राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाची अपकीर्ती केल्याचे प्रकरण
जगद्गुरु संत तुकोबारायांचा एक अतिशय संवेदनशील अभंग आहे. त्यात त्यांनी वरील प्रश्न विचारला आहे. त्याला कारण असे की…,‘एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥’, (ज्ञानेश्वरी, अध्याय ३, ओवी १३८) या न्यायाने आम्ही विष्णुदास परंपरेने आमचा भक्तीमार्ग शांतपणे चालवत असतांनाही समाजातील काही विचारसरणीने नष्ट, दुष्ट आणि दुराचारी असे लोक विनाकारण आमच्या मागे लागून आमची निंदा का बरे करतात ? आमचा त्यांचा काय संबंध…? संत तुकोबाराय म्हणतात, ‘मुळात आम्ही कुणाकडूनही कधीच अपेक्षा करत नाही. कुणी आम्हाला साहाय्य करावे, हे तर सोडाच, कुणी आमची स्तुतीसुमने गावीत, हीसुद्धा आमची अपेक्षा नाही. आम्ही भले आणि आमचा वारकरी संप्रदाय भला ! पण तरीही जाणीवपूर्वक का बरे काही लोक सतत आणि सतत आमची निंदानालस्ती करण्यात प्रवृत्त होतात ? तेव्हा उद्विगनपणे संत तुकोबारायांच्या मुखातील हे उद्गार आहेत की…
नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणांची ॥
कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥
ही अभंगवाणी आठवण्याचे कारण, म्हणजे देशाचे ‘जाणते’ नेते थोरले पवार (शरद पवार) यांनी नुकतेच एका लेखाच्या माध्यमातून ‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणी लोकांची घुसखोरी झाली आहे’, असे सांगून अगदी त्यांनी संप्रदायातील महिला प्रबोधनकारांनासुद्धा प्रतिगामी ठरवत एकूणच वारकरी संप्रदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा ‘निष्फळ’ प्रयत्न केला आहे. (प्रयत्न केला आहे; मात्र तो ‘निष्फळ’ आहे, हे मुद्दाम प्रारंभीलाच सांगितलेले बरे !)
(पूर्वार्ध)

१. शरद पवार यांची वारकरी संप्रदायावरील टीका निराशेपोटी
वरवर पहाता जरी ही एका ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी केलेली टिकाटिपणी किंवा वादग्रस्त वक्तव्य किंवा पवार यांनी एखाद्या घटनेवरून संप्रदायाला लक्ष्य केले आहे, असे वाटत असले, तरी असे काहीही नसून ज्या वैचारिक चळवळीचे आपण अनेक दशके नेतृत्व केले, त्या पुरोगामित्वाच्या नावाखाली चालवलेल्या विद्रोही / नास्तिक चळवळीची होत असलेली वाताहत पाहून ते अतिशय अस्वस्थ असल्याने त्यांनी केलेले लेखन हे अत्यंत निराशेपोटी आहे.
२. समाजाला नास्तिकतेच्या वाटेवर बळजोरीने आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील; पण अपयशामुळे नैराश्यग्रस्त

आस्तिक आणि नास्तिक अर्थात् या जगतात ईश्वराचे अस्तित्व मान्य करणारा आणि न करणारा दोन्ही समाज सहस्रो वर्षांपासून त्यांच्या पद्धतीने ‘स्वतःचे मत कसे योग्य आहे’, याचा प्रचार करतांना दिसतो. मुळात सूक्ष्म निरीक्षण केले, तर बहुतांश लोकांना ईश्वराचे अस्तित्व मान्य आहे आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने आचरण करतात. महर्षि व्यास वाल्मीकि, संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय आणि संत तुकोबाराय आदी सकल साधूसंतांपासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यापर्यंत हे सर्व आदर्श लोकांच्या डोळ्यांसमोर असल्याने त्यांना वेगळा प्रचार करावा लागला नाही; मात्र सहस्रो वर्षांपासून आजपर्यंत कायमच ज्यांचे अस्तित्व नगण्य राहिले आहे, त्या नास्तिकवाद्यांना कायम ते टिकवून ठेवण्यासाठी प्रचार करण्यासाठी झगडावे लागले आहे. चार्वाक हा यांचा आदर्श राहिलेला आहे. अलीकडे विवेकवाद किंवा अंधश्रद्धा निर्मूलन या नावाखाली हिंदु धर्मीय देवीदेवतांचा अवमान करणारी काही नावे मात्र आता लोकांच्या फारशी लक्षातही नसल्याने यांचे अस्तित्व शून्य आहे.
अगोदरच अशा लोकांची अल्पसंख्यांकता आणि अपुरी शक्ती यांमुळे बहुतांश ईश्वरनिष्ठ असलेल्या समाजाला ‘ईश्वर नाही’, असे सांगणे फार कठीण होते. मग ते काय करतात, त्यातील सर्वसामान्य लोक ज्यांना त्यांच्या जीवनात येणार्या अडचणींवर उपाय सापडत नाहीत किंवा ज्यांना ईश्वरनिष्ठ समाजामध्ये दुर्दैवाने दुजाभावाची, सापत्नपणाची वागणूक मिळाली असेल, अशांना लक्ष्य करत आणि सहानुभूती दाखवत वरून ‘पुरोगामित्वा’चा बुरखा पांघरून त्या लोकांना ‘विद्रोह, तसेच बंड केल्याने तुमचे प्रश्न सुटतील’, असे भासवून त्या आडून नास्तिकवादापासून अतिशय वाईट अशा नक्षलवादापर्यंतच्या विचारसरणीवर आणून अक्षरशः भ्रमित करण्याचे पाप करत समाजाला नास्तिकतेच्या वाटेवर बळजोरीने आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात; पण एवढे करूनही थोडेफारच लोक यामध्ये फसतात. त्यामुळे त्यांना म्हणावेसे ईप्सित साध्य होत नसल्याने ते सतत नैराश्यग्रस्त असतात.
३. वारकरी संप्रदाय हा साम्यवादी विचारसरणीच्या लोकांच्या कामातील सध्याचा सर्वांत मोठा अडथळा !
आता इथे दुसरा प्रकार चालू होतो तो, म्हणजे यांच्या प्रयत्नांना यश का येत नाही ? तर वारकरी संप्रदायासारखी ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ समाजाला विवेकाची शिकवण देते. ‘उठा उठा साधुसंत साधा आपुले हित । गेला गेला हा नरदेह मग कैंचा भगवंता ॥ – संत नामदेव महाराज’, हे सांगतांना माणूस म्हणून तुमचे पहिले कर्तव्य भगवद्भक्ती आहे. दुसरे तुमच्या वाट्याला आलेल्या उदरनिर्वाह कर्माप्रमाणे वाटचाल करावी. तुम्हाला तुमचे खरे हित संसार-पैसा-मालमत्ता यांत नसून एकदाच मिळालेल्या या मानव जन्माचा उपयोग चराचरामध्ये ईश्वर अस्तित्वाचा साक्षात्कार व्हावा. अंततः विठ्ठल जळीस्थळी भरला आहे, ही वृत्ती होऊन तुम्ही सर्व मनुष्य मात्रच काय ‘भुतां परस्परे जडो मैत्र जीवांचे ।’, इथपर्यंत नेण्याचा इतका उदात्त विचार (विवेक) समाजाच्या मनात निर्माण करणारा वारकरी संप्रदाय हा या साम्यवादी विचारसरणीच्या लोकांच्या कामातील सध्याचा सर्वांत मोठा अडथळा आहे; कारण नुसती भक्ती नाही, तर प्रापंचिक जीवनात येणार्या अडचणींवरसुद्धा ‘ठेविले अनंते तैसिची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥’ (तुकाराम गाथा) किंवा ‘समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैंसे रहावें ॥ – संत सावतामाळी महाराज’, असा उपदेश करत कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यासाठी समाजाला वारकरी संप्रदाय हा मानसिकदृष्ट्या सक्षम करतो.
अगदी याचाच परिपाक म्हणून मागे केलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जटील प्रश्न असणारा शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचे अन्वेषण केले असता यात वारकरी शेतकर्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आलेले आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय हा जशी भक्ती शिकवतो, तसा सांप्रत काळात सगळा समाज ज्या मनःस्वास्थ्यासाठी वा सुख-समाधानासाठी तळमळतो आहे, ते सुख समाधान आहे त्या परिस्थितीत शोधण्याचा मंत्र वारकरी संप्रदाय देत आहे. त्यामुळे समाजाच्या परिस्थितीचा लाभ घेऊन आपल्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्नशील समाजघातकी नास्तिकवाद्यांना संप्रदायाचा फार मोठा दुस्वास वाटतो.

४. नास्तिक चळवळीच्या प्रचंड अपयशाच्या वैफल्यग्रस्ततेतून टीकाटिपणी !
हिंदु धर्मात इतरही उपासना पंथ आहेत; मात्र त्या सर्व उपासना पंथांची त्यांचे अनुयायी वा अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड चालू आहे. असे असतांना सर्वसामान्य लोकांचा समावेश असणारा, ‘सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेऊनी नाचा ॥ – संत तुकाराम महाराज’, हे भक्तीचे सोपे वर्म सांगणारा; मात्र उपासना पंथाचा कोणताही ठरवून प्रसार न करणार्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी मात्र सहस्रोंच्या संख्येने वाढतच आहेत. त्यामुळे एखाद्या भूताच्या हातून त्याचे सावज सुटल्यानंतर ते ‘माझे खाद्य गेले, माझे खाद्य गेले !’, असा आक्रोश करते, तीच अवस्था समस्त पुरोगामी म्हणवणार्या; पण समाजात पूर्णतः नास्तिकता पसरवण्याचा उद्देश असणारी मंडळी प्रचंड अस्वस्थ आहेत. ही मंडळी आपण ज्यांच्या आधारे इतके दिवस अस्तित्वासाठी धडपड केली, त्या म्होरक्यालाच (शरद पवार) ‘आता आपले कसे होणार’, असे म्हणून भोकाड पसरत आहेत आणि आपल्या या सर्व लोकांची गलितगात्र अवस्था पाहून हतबल असणारे या सर्वांचे आश्रयदाते ‘जाणते’ साहेब आता मात्र चळवळीच्या प्रचंड अपयशाच्या वैफल्यग्रस्ततेतून ही टीकाटिपणी करत स्वतःसह त्यांच्या विचारांच्या लोकांची दूरवस्था होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरत असलेल्या वारकरी संप्रदायावर तोंडसुख घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
५. निर्वाणीचा उपाय म्हणून राळ (आरोप) उठवण्याचा प्रयत्न
अपेक्षित असे यश मिळाले नाही. काही बोटावर मोजण्याएवढ्या पुरोगामित्वाच्या झालरीतून नास्तिकवादाचा विषारी प्रचार करणारे लेखक, लेखिका आणि साहित्यिक सिद्ध झाले. साहित्य संमेलनातून फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्यात सगळी साम्यवादी विचारांची लोक पेरली; पण त्यातूनही सकल समाज आस्तिकतेचा उजव्या विचारसरणीचा त्याग करण्याच्या मानसिकतेत येईना. उलट साहित्यिकांच्या सर्वोच्च संस्था आता यांच्या हातातून निसटून हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या लोकांकडे जातांना उघड्या डोळ्यांनी पहाण्याखेरीज हतबल असणारे शरद पवार दुसरे काहीच करू शकत नाहीत. असे अनेक साम्यवादी नास्तिक विचारांचे गड गेल्या अनेक वर्षांत उद्ध्वस्त झाले आहेत; पण ‘जाणते’ असल्यामुळे आता निर्वाणीचा उपाय म्हणून ‘किसीका काम खराब नहीं कर सके तो उसका नाम खराब करो’, ही नीती वापरत ‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे’, अशी राळ त्यांनी उठवली आहे. याचे खरेतर एका दृष्टीने हसू येत आहे; पण एका दृष्टीने वाईटही वाटत आहे की, ‘खळांची व्यंकटी सांडावी’ म्हणून वारकरी संप्रदाय प्रयत्न करत आहे, ते ‘खळ’ (दुष्प्रवृत्ती) स्वतःच्या राजकीय आणि मनुष्य जन्माच्या शेवटच्या टप्प्यातसुद्धा स्वतःचा खळपणा सोडायला सिद्ध नाहीत; मात्र वारकरी संप्रदाय पुष्कळ पराकोटीचा आशावादी आहे. ‘एक तास उरला खट्वांगरायासी’ (आयुष्याच्या शेवटच्या क्षणी केलेल्या भक्तीचे महत्त्व) या न्यायाने ‘कधीतरी शेवटी शरद पवार हे खळपणाचा त्याग करून ईश्वर अस्तित्व मान्य करतील’, यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत !
आता या सर्व घडलेल्या प्रसंगातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची उकल करण्याचा प्रयत्न येथे करत आहे.
(क्रमशः)
– श्रीगुरुचरणपदाश्रीत ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, संत साहित्य अभ्यासक, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (१९.४.२०२६)
उत्तरार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1032741.html
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !