Kharge Calls PM Modi ‘Terrorist’ : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘आतंकवादी’ म्हटले !

टीका झाल्यावर सारवासारव करण्याचा खर्गे यांचा प्रयत्न

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

चेन्नई (तमिळनाडू) – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांचा ‘आतंकवादी’ असा उल्लेख केला; यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी सारवासारव करत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तमिळनाडूतील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, एआयएडीएम्केने (अखिल भारतीय द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) भाजप आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरल्याचे सांगितले जाते.

पत्रकार परिषदेत खासदार खर्गे म्हणाले की, एआयएडीएम्के मोदी यांच्या समवेत हात कसा मिळवू शकते? ते आतंकवादी आहेत. ते समतेवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचा पक्षही समता आणि न्याय यांवर विश्वास ठेवत नाही. हे लोक त्यांच्यासमवेत जात आहेत, याचा अर्थ ते लोकशाहीला दुर्बल करत आहेत.

 (म्हणे) ‘मी ‘आतंकवादी’ असे म्हटले नाही !’ – खासदार खर्गे  

खर्गे यांच्या विधानावर टीका होऊ लागल्यावर त्यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, मी ‘आतंकवादी’ असे म्हटले नाही, मी असे म्हटले की, ते (पंतप्रधान मोदी) लोकांना घाबरवतात. माझा हेतू धमकावण्याच्या संदर्भात बोलण्याचा होता. मी स्पष्ट करू इच्छितो की, मोदी नेहमी धमकावतात. मी क्रमाने सांगितले होते, आयकर खाते, अंमलबजावणी संचालनालय या सर्व संस्था त्यांच्या नियंत्रणात आहेत. मी कधीही त्यांना आतंकवादी म्हटले नाही. ते लोकांना भयभीत करत आहेत.

खर्गे यांचे पंतप्रधान मोदी यांच्यावरील पूर्वीची आक्षेपार्ह विधाने

१. वर्ष २०२३ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना ‘विषारी साप’शी केली होती.

२. वर्ष २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना ‘रावण’शी करत ‘तुमच्याकडे रावणासारखी १०० तोंडे आहेत का?’, असा प्रश्न उपस्थित केला होता.

संपादकीय भूमिका

मोदीद्वेषामुळे काँग्रेसवाले अशा प्रकारची विधाने करून जनतेने त्यांच्या बुद्धीची कीव करावी, हे दाखवून देत आहेत !