Asim Munir : पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर इराणचे गुप्त मित्र !

  • अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना मिळाली माहिती !

  • अमेरिकेला सावध रहाण्याचा तज्ञांचा सल्ला

पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर (डावीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे इराणच्या सैन्याच्या प्रमुखांशी गुप्त संबंध आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे. जनरल मुनीर हे वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात ‘छुपा मध्यस्थ’ म्हणून काम करत असल्याने हे संबंध अधिक गंभीर मानले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प सातत्याने जनरल मुनीर यांचे कौतुक करत असतांना समोर आलेल्या या माहितीमुळे ट्रम्प काय निर्णय घेतात ?, यावर चर्चा चालू झाली आहे.

१. अमेरिकेतील ‘फॉक्स न्यूज’ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तामध्ये अधिकारी आणि प्रादेशिक विश्लेषक या संबंधांकडे एक ‘धोक्याची सूचना’ म्हणून पहात आहेत. विशेषतः इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’मधील वरिष्ठ नेत्यांशी मुनीर यांची असलेली जुनी जवळीक त्यांची मध्यस्थ म्हणून असलेली भूमिका गुंतागुंतीची करते, असे तज्ञांचे मत आहे.

२. या संबंधांमुळे अमेरिकी अधिकार्‍यांनी मुनीर यांच्या राजनैतिक उपयुक्ततेविषयी सावध पवित्रा घेतला आहे. त्यांना भीती आहे की, अमेरिका आणि इराण या दोन्ही बाजूंकडे मुनीर यांचा असलेला थेट प्रवेश धोरणात्मक जोखीम निर्माण करू शकतो.

३. टीकाकारांनी वारंवार इस्लामाबादला ‘अविश्वासू भागीदार’ म्हटले आहे. त्यांच्या मते पाकिस्तानने अमेरिकेकडून मोठे आर्थिक आणि सैनिकी साहाय्य घेतले आणि त्याच वेळी तालिबानशी संबंधित गटांना थारा दिला.

संपादकीय भूमिका

पाक दुतोंडी साप आहे, हे अमेरिकेलाही ठाऊक आहे; मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी याकडे दुर्लक्ष करण्याचे काम आतापर्यंत अमेरिकेकडून करण्यात आलेले आहे. आताही काही वेगळे घडणार नाही !