राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाची अपकीर्ती केल्याचे प्रकरण
नुकतेच देशाचे ‘जाणते’ नेते थोरले पवार (शरद पवार) यांनी एका लेखाच्या माध्यमातून ‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणी लोकांची घुसखोरी झाली आहे’, असे सांगून अगदी त्यांनी संप्रदायातील महिला प्रबोधनकारांनासुद्धा प्रतिगामी ठरवत एकूणच वारकरी संप्रदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा ‘निष्फळ’ प्रयत्न केला आहे. (प्रयत्न केला आहे; मात्र तो ‘निष्फळ’ आहे, हे मुद्दाम प्रारंभीलाच सांगितलेले बरे !) २२ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘शरद पवार यांची वारकरी संप्रदायावरील टीका निराशेपोटी, वारकरी संप्रदाय साम्यवादी विचारसरणीच्या लोकांच्या कामातील सध्याचा सर्वांत मोठा अडथळा आणि निर्वाणीचा उपाय म्हणून वारकरी संप्रदायावर राळ (आरोप) उठवण्याचा प्रयत्न’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.
(उत्तरार्ध)
पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1032438.html
१. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायासाठी कार्य केल्याचा दावा ?
पवार यांनी देशस्तरावर राजकारण केले आहे, राज्याचे तर ते मुख्यमंत्री होते. या कालावधीत शासनकर्ते म्हणून वारकर्यांना शासकीय नियमांच्या चौकटीत बसणारे रस्ते – पाणी अगदी वारकरी शिक्षण संस्थेला दिलेली देणगी ही ‘विद्यार्थी वसतीगृह’ या नियमात त्यांनी दिलेली आहे अन् शासनकर्ते म्हणून त्यांचे ते कर्तव्यच होते. आता खरोखरच पवार हे जर संप्रदायावर मेहेरबान होते, तर श्रीक्षेत्र आळंदीला इंद्रायणी तिरावर जे आज भव्यदिव्य घाट दिसत आहेत, ते घाट बांधण्यासाठी प्रयत्नशील असणार्या मंडळींना निधी देण्यास स्पष्ट नकार पवारांनी दिला होता; पण पुढे सर्वसामान्य वारकर्यांच्या देणगीतून ते काम पूर्ण झाले. याचाच अर्थ शरद पवारांनी अनेक कामे राजकारणाच्या चौकटीबाहेर जाऊन केली; मात्र वारकरी संप्रदायाला कधीही चौकटीच्या बाहेर जाऊन साहाय्य केले नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसून येते.
२. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे का ?
वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली असेल, तर ती धर्मजागृतीचा संदेश देणार्यांची; कारण ‘धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ।।’ किंवा ‘धर्माचे पालन । करणे पाखंडखंडण ।।’ आणि ‘संतांच्या विभूती । धर्मालागी अवतरती ।।’, हे अभंग संतांनी रचलेले असल्याने संतांना धर्मजागृती मान्यच आहे. आता ‘घुसखोरी’ या अर्थाने म्हणाल, तर बळजोरीने काही लोक नक्कीच संतवाङ्मयांचे स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावून वारकरी संप्रदाय कसा सर्वधर्मममभाव मानणारा आहे, तो कसा निधर्मी आहे, ‘हिंदु धर्माचा आणि संप्रदायाचा काही संबंध नाही’, असे खोटे कथानक सिद्ध करणारी अन् पुरोगामित्वाचा मुखवटा घालून काही मंडळी घुसली आहेत, हे मात्र खरे आहे. त्यामुळे शरद पवार यांनी एखादी सूची करण्यापेक्षा आमच्याकडे अशा पुरोगामी घुसखोरांची सूची सिद्धच आहे, ती यथावकाश आम्ही प्रसिद्ध करूच !

३. वारकरी संप्रदाय हिंदु धर्माधिष्ठितच !
वारकरी संप्रदाय हा हिंदु धर्मात जे अनेकविध उपासना पंथ आहेत, त्यातील वैष्णवांचा पंथ आहे. या पंथाचे प्रस्थानत्रयी मानले जाणारे ग्रंथ
अ. ‘ज्ञानेश्वरी’ (भगवद्गीता विवेचन)
आ. ‘तुकाराम गाथा’ (चहुवेदांचे केलेसे विवरण)
इ. ‘एकनाथी भागवत’ (श्रीमद्भागवत एकादश स्कंध)
हे तीनही ग्रंथ हिंदु धर्मातील श्रेष्ठ ग्रंथाधारानेच आहेत. अगदी जगद्गुरु संत तुकोबारायांनी ‘पाहिली पुराणे । धांडोळली दर्शने ।।’, असेच म्हटले आहे, कुठेही इतर धर्माच्या ग्रंथांचे नावही घेतले नाही. रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पंचपर्वकाळ, एकादशी आणि सोमवार ही अखंड व्रते कोणत्या धर्मानुसार आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा हिंदु धर्माधिष्ठितच आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
४. ‘सर्वधर्मसमभावा’च्या ऐवजी ‘सर्वधर्मममभाव’
एक असा दावा केला जातो की, वारकरी संप्रदायाच्या संतांनी कोणत्याही इतर धर्माचा धिक्कार केला नाही. हे मात्र अर्धसत्य आहे. गोष्ट अशी की, ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पनाच वारकरी संप्रदायाला मान्य नाही; मात्र ‘सर्वधर्मममभाव’ मानणारा संप्रदाय आहे. ‘या रे या रे लाहान थोर । याती भलते नारीनर ।।’ (संत तुकाराम महाराज) हे म्हणत असतांना विठ्ठल भक्तीसाठी कुणालाही अडवलेले नाही, तर सर्वांचे स्वागत केले आहे; मात्र याचा अर्थ असा नाही, ‘संत कबीर, मोमीन लतीफ हे मुसलमान विठ्ठल भक्त झाले; म्हणून वारकरी संप्रदाय निधर्मी झाला.’ हा तर्क नव्हे, कुतर्क आहे. उलट संत कबीर मुसलमानांना उद्देशून म्हणतात, ‘मुल्ला होकर बांग पुकारे युं क्या साहिब बहिरा है ।’, (मोठमोठ्याने बांग कशाला देता आपला देव काय बहिरा आहे का ? असा सारांश) हे सांगितले जात नाही. उलट या सर्वांना रामभक्ती-कृष्णभक्ती-विठ्ठलभक्ती आवडल्याने आपल्या मूळ धर्मात ते परत आले आहेत, हे सत्य आहे. दुसरी गोष्ट देव, देश आणि धर्म या विषयांवर संत कधीही तडजोड करत नाहीत अन् तडजोड करणार्यांना ते झापल्याखेरीज रहात नाहीत. आपल्या समोर एवढे देव आणि संतमहात्मे असतांना त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे सोडून दर्गा आणि कबरी यांना देव मानणार्यांना संत तुकाराम महाराज म्हणतात…
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ।। १ ।।
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ।। धृ. ।।
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ।। २ ।।
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ।। ३ ।।
आपल्या स्वार्थापोटी संतांऐवजी मुसलमानाला देव मानणार्यांना संत तुकोबाराय म्हणतात, अशा माजलेल्या लोकांना धर्म आणि अधर्म काहीच कळत नाही; कारण ते अज्ञानामध्ये जगत असतात. यापेक्षा आता अजून धर्माविषयी काय स्पष्ट भूमिका हवी ?
‘सर्वांप्रती आमचा ममत्वभाव आहे; पण आमच्या धर्माचे अस्तित्व राखूनच’, हाच संतांचा स्पष्ट संकेत आहे.
५. वारकरी संतांनी वेद नाकारले ?
हासुद्धा अत्यंत हास्यास्पद दावा आहे. ‘ज्ञानेश्वरी’चा प्रारंभच संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय ‘ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी १) (वेदाने प्रतिपादन केलेला परमात्मा), असे म्हणतात, तर ‘वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गे चालिलों ।’ (संत ज्ञानेश्वर महाराज), हीसुद्धा अभंगातून मांडली जाते. असे असूनही जर कुणी वेदांची निंदा करतांना दिसला, तर ‘वेदां निंदी तो चांडाळ ।’ (संत तुकाराम महाराज), असा उल्लेख करतात.
६. संतांनी विद्रोही बंड केले ?
ही भाषासुद्धा चुकीची आहे. संतांमुळे काय झाले, तर जगामध्ये ज्ञान होते; पण पाण्यावर शेवाळे साठून मूळ पाणी दृष्टीस पडू नये, तसे ज्ञानाचा लोप झाला होता. त्यामुळे समाजाला हित-अहित कळत नव्हते आणि समाज सैरभैर झाला होता, तेव्हा ‘लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ।।’, या संत अवतारांमुळे समाजामध्ये ज्ञानगंगा प्रवाहित झाली. इतके हे सुलभ आहे, यात विद्रोह कसला ?
७. संतांनीच ईश्वराचे अस्तित्व नाकारले ?
‘नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ।।’ (संत तुकाराम महाराज), हे चरण पाठ नाही, असा पुरोगामी शोधून सापडणार नाही; पण गंमत अशी ज्या ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यासाठी हे लोक या संतचरणाचा वापर करतात, त्या अभंगातील पहिले चरण ‘वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ।।’ (संत तुकाराम महाराज), यातून ‘समाज ईश्वराचे अस्तित्व मानतोच’, हे प्रदर्शित करणारे चरण पुरोगामी कधीच सांगत नाहीत. किंबहुना संदर्भापुरता उतारा घेण्याची सवय असल्याने पूर्ण अभंग वाचण्याचा त्यांचा कधी संबंध येतो, असे वाटत नाही. संत ज्ञानोबा, संत तुकोबाराय-नामदेवराय-एकनाथ महाराज – चोखोबाराय आदी सकल संतांची ओळख ही ‘विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम घ्यावे ।।’ (संत तुकाराम महाराज), ही शिकवण देणारी असल्याने या सर्व संतमंडळींची ओळख ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ अशीच आहे.
८. संतांच्या जीवनातील घटनांवरून संभ्रमित करण्याचा प्रयत्न
वारकरी संप्रदायातील ज्या मान्यता आहेत की, संत ज्ञानोबारायांची संजीवन समाधी, संत तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन या आताच्या काळानुसार मानवी आकलनदृष्टीने अशक्य वाटतात, हे लक्षात घेऊन या पुरोगामी मंडळींनी संतांच्या वारकरी मान्यतांना छेद देऊन विनाकारण आपल्या स्वार्थापोटी लोकांचा बुद्धीभेद होईल, असे खोटे कथानक सिद्ध करण्याचा प्रयत्न केला; पण निष्ठावंत वारकर्यांनी याला कधीच भीक घातली नाही. उलट ‘काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे ।’ (संत एकनाथ महाराज), या न्यायाने ‘संतांचे जीवन समजण्यासाठी वारकरी व्हावे लागते, ते तुमचे काम नाही’, असाच संदेश दिलेला आहे.
९. संतवचनांचा विपरित अर्थ
ओढून ताणून संतांना आणि वारकरी संप्रदायाला निधर्मी ठरवण्यासाठी संतांच्या विचारांचे चुकीचे अर्थ या पुरोगामी लोकांनी कथानकाच्या माध्यमातून लोकांपुढे मांडण्याचा घाणेरडा प्रयत्न या लोकांनी केला आहे. संतांचे अनेक अभंग प्रासंगिक, म्हणजेच त्या त्या प्रसंगाला धरून लिहिलेले आहेत. उदा. ‘अल्ला देवें अल्ला दिलावे ॥’ एखादा मुसलमान व्यक्ती साधू म्हणून संत तुकोबारायांना शरण गेला, तेव्हा समत्वदृष्टीने त्याला त्याच्या उपास्यदेवतेचे महत्त्व लक्षात आणून देणारे संत तुकोबाराय स्वधर्माविषयी किती अभिमानी होते, हे याच लेखात आपण वाचले आहे. त्यामुळे या आणि इतर अशा अनेक प्रासंगिक अभंगांचे अर्थ केवळ वाचून नव्हे, तर वारकरी होऊन वाचले, म्हणजे कळतात.
१०. वारकरी कुणाला म्हणावे ?
सध्या काय झाले आहे, पंढरपूरला दर्शनासाठी यायचे किंवा वारीत १० मिनिटे तुळशी वृंदावन डोक्यावर घ्यायचे आणि ‘आम्ही रामकृष्ण हरिवाले आहोत. आमच्या पांडुरंगाला आमचे ‘अभक्ष्य भक्षण’सुद्धा (मांसाहार) चालतो’, असे भलतेच सोयीचे तत्त्वज्ञान मांडायचे, हे वारकरी संप्रदायाला मान्य नाही. ‘अगदी केवळ माळ घातली म्हणजेही वारकरी होतो’, असे नाही, तर ‘काया वाचा मनें जीवें सर्वस्वें उदार । बापरखुमादेवीवरू विठ्ठलाचा वारीकर ।।’ (संत ज्ञानेश्वर महाराज), अशी वारकर्याची स्पष्ट व्याख्या संत ज्ञानोबारायांनी सांगितली आहे. ‘कंठी मिरवा तुळशी । व्रत करा एकादशी ।।’ (संत तुकाराम महाराज), हे तर करायचेच; पण काया, वाचा आणि मन यांनी वारकरी असला पाहिजे. (होय होय वारकरी) यात कुठेही पुरोगामी आणि त्यांनी घुसवलेले घुसखोर बसत नाहीत.
११. वारकरी संप्रदायातील समस्या
होय एक गोष्ट खरी आहे की, वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाच्या चौकटीत संतांनी आणि संतांच्या पश्चात फडपरंपरा, संस्थाने, गडाधिपती, मठाधिपती यांनी जे नियम घालून दिले होते, त्याचे उल्लंघन काही लोक करत आहेत; मात्र ही वारकरी संप्रदायातील अंतर्गत समस्या आहे, या सोडवण्यासाठी संप्रदाय समर्थ आहे. संप्रदाय कितीही मोठा असला, तरी बाकी कुणीही नाक खुपसण्याचे कारणच नाही.
१२. राजकीय दृष्टीने मतभेद
वारकरी संप्रदायातील काही लोक आपापल्या व्यक्तीगत आवडीनुसार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उघड समर्थक झाले आहेत. वारकरी विचार जो समाजाला दिशा देणारा आहे, तो स्वीकारण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत असतील, तर समाजाच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे; पण याचा अर्थ असा नाही की, वारकरी संप्रदायाला कुणीही पक्षीय शिक्का मारण्याचे कारण नाही. ‘राजकीय पक्ष संबंध हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत विचार आहे. केवळ संप्रदायाला गालबोट लागेल, असे वर्तन राजकीय लोकांसह राहून कुणी करू नये’, ही अपेक्षा योग्यच आहे; मात्र एखादा राजकीय पक्ष किंवा नेता स्वतःतील वैरभाव साधण्यासाठी वारकरी संप्रदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करील, तर तो त्यांचा दोष आहे, आमच्यात खोट नाही. त्यांच्या पक्षामध्येही अनेक आस्तिक लोक असतील आणि ते त्यांच्या स्वार्थासाठी किंवा राजकारणाचा भाग म्हणून नेत्यासमवेत असतील, त्याला आमची हरकत नाही; मात्र अशा लोकांनी त्यांच्या नेत्याच्या व्यक्तीगत प्रेमापोटी तत्त्वज्ञानाच्या संदर्भात आम्हाला उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. सर्वसामान्य वारकरी कुणाही जीवाच्या व्यक्तीगत प्रेमापोटी तत्त्वज्ञान वेशीला टांगत नाही.
वरील विवेचनावरून एक गोष्ट लक्षात घ्यावी…
नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणांची ।। १ ।।
कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ।। धृ. ।।
आम्ही कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा केलेली नसतांना दुष्प्रवृत्ती सदा सर्वदा आमच्याविषयी गरळ ओकत असतील, तर तो स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेईल, हे नक्की !
जे खळांची व्यंकटीं सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९४ (अर्थ : की खलांचा कुटीलपणा नाहीसा व्हावा आणि त्या खलांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी.)
(समाप्त)
रामकृष्ण हरि ।
– श्रीगुरुचरणपदाश्रीत ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, संत साहित्य अभ्यासक, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (१९.४.२०२६)

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !