नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात’ सादर केलेल्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ आणि ‘शस्त्रकला’ यांच्या प्रात्यक्षिकांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव झाला. या महोत्सवात सादर केलेल्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ आणि ‘शस्त्रकला’ यांच्या प्रात्यक्षिकांचे केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. 

भाग १ 

१. मणीपूरमधील ‘थांग-ता’ या प्राचीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचे प्रस्तुतीकरण होणे

‘मणीपूरमधील ‘थांग-ता’ या प्राचीन युद्धकलेची प्रात्यक्षिके पहातांना त्यांतील शस्त्रांमध्ये श्री दुर्गादेवीची मारक शक्ती कार्यरत असल्याचे जाणवले. त्यामुळे ही प्रात्यक्षिके पहात असतांना त्यांतील शस्त्रांतून लालसर रंगाच्या मारक शक्तीच्या प्रवाहाचे प्रक्षेपण वातावरणात होतांना जाणवले. त्याचप्रमाणे ही युद्धकला पहात असतांना धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठांमध्ये शौर्यजागृती झाली, तसेच त्यांच्यात वीरश्री जाणवली.

२. स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण होणे

प्रात्यक्षिके सादर करतांना हिंदु जनजागृती समितीचे साधक

२ अ. प्रात्यक्षिकांचे पार्श्वसंगीत वीरश्री जागृत करणारे असणे : ‘ही प्रात्यक्षिके धर्मलोकातील धर्मवीर धर्मप्रेमींच्या माध्यमातून करून दाखवत आहेत’, असे जाणवून माझ्या शरिरावर रोमांच आले. या प्रात्यक्षिकांचे पार्श्वसंगीत वीरश्री जागृत करणारे होते. ते पार्श्वसंगीत ऐकल्यावर श्रोत्यांमध्ये वीरश्री संचारून त्यांची सूर्यनाडी कार्यरत झाल्याचे जाणवले. त्यामुळे हिवाळ्यातही वातावरणात आणि धर्मप्रेमी हिंदूंच्या देहात उष्णता निर्माण झाली.

२ आ. दंडसाखळीतून मारक शक्तीचे प्रक्षेपण होऊन वातावरणातील रज-तमप्रधान लहरी नष्ट होणे : दंडसाखळी चालवण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्या वेळी दंडसाखळीतून मारक शक्तीचे प्रक्षेपण होत होते. त्यामुळे वातावरणातील रज-तमप्रधान लहरींच्या गोळ्यांवर आघात होऊन ते बाँब फुटल्याप्रमाणे फुटून नष्ट होत होते. ही प्रात्यक्षिके दाखवणार्‍या धर्मप्रेमींवर श्री दुर्गादेवीची कृपा असल्यामुळे ते दंडसाखळी चालवण्याच्या विद्येत पारंगत झाले होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर वीर हनुमानाची विशेष कृपा असल्यामुळे त्यांच्यामध्ये विविध देवतांची मारक शक्ती कार्यरत झाली होती. त्यामुळे धर्मप्रेमी दाखवत असलेली प्रात्यक्षिके अत्यंत प्रभावी होती आणि ती पाहून धर्मप्रेमी हिंदूंमध्ये क्षात्रभाव अन् शौर्य जागृत होत होते.

प्रात्यक्षिके सादर करतांना ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे विद्यार्थीप्रात्यक्षिके सादर करतांना ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे विद्यार्थी

२ इ. स्वसंरक्षणाच्या विविध युक्तीपूर्ण कृतींची प्रात्यक्षिके दाखवणे : स्वसंरक्षणाच्या विविध युक्तीपूर्ण कृतींची प्रात्यक्षिके सादर करणार्‍या धर्मप्रेमींवर श्रीकृष्णाची कृपा होऊन त्यांच्या बुद्धीमध्ये कृष्णनीतीची सूत्रे कार्यरत झाली. त्यांना ‘शत्रूच्या मर्मस्थानांवर आघात करून त्याला कसे हरवायचे’, याची गुप्त कला अवगत झाली असल्याचे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

जाणवले. ही प्रात्यक्षिके दाखवून झाल्यावर भगवान श्रीकृष्णाने आपल्या ‘पांचजन्य शंखा’चा नाद करून धर्मप्रेमींना दैवी शक्ती प्रदान केली. ‘अर्जुनाने आपला ‘देवदत्त शंख’ वाजवून विश्वातील समस्त धर्मप्रेमींमध्ये आपत्काळात स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी शौर्यजागृती केली. या शक्तींच्या बळावर आपत्काळातही धर्मप्रेमी आणि अन्य सात्त्विक जीव जीवघेण्या प्रसंगांतून तरून जाणार आहेत. (ही प्रात्यक्षिके पहात असतांना माझ्या संगणकाच्या जवळ मारक स्वरूपातील धर्मशक्तीचे प्रतीक असलेला तांबूस रंगाचा दैवी कण आढळला. यातून या प्रात्यक्षिकांच्या वेळी देवतांचे मारक तत्त्व कार्यरत होत असल्याची प्रचीती आली.)

२ ई. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केल्याचा प्रसंग सादर करणे : हा प्रसंग पहात असतांना ‘कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आले आहेत’, असे मला जाणवले. हा सादर केलेला प्रसंग पाहून समस्त धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठांमधील धर्मतेज आणि क्षात्रतेज जागृत झाले. त्यांना हिंदूंवर आघात करणार्‍या आतंकवादी अधर्मी शक्तींशी त्वेषाने संघर्ष करण्याची स्फूर्ती आणि धर्मरक्षणाची प्रेरणा मिळाली.

३. ‘सव्यसाचि गुरुकुलम्’ च्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकला आणि शस्त्रविद्या यांची दाखवलेली प्रात्यक्षिके

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या’ दुसर्‍या दिवशीच्या सकाळच्या सत्रात ही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्या वेळी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

३ अ. विविध प्रकारचे व्यायाम प्रकार सादर करणे : त्या वेळी गुरुकुलातील विद्यार्थ्यांमध्ये हनुमानाची क्रियाशक्ती कार्यरत झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या देहातून केशरी रंगाचा दैवी प्रकाश प्रक्षेपित होत होता आणि मनातून क्षात्रभावाच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण होत होते.

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १४.१२.२०२५)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1027623.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.