(‘युआन’ : चीनचे चलन आणि ‘डॉलर’ : अमेरिकेचे चलन)
पश्चिम आशियातील भू-राजकीय नकाशावर जेव्हा जेव्हा तणाव निर्माण होतो, तेव्हा त्याचे पडसाद केवळ रणांगणावर उमटत नाहीत, तर जागतिक शेअर बाजार (समभाग विक्री बाजार) आणि तेल विहिरी यांच्या अर्थकारणावरही उमटतात. अलीकडेच अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविरामामुळे कच्च्या तेलाचे दर स्थिरावले असले, तरी हे शांततेचे वरवरचे चित्र आहे. पडद्यामागे एक अत्यंत सूक्ष्म; पण तितकेच शक्तीशाली युद्ध चालू झाले आहे ते, म्हणजे ‘चलन वर्चस्व’.
एकेकाळी तोफा आणि विमान यांच्या आधारे लढली जाणारी युद्धे आता ‘पेट्रोयुआन’ आणि ‘पेट्रोडॉलर’ यांसारख्या आर्थिक शस्त्रांच्या जोरावर खेळली जात आहेत. ‘जगाच्या ऊर्जेची नाडी ज्याच्या हातात, त्याचेच जागतिक राजकारणावर नियंत्रण’, हे समीकरण आता अधिक स्पष्ट होत आहे. या संघर्षाच्या केंद्रस्थानी चीनचे महत्त्वाकांक्षी पाऊल आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसमोर असलेली ‘पेट्रोरुपी’ची संधी अन् आव्हाने यांचा वेध घेणे आवश्यक आहे.

१. ‘पेट्रोडॉलर’चा इतिहास आणि अमेरिकेचा एकछत्री प्रभाव
जागतिक अर्थव्यवस्थेत ‘पेट्रोडॉलर’ या शब्दाचा उदय १९७० च्या दशकात झाला. जेव्हा अमेरिकेने सौदी अरेबियाशी करार करून तेलाचा व्यापार केवळ डॉलरमध्येच होईल, याची खात्री केली, तेव्हापासून डॉलर हे जागतिक ‘रिझर्व्ह करन्सी’ (चलनी साठा) बनले. ‘तेल विकत घ्यायचे असेल, तर डॉलर हवाच’, या अपरिहार्यतेमुळे जगातील प्रत्येक देशाला डॉलरचे साठे करणे भाग पडले. यामुळे अमेरिकेला २ मोठे लाभ झाले –
अ. आर्थिक : अमेरिकेला स्वतःच्या चलनाची प्रचंड मागणी कायम ठेवता आली.
आ. सामरिक : ज्या देशाला धडा शिकवायचा आहे, त्याला डॉलरच्या प्रणालीतून बाहेर काढून (उदा. निर्बंध लावून) अमेरिका कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकू शकते.
२. ‘पेट्रोयुआन’ : चीनचे डॉलरला प्रत्युत्तर
चीन आज जगातील सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे. साहजिकच आपण ज्या तेलासाठी पैसे मोजतो, ते आपल्याच चलनात असावे, ही चीनची धारणा आहे. ‘पेट्रोयुआन’ ही संकल्पना, म्हणजे डॉलरच्या मक्तेदारीला दिलेली थेट टक्कर आहे.

३. निर्बंधांचा लाभ
रशिया, इराण आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या देशांना डॉलरमध्ये व्यापार करणे अशक्य असल्याने चीनने त्यांना ‘युआन’चा पर्याय दिला आहे.
४. पडद्यामागची कूटनीती
अमेरिका-इराण युद्धविरामात चीनची भूमिका महत्त्वाची होती. चीनला पश्चिम आशियात शांतता हवी आहे; कारण शांतता असेल, तरच त्यांचे ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्प (आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडातील विविध देशांना जोडणारा प्रकल्प) आणि युआन आधारित व्यापार सुरक्षित राहील.
५. भारताची भूमिका : ‘पेट्रोरुपी’ची स्वप्नपूर्ती कि केवळ कल्पनाविलास ?
चीन ज्याप्रमाणे युआनचा आग्रह धरत आहे, तसाच प्रश्न भारतासमोरही उभा ठाकतो. भारत कच्च्या तेलासाठी ‘रुपी’ (रुपया) वापरू शकतो का ? यालाच आपण ‘पेट्रोरुपी’ असे संबोधू शकतो.
अ. भारताने केलेला प्रारंभ : रशिया-युक्रेन युद्धानंतर जेव्हा पाश्चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, तेव्हा भारताने सवलतीच्या दरात तेल खरेदीचे व्यवहार करतांना ते रुपयांत करण्याचे प्रयत्न केले. ‘व्होस्ट्रो’ आणि ‘नोस्ट्रो’ खात्यांच्या माध्यमातून रशियाशी झालेला हा व्यवहार ‘पेट्रोरुपी’च्या दिशेने पडलेले पहिले पाऊल होते, तसेच संयुक्त अरब अमिराती (यूएई)सह भारताने रुपयांत व्यापारासाठी करार केले आहेत.
आ. ‘पेट्रोरुपी’साठी आवश्यक पावले : केवळ इच्छाशक्ती असून चालणार नाही, तर त्यासाठी भारताला काही मूलभूत सुधारणा कराव्या लागतील.
आ १. रुपयाची स्वीकारार्हता : तेल उत्पादक देशांनी रुपया का घ्यावा ? त्यांच्याकडे जमा झालेल्या रुपयांच्या साठ्याचे ते काय करणार ? यासाठी भारताला स्वतःची निर्यात वाढवावी लागेल, जेणेकरून त्या देशांना भारतीय वस्तू (उदा. अन्नधान्य, औषधे, संगणकीय प्रणाली) खरेदी करण्यासाठी तो रुपया वापरता येईल.
आ २. गुंतवणुकीचे पर्याय : आखाती देशांना त्यांच्याकडील रुपया भारतात गुंतवण्यासाठी ‘गिफ्ट सिटी’सारख्या जागतिक दर्जाच्या आर्थिक केंद्रांची उपलब्धता करून द्यावी लागेल.
६. आव्हाने आणि मर्यादा
भारतीय रुपया ‘पेट्रोडॉलर’ किंवा ‘पेट्रोयुआन’ यांना थेट आव्हान देऊ शकतो का ? याचे उत्तर ‘सध्या तरी नाही’, असे आहे. त्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत –
अ. पूर्ण परिवर्तनीयता (कन्व्हर्टॲबिलीटी) : डॉलर आणि युआन यांच्या तुलनेत रुपया जागतिक बाजारात पूर्णपणे मुक्त नाही. रिझर्व्ह बँकेचे त्यावर नियंत्रण असते, जे स्थैर्यासाठी चांगले असले, तरी जागतिक व्यापारासाठी मर्यादा ठरते.
आ. चीनची उत्पादन क्षमता : चीनकडे जगाचा कारखाना आहे, त्यामुळे युआन घेणार्या देशाकडे चीनमधून खरेदी करण्यासाठी सहस्रो पर्याय असतात. भारताला स्वतःची उत्पादन क्षमता त्या स्तरावर न्यावी लागेल.
इ. भू-राजकीय संतुलन : अमेरिकेने नेहमीच त्याच्या चलनात अडथळा आणणार्यांना प्रत्युत्तर दिले आहे (उदा. गडाफी किंवा सद्दाम हुसेन यांचे प्रयत्न). भारताला अमेरिकेचा रोष ओढवून न घेता स्वतःचे ‘पेट्रोरुपी’चे धोरण अत्यंत सावधगिरीने पुढे न्यावे लागेल.
७. भविष्यातील रणनीती : भारताचा मार्ग
भारताने ‘पेट्रोरुपी’चा वापर करतांना केवळ एकाच चलनावर अवलंबून न रहाता ‘बहुचलनी’ धोरण स्वीकारणे हिताचे ठरेल.
अ. द्विपक्षीय करार : रशिया, इराण आणि आखाती देश यांच्याशी अधिकाधिक व्यापार रुपयांत करणे.
आ. डिजिटल चलन (ई-रुपी) : भारताच्या ‘सीबीडीसी’ तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय व्यवहार जलद आणि स्वस्त करणे.
इ. ऊर्जा सुरक्षा : पेट्रोल आणि डिझेल यांच्यावरील अवलंबित्व न्यून करून ‘हायड्रोजन’ आणि ‘सौर ऊर्जा’ क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे, जेणेकरून चलनाची चिंताच उरणार नाही.
८. निष्कर्ष
जागतिक अर्थव्यवस्था सध्या एका संक्रमण काळातून जात आहे. ‘एकध्रुवीय’ जगाकडून आपण ‘बहुध्रुवीय’ जगाकडे वाटचाल करत आहोत. अशा वेळी ‘पेट्रोडॉलर’चे वर्चस्व एकदम संपणार नाही; पण त्याला ‘पेट्रोयुआन’ आणि भविष्यात ‘पेट्रोरुपी’च्या माध्यमातून शह दिला जाईल, हे निश्चित !
भारतासाठी ‘पेट्रोरुपी’ हे केवळ चलन नसून ते आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. जर भारताने स्वतःची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन (एकावर १२ शून्य) आणि त्यानंतर १० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेली, तर भारतीय रुपयाची शक्ती नैसर्गिकपणे वाढेल. तेल युद्धातून चालू झालेला हा प्रवास शेवटी ‘ज्याची अर्थव्यवस्था मजबूत त्याचेच चलन टिकेल’, या न्यायाने संपेल. भारताने या ‘चलन युद्धात’ स्वतःची स्वायत्तता राखणे, हेच आगामी दशकातील सर्वांत मोठे राजनैतिक यश असेल.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (१९.४.२०२६)
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?