सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावे नमन,
हे गुरुमाऊली, या अज्ञानी जिवाचा उद्धार करणारे केवळ आपणच आहात. आपल्याच अनंत कृपेने मला भरतनाट्यम् नृत्यातील ‘विशारद पूर्ण’ या परीक्षेत ‘विशेष योग्यता’ श्रेणी मिळाली. गुरुदेवा, मी परीक्षेचा अभ्यास करत असतांना, नृत्याचा सराव करत असतांना, नृत्यवर्गात, परीक्षेचा पेपर लिहितांना, प्रत्यक्ष नृत्याच्या परीक्षेच्या वेळी आणि क्षणोक्षणी आपणच माझ्या समवेत होतात आणि आहात. गुरुदेवा, आपल्या कृपेने या परीक्षेच्या कालावधीत तुमची जी भरभरून कृपा अनुभवता आली, ती आपल्या चरणी अर्पण करते.

१. परीक्षेच्या २ आठवड्यांपूर्वी ‘संगीत साधना शिबिरा’शी संबंधित सेवेत व्यस्त असणे, तरीही परीक्षेचा अभ्यास अल्प वेळेत पूर्ण होणे
गुरुदेवा, माझी परीक्षा नोव्हेंबर मासातील तिसर्या सप्ताहात होती आणि नोव्हेंबर मासातील पहिल्या सप्ताहातच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘संगीत साधना शिबिर’ आयोजित केले होते. माझ्याकडे त्या शिबिराच्या संबंधित पुष्कळ सेवा होत्या. मला नृत्याभ्यास करण्यासाठी, तसेच नृत्याचा सराव करण्यासाठी अल्प वेळ मिळत होता, तरीही देवाने माझ्याकडून ‘अभ्यास आणि सराव’ पूर्ण करून घेतला आणि परीक्षेपूर्वी मला ताण आला नाही. परीक्षेच्या २ – ३ दिवसांपूर्वीही मला काही सेवा पूर्ण करायच्या होत्या, त्याही गुरुदेवांनी माझ्याकडून करून घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘गुरुसेवेला प्राधान्य दिल्याने कोणत्याच गोष्टींवर परिणाम होत नाही.’
२. लेखी परीक्षेच्या आदल्या दिवशी श्री सिद्धिविनायकाचे अकस्मात् स्मरण होऊन सूक्ष्मातून त्याचा आवाज ऐकू येणे आणि दुसर्या दिवशी साधिका सभागृहातील बसलेल्या बाकावर ‘गणपतिबाप्पा’ असे लिहिलेले असणे
माझ्या लेखी परीक्षेच्या आदल्या दिवशी मी गुरुदेवांना प्रार्थना करत असतांना मला अकस्मात् आश्रमाच्या परिसरात असणार्या श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे स्मरण होऊन त्याचा सूक्ष्मातून आवाज ऐकू आला. त्याने मला सांगितले, ‘मी उद्या तुझ्या समवेत परीक्षेच्या ठिकाणी असेन. वेदव्यासांनी महाभारत काव्याचे कथन केले आणि मी ते लिहिले होते, तसेच उद्या परीक्षेत मी तुला सर्व सांगीन आणि तू तसेच्या तसे लिहिण्याचा प्रयत्न कर.’ नंतर मला याचे विस्मरण झाले. मी दुसर्या दिवशी लेखी परीक्षेच्या ठिकाणी गेल्यावर मला दिसले, ‘मी बसलेल्या बाकावर माझ्या उजव्या बाजूला ‘गणपतिबाप्पा’ असे कुणीतरी लिहिले आहे.’ त्या वेळी अकस्मात् मला आदल्या दिवशी आलेली ‘श्री सिद्धिविनायका’च्या संदर्भातील अनुभूती आठवली आणि ‘खरंच माझ्या समवेत गणपतिबाप्पा आहे आणि त्यानेच मला आधी तसे सांगितले होते’, असे वाटून माझी कृतज्ञता व्यक्त झाली. माझ्या लेखी परीक्षेचे दोन्ही पेपर वेळेत लिहून झाले. त्यातील ‘भगवान शिवाच्या नृत्याच्या’ संदर्भातील परिच्छेद लिहितांना माझी भावजागृती झाली.
३. गुरूंसमोर नृत्याचा सराव करतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सराव पहात आहेत’, असे जाणवणे

मी माझ्या नृत्यगुरु सुश्री सुचेता जोशी यांच्या घरी नृत्याचा सराव करायला जात होते. तेव्हा नृत्य करतांना मला नेहमी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या माझ्यासमोर बसून माझा सराव पहात आहेत’, असे जाणवत असे. मला सुचेताताई मधून मधून विश्रांती घ्यायला सांगत असत. तेव्हा ‘मी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये बसले आहे’, असा भाव ठेवत होते. तेव्हा मला पुष्कळ ऊर्जा मिळून आनंद जाणवायचा.
४. नृत्यगुरु अन्य मुलींचा सराव घेत असतांना तमिळनाडू येथील तिरुवण्णमलई येथील अरुणाचलेश्वर भगवान शिवाचे दर्शन होणे
माझ्या समवेत सुचेताताईंकडे अन्य २ मुलीही विशारद प्रथम परीक्षेसाठी नृत्याचा सराव करण्यासाठी येत होत्या. एकदा सुचेताताई एका मुलीचा नृत्याचा सराव करून घेत होत्या. ते गीत ‘भगवान शिवाच्या दिव्य नटराज स्वरूपाचे’ वर्णन करणारे होते. तिचा सराव पहातांना मला वेगळीच भावस्थिती अनुभवता आली. माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि माझ्या डोळ्यांसमोर लुकलुकणार्या असंख्य ज्योती आल्या. त्यानंतर मला तमिळनाडू येथील तिरुवण्णमलई येथील अरुणाचलेश्वर भगवान शिवाचे दर्शन झाले. नंतर काही क्षण माझे ध्यान लागले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला ‘त्या स्थितीतून बाहेर पडू नये’, असे वाटत होते. मी नृत्यवर्गात असल्याने मला काही वेळाने बळजोरीने डोळे उघडावे लागले. तेव्हा मला ‘भगवान शिव किती कृपाळू आहेत, तेच त्यांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन मला देत आहेत’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
५. नृत्याच्या प्रायोगिक परीक्षेसाठी ‘मृदंग वादका’चे नियोजन न होणे आणि ऐन वेळी परीक्षकांनी ‘मृदंगवादक हवा’, असे सांगितल्यावर केवळ गुरुकृपेने अल्प कालावधीत मृदंगवादक उपलब्ध होणे
माझ्या प्रायोगिक परीक्षेच्या पूर्व सरावाच्या दरम्यान आलेल्या काही अडचणींमुळे माझ्या नृत्यगुरूंनी परीक्षेच्या वेळी ‘मृदंगवादका’चे नृत्याला साथ-संगत करायचे नियोजन केले नव्हते. त्यामुळे आमचा सराव केवळ गायिकेच्या समवेत झाला. प्रत्यक्ष प्रायोगिक परीक्षेच्या दिवशी परीक्षकांनी सांगितले, ‘‘तुमच्याकडे साथ-संगत करण्यास मृदंगवादक नसेल, तर मी नृत्य पहाणार नाही आणि ५० टक्के गुणही न्यून करीन.’ तेव्हा मला थोडा ताण आला; मात्र मला आतून ‘देव काहीतरी नियोजन करील’, असे वाटत होते. त्यानंतर केवळ २० मिनिटांत मृदंगवादक परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहिला. खरंतर पुण्यासारख्या शहरात पुष्कळ रहदारी असतांना एवढ्या अल्प वेळेत सहसा कुणी कलाकार साथ-संगत करायला सिद्ध होत नाही; मात्र या मृदंगवादकाला त्याच दिवशी संपर्क करूनही तो काही वेळातच उपस्थित राहू शकला आणि माझी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली. मला भगवान शिव अन् गुरुदेव यांची अपार कृपा अनुभवता आली.
६. भगवान शिवाशी संबंधित ‘पदम्’ ही रचना प्रस्तुत करतांना ‘परीक्षकांची भावजागृती होत आहे’, असे जाणवणे
मला प्रायोगिक परीक्षेच्या वेळी विविध रचनांची प्रस्तुती करायची होती. मला परीक्षकांनी ‘भक्ती पदम्’ (टीप) करण्यास सांगितले. ते पदम् भगवान शिवाशी संबंधित होते आणि त्या रचनेत भगवान शिवाचे वर्णन पुष्कळ भावपूर्णरित्या केले आहे. ते पदम् सादर करतांना माझे लक्ष परीक्षकांकडे गेले. तेव्हा ‘त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत’, असे मला जाणवले.
(टीप : पदम् – ‘भरतनाट्यम्’मधील मार्गमनुसार ५ व्या क्रमांकावर सादर केले जाणारे नृत्य. यात संथ लयीत ‘अभिनय आणि भावप्रदर्शन’ यांना महत्त्व असते. यात पदन्यासाला विशेष महत्त्व नसते.)
‘हे कृपावत्सल गुरुदेवा आणि हे भगवान शिवा, आपल्याच अनंत कृपेने नृत्याच्या ‘विशारद’ परीक्षेत विविध अनुभूतींच्या माध्यमांतून आपण माझ्या समवेत होतात आणि आपणच ही परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडली अन् आपणच मला ते गुण प्रदान केले’, असे मला जाणवले. गुरुमाऊली, आपल्या चरणकमली मी कृतज्ञतामय अंतःकरणाने कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (४.२.२०२६)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !