगांची मोडतोड करून तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन करणारा; ब्राह्मण, हिंदु धर्म यांवर सतत टीका करणारा, जातीजातीत फूट पाडणारा, कीर्तनाच्या माध्यमातून बाष्कळ विनोद करून धर्महानी करणारा, मद्य-मांसाच्या आहारी गेलेला असा पुरोगामी वारकरी अपेक्षित आहे. असे असेल, तर वारकर्यांनीच आता पवारांच्या या कुटील कारस्थानाला संघटितपणे उत्तर द्यायला हवे. पवार जेथे जातील, तेथे फूट पाडण्याचेच काम अधिक चांगल्या प्रकारे करत आले आहेत. आधी त्यांनी ‘ब्राह्मण-बहुजन वाद’ निर्माण केला, नंतर राष्ट्रप्रेमी मराठा समाजातही तेढ निर्माण केली. ते कोणत्याच राजकीय पक्षाशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत. आता शेवटी त्यांच्या पक्षात तेच सर्वेसर्वा असल्याने त्यांना तो पक्ष सोडून जाता येत नाही, अन्यथा त्यांनी तेही केले असते.
त्यामुळे वारकर्यांनी त्यांच्या वक्तव्याला भुलता कामा नये. पवारांनी आता केलेले वारकरी संप्रदायाविषयीचे भाष्य, म्हणजे केवळ वारकर्यांवर नाही, तर हिंदु धर्मावर त्यांनी केलेला मोठा वार आहे, हे सूज्ञ हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. ‘भविष्यातील सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला घरी बसवणे, हा निश्चय करून वारकर्यांनी प्रतिवार करणे’, ही काळाची आवश्यकता आहे. इंग्रजांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी ‘फोडा आणि झोडा’, ही नीती वापरली, तसाच भाग शरद पवार करत आहेत. लक्षात घ्या, ‘आता नाही, तर कधीच नाही, अन्यथा काळ सोकावेल’, हे नक्की !’
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (२०.४.२०२६)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !