हौसला… इंधन… बदला (सूड) !

मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण ।
तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ।।

लोकसंग्रह करणार्‍याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत ? हे सांगतांना समर्थ म्हणतात, ‘‘त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरे म्हणजे त्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा आणि तिसरे, म्हणजे सर्वच विषयांमध्ये सावधपणा हवा.’’

चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप ।
अन्याये थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ।।

चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यासंग असला पाहिजे आणि इतरांचे आक्षेप यांचे निरसन त्याला करता आले पाहिजे, तसेच इतरांचे लहान-थोर अन्याय क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे.

आजच्या काळात असे म्हटले जाते की, ज्याचे हत्यार प्रभावी, तो युद्ध जिंकतो; पण ज्याचा ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) प्रभावी, तो जग जिंकतो. सामाजिक माध्यमांच्या युगात माहितीचा महापूर आला आहे. या पुरात सत्यापेक्षा ‘कल’ (Perception) महत्त्वाचा ठरत असतो.

१. ‘नॅरेटिव्ह’ म्हणजे काय ?

‘नॅरेटिव्ह’ म्हणजे केवळ माहिती नाही, तर एखाद्या घटनेकडे, व्यक्तीकडे किंवा विचारसरणीकडे पहाण्याचा ‘दृष्टीकोन’ सिद्ध करणे. सोप्या भाषेत सांगायचे, तर जे घडत आहे, ते महत्त्वाचे नसून ते कसे सांगितले जात आहे, याला ‘नॅरेटिव्ह’ म्हणतात. सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) ही या नॅरेटिव्हला आकार देणारे सर्वांत मोठे कारखाने बनले आहेत.

वैद्य परीक्षित शेवडे

२. नॅरेटिव्हची लढाई महत्त्वाची का आहे ?

२ अ. सत्यावर आभासाचा विजय ! : सामाजिक माध्यमांवर अनेकदा एखादी खोटी गोष्ट इतक्या पद्धतशीरपणे मांडली जाते की, लोक तिलाच सत्य मानू लागतात. जर आपण आपला खरा ‘नॅरेटिव्ह’ मांडला नाही, तर समोरचा पक्ष आपल्याविषयीचा खोटा ‘नॅरेटिव्ह’ ‘सेट’ करतो. एकदा का लोकांच्या मनात एखाद्याविषयी नकारात्मक प्रतिमा सिद्ध झाली की, ती पुसणे कठीण असते. आयुर्वेदाने ‘हेवी मेटल’ विष (पॉयझनिंग) होते इथपासून आजच्या काळातील रोगांवर आयुर्वेदात औषधे नाहीत इथपर्यंत अनेक असत्य सातत्याने मांडणारे लोक समोर असतांना त्यांना अनुल्लेखाने मारा, हे सांगणे म्हणजे स्वतःचे दायित्व झटकून दिल्यासारखे आहे !

२ आ. जनमताचे ध्रुवीकरण : आज निवडणुकांपासून सामाजिक आंदोलनांपर्यंत सगळे काही ‘हॅशटॅग’ आणि ‘ट्रेंड्स’वर (समाजमाध्यमांवर केली जाणार्‍या चर्चांवर) अवलंबून आहे. जो नॅरेटिव्हच्या लढाईत आघाडीवर असतो; तोच लोकांच्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो. शास्त्राविषयीही हेच आहे, धर्माविषयीही आहे. काही गैरप्रकरणावरून धर्माला लक्ष्य करण्याचे ‘नॅरेटिव्ह’ गेले १५ ते २० दिवस आपण पहातच आहोत की !

२ इ. सांस्कृतिक आणि वैचारिक अस्तित्व : आपली संस्कृती, इतिहास आणि मूल्ये यांवर जेव्हा परकीय किंवा चुकीच्या विचारसरणीकडून आक्रमण होते, तेव्हा नॅरेटिव्हची लढाई ही केवळ शब्दांची लढाई उरत नाही, तर ती आपल्या ‘अस्तित्वाची’ लढाई बनते. आपला वारसा अभिमानाने मांडला नाही, तर तो विस्मृतीत ढकलला जाऊ शकतो. आयुर्वेदाला इतिहासापुरतेच मर्यादित ठेवा, असे सांगण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही थेट अस्तित्वाची लढाई आहे. तुम्ही क्लिनिकच्या ४ भिंतींत लाख उत्तम काम केले, तरी ते लोकांना पुराव्यानिशी सांगणेही आवश्यक आहे.

३. ही लढाई आपण का जिंकायलाच हवी ?

३ अ. सत्याचे रक्षण करण्यासाठी : चुकीच्या ‘नॅरेटिव्ह’मुळे समाजात असत्य पसरते. त्या त्या क्षेत्राची पूर्ण माहिती नसलेले लोक या ठासून सांगितल्या जाणार्‍या असत्याला फसण्याची शक्यता दाट असते. नित्यनेमाने रुग्णसेवा करणार्‍या वैद्यांना रुग्णांची किती दिशाभूल असत्य कथनाने होते, हे उत्तम ठाऊक असते. विशेषतः गंभीर आणि आव्हानात्मक रुग्णांवर उपचार करतांना प्रतिदिनच्या ‘ओपीडी’तील (बाह्यरुग्ण विभागातील) बहुमूल्य वेळ यात वाया जात असतो. त्यामुळे शक्य त्या मंचावरून सत्य नॅरेटिव्ह मांडणे हे निरोगी समाजासाठी आवश्यक आहे.

३ आ. सकारात्मक पालट घडवण्यासाठी : जर आपल्याला समाजात पालट घडवायचा असेल, तर लोकांच्या विचारांची दिशा पालटावी लागेल. ती दिशा नॅरेटिव्हच्या माध्यमातूनच पालटता येते.

३ इ. प्रतिमा निर्मितीसाठी : राष्ट्र असो वा शास्त्र, जागतिक स्तरावर तुमची प्रतिमा कशी आहे ? यावरच तुमचे भविष्य ठरते. ‘सॉफ्ट पॉवर’ वाढवण्यासाठी नॅरेटिव्ह जिंकणे अनिवार्य आहे.

हनुमानाने भर लंकेत आग लावून सिद्ध केले नॅरेटिव्ह

४. नॅरेटिव्ह कसा जिंकावा ?

४ अ. तथ्यांची जोड देऊन : केवळ कोरडी आकडेवारी देऊन चालत नाही. ती माहिती सत्य हवी. पोकळ वैयक्तिक जाहिरातबाजी नको.

४ आ. सातत्य हवे : नॅरेटिव्ह एका दिवसात सिद्ध होत नाही. त्यासाठी सातत्याने एकाच विचारसरणीचा किंवा सत्याचा पाठपुरावा करावा लागतो. मी गेली किमान १५ वर्षे सातत्याने आयुर्वेदाविषयी लिहीत आहे. वैयक्तिक चढ-उतार पूर्णपणे बाजूला सारून !

४ इ. ‘टीम वर्क’ (सांघिक प्रयत्न) हवे : एखाद्याने काही शास्त्रीय लिहिले, तर न लिहिणार्‍यांनी किमान ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचे दायित्व उचलायला हवे. यामुळे त्या व्यक्तीचा लाभ होईल, या असुरक्षिततेतून बाहेर यायला हवे.

नॅरेटिव्हच्या रणभूमीवर आपण ‘न्यूट्रल’ (तटस्थ) राहून चालणार नाही; कारण तुम्ही शांत बसला, तरी तुमच्याविषयी कुणीतरी दुसरे बोलत असतेच. तुमच्या उल्लेखालाही कुणी हिंग लावून विचारत नसेल, तेव्हा विरोधकांना अनुल्लेखाने मारू मधल्या अनुल्लेखाला काहीच किंमत नसते ! प्रत्येक आक्षेपाला उत्तरे देत बसू नका; प्रतिक्रियावादी बनू नका हे योग्यच; पण क्रियावादी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला कुणालाही वैयक्तिक लक्ष्य करायचे नाही; पण त्यांच्या मुद्यांचे खंडणमंडण व्हायला हवे !

आपल्या सत्यासाठी, आपल्या मूल्यांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी नॅरेटिव्हची लढाई केवळ लढणे नाही, तर ती जिंकणे, ही काळाची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, ‘इतिहासाची पाने त्यांनीच लिहिली आहेत, ज्यांनी नॅरेटिव्हवर राज्य केले आहे !’

हनुमानाने भर लंकेत आग लावून सिद्ध केलेले नॅरेटिव्ह आठवा. नैष्कर्म्य टाळा आणि गदा उचलून सिद्ध रहा !

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ।।

नपुंसकता सोड पार्था; ही वागणूक तुझ्यासाठी अशोभनीय आहे. हृदयाची दुर्बलता त्यागून लढायला उभा रहा !

हौसला…..इंधन……बदला (सूड) !!

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.