Mumbai Drugs Case : मुंबईतील कार्यक्रमात अमली पदार्थांचे अतीसेवन : तरुण-तरुणीच्या मृत्यूप्रकरणी ६ जणांना अटक !

  • सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद  

  • आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

  • दारूच्या सेवनाने काही जण बेशुद्ध पडले

मुंबई – गोरेगाव येथील ‘नेस्को सेंटर’मध्ये एका नामांकित संगीत मैफिलीत (म्युझिक कॉन्सर्टमध्ये) ‘एम्.डी.एम्.ए.’ या अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे २८ वर्षीय तरुणाचा आणि २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. काही तरुण-तरुणींनी दारूचेही सेवन केले. त्यामुळे काही जण बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ‘नेस्को’चे आयोजक सनी जैन, आकाश समल, व्यवस्थापक बाळकृष्ण कुरुप, रौनक खंडेलवाल यांच्यासह अमली पदार्थ विक्रेते आनंद पटेल आणि प्रतीक पांडे यांचा समावेश आहे. त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला ३ – ४ सहस्र तरुण-तरुणी उपस्थित होते. नाचत असतांनाच काही जणांची प्रकृती अचानक बिघडली. त्या तरुणांना पिवळ्या रंगाच्या गोळ्या देण्यात आल्याचे समजते. आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘अमली पदार्थ विरोधी प्रकरणात सरकार मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. आरोपींना पकडण्यासाठी आम्ही प्रचंड मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांची लवकरात लवकर अटक होईल.’’

‘एम्.डी.एम्.ए.’ या अमली पदार्थाचा विपरीत परिणाम !

हा अमली पदार्थ गोळी किंवा पावडर स्वरूपात उपलब्ध असतो. याच्या सेवनामुळे ऊर्जा आणि उत्साह वाढतो. हृदयाचे ठोके वाढतात. काही वेळा अवयव निकामी होण्याचा धोका असतो. नैराश्य येऊ शकते. प्रसंगी मृत्यूही येऊ शकतो.

संपादकीय भूमिका

  • तरुण पिढीला असलेले अमली पदार्थांचे आकर्षण किती जीवघेणे ठरू शकते, हे यावरून लक्षात येते !
  • प्रवेशाच्या वेळी पडताळणी झाली नाही का ? जर झाली असेल, तर त्याच वेळी अमली पदार्थांचा साठा पकडला का नाही ? तरुणांना त्रास झाल्यावर त्यांना तात्काळ वैद्यकीय साहाय्य का मिळाले नाही ? यांवरही विचार व्हायला हवा !