आजचे आधुनिक जग एका विचित्र विरोधाभासातून जात आहे. एका बाजूला मानवजातीने वैद्यकशास्त्र, अक्षय्य ऊर्जा आणि डिजिटल संपर्काच्या साधनांमध्ये अभूतपूर्व प्रगती केली आहे. आपण अशा भविष्याकडे वाटचाल करत आहोत, जिथे कशाची कमतरताच नसेल. दुसरीकडे एक काळोखी बाजूही समोर येत आहे. या प्रगतीचा वापर एकमेकांचा नाश करण्यासाठी अधिकाधिक पुढचे मार्ग शोधण्यासाठी केला जात आहे. मानवी बुद्धीमत्तेचे इंजिन आता सामूहिक उत्थानासाठी नाही, तर भूमी, सत्ता आणि वर्चस्व गाजवण्याच्या लोभाने धावत आहे.

१. प्रगतीचा उपयोग संहारक क्षमता वाढवण्यासाठी
आता तांत्रिक प्रगती केवळ सामान्य जनतेच्या लाभाच्या दृष्टीने मोजली जात नाही, तर संरक्षण क्षेत्रातील संहारक क्षमतेवर तिची किंमत ठरत आहे. ज्या उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर जागतिक दळणवळणासाठी (नेव्हिगेशनसाठी) व्हायला हवा, त्याचा वापर अचूक क्षेपणास्त्र डागण्यासाठी प्राधान्याने केला जात आहे. इतरांवर सत्ता गाजवण्याच्या या हव्यासाने जगात संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. आता राष्ट्रे केवळ स्वतःच्या प्रगतीवर समाधानी नाहीत; तर शेजारी देशांची पिछेहाट होण्यात स्वतःची वाढ शोधत आहेत.
चीन हे विस्तारवादी प्रगतीचे एक ढळढळीत उदाहरण आहे. चीनने पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली आहे. त्या प्रगतीचा वापर शेजारी देशांची भूमी बळकावणे आणि सागरी सीमांवर अतिक्रमण करणे, यांसाठी होत आहे. प्रादेशिक वर्चस्वाची भूक भागवण्यासाठी शेजार्यांना धमकावणे, हा त्यांचा मार्ग झाला आहे. येथे प्रगती हे अतिक्रमणाचे साधन बनले असून आर्थिक यशाचा वापर प्रादेशिक विस्ताराच्या शस्त्रासारखा केला जात आहे.
२. आर्थिक प्रगती इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी
अमेरिका या प्रवृत्तीचा एक वेगळा पैलू मांडते. अमेरिकेची प्रगती अनेकदा जागतिक व्यापार करारांवर वर्चस्व मिळवण्यासाठी वापरली जाते. अमेरिकेच्या आर्थिक प्रभावाचा वापर ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून केला जातो. या परिस्थितीत प्रगतीचा वापर इतरांना स्वतःवर अवलंबून ठेवण्यासाठी केला जातो. येथे उद्देश परस्पर लाभदायी जागतिक बाजारपेठ नसून व्यापार क्षेत्रात एकहाती सत्ता मिळवणे, हा आहे. या हव्यासात विकसनशील देश स्पर्धेत टिकण्यासाठी संघर्ष करत आहेत.
३. संसाधनांची उभारणी नाही, लष्करी साहित्यावर खर्च !
या दुटप्पी प्रगतीचे सर्वांत क्लेशदायक उदाहरण पाकिस्तान ! इतरांच्या लष्करी प्रगतीशी बरोबरी करण्याच्या अट्टाहासात हा देश स्वतःची मर्यादित संसाधने संरक्षणक्षमता मजबूत करण्यासाठी व्यय करत आहे. त्याच वेळी त्यांचा आर्थिक पाया कोसळत चालला आहे. उत्पादक आर्थिक वाढ शून्य आहे; पण लष्करी बजेट मात्र महत्त्वाचे मानले जाते. यालाच ‘अस्तित्वाचा सापळा’ म्हणतात, जिथे दुसर्याच्या भीतीपोटी स्वतःमध्ये कोणतीही अर्थपूर्ण गुंतवणूक करणे अशक्य होते. जेव्हा एखादे राष्ट्र तरुणांच्या शिक्षणाऐवजी शेजार्याच्या विनाशावर लक्ष केंद्रित करून प्रगतीचा प्रयत्न करते, तेव्हा त्या देशाची अवस्था आतून पोखरलेल्या वास्तूंसारखी होते.
४. संरक्षण उद्योग – जगातील सर्वांत लाभदायी उद्योग
आजची जागतिक भावना एका ‘झिरो-सम गेम’कडे (एक जिंकला, तर दुसरा हरणारच आहे) वळली आहे. ‘एका राष्ट्राचा उदय होण्यासाठी दुसर्याचा पाडाव होणे आवश्यक आहे’, हा तर्क रूढ झाला आहे. या मानसिकतेने संरक्षणक्षेत्राला जगातील सर्वांत लाभदायी उद्योग बनवले आहे. आखाती प्रदेश आणि पूर्व युरोपमध्ये तणाव वाढत आहे. अशा वेळी अधिक कमाई करण्याचा हव्यास, हा शांतता चर्चेलाही केवळ शस्त्रसाठा वाढवण्याची एक विश्रांती मानतो. आपल्याकडे हवामान पालट आणि भूक यांसारख्या समस्या सोडवण्याची साधने आहेत, तरीही आपण प्रतिवर्षी २.७ ट्रिलियन डॉलर्स (एकावर १२ शून्य) मृत्यूनंतर कराव्या लागणार्या सोयींसाठी यंत्रणा उभारण्यासाठी व्यय करत आहोत.
प्रगतीचा खरा अर्थ सर्वांसाठी स्थिर आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करणे, असा हवा. जोपर्यंत जागतिक महासत्ता शाश्वत अंतर्गत वाढीपेक्षा भूमी बळकावणे, व्यापारावर वर्चस्व गाजवणे आणि शस्त्रागार उभारणे याला प्राधान्य देतात, तोपर्यंत ‘प्रगती’ ही दुधारी तलवार, जी एका हाताने घडवते आणि दुसर्या हाताने उद्ध्वस्त करते. आपण ज्या मार्गावर आहोत, त्यावरून असे वाटते की, मानवजातीला निसर्गाचे भागीदार होण्यापेक्षा ‘स्मशानाचा मालक’ होण्यात अधिक रस आहे.
– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (१८.४.२०२६)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !